!! थांब मरणा !!
थांब मरणा दारातच तू
बोलाविले रे तुला कुणी ?
तशीच आहे तुझी अजूनी
खोड तुझी रे तुझी जुनी !
जर जगणे झाले माझे
बोलवीन मी नक्की तुला
अजून तसाच राहीलाय
रे खेळायाचा एक झुला !
कोकिळेच्या कंठामधले
ऐकायाचे आहे तराणे
शोधायाचे आहे मला रे
आहे कोणते तिचे घराणे ?
फक्त एकदा करून बघू दे
वर पाय नि खाली मुंडी
राहिलीय रे एक आणखी
खेळायाची घसरगुंडी !
अंगावरती उधळायाची
पुन्हा एकदा तशीच माती
पुन्हा एकदा धावायाचे
फुलपाखरू घेऊन हाती !
पुन्हा एकदा ताव मारु दे
हुरड्याच्या त्या दाण्यावरती
फक्त एकदा सूर मारु दे
सळसळणा-या पाण्यावरती !
घे बघून घे..हातावरची
अजून राहीली जीवनरेषा
अरे वेड्या का आताच करतो
माझ्या मरणाची तु भाषा ?
जा मरणा, जा गड्या तु
परतुन जा रे,नकोस थांबू
परि जरा तु रहा भोवती
तेवढाही नकोस लांबू !
राजेश रेवले
नैकोटवाडीकर.


No comments:
Post a Comment