कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करावा - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात. याकरीता डॉक्टरांनी या कालावधीत रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत तातडीने उपचार करावेत असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख,महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्णपणे कार्य करत आहे. आरोग्य यंत्रणेने देखील तितक्याच वेगाने व लक्षपू्र्वक काम करण्याची आवश्यकता आहे. नागरीकांना मास्क वापरण्यासाठी प्रशासनासह प्रसिध्दी माध्यमांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. नागरीकांनी त्यांच्या घरातील महिला, वयोवृध्द सदस्य, लहान मुलांचे आजार अंगावर न काढता त्यांना तातडीने डॉक्टरांकडे घेवून जावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.कोरोनाच्या संसर्ग झालेल्या व्यक्तीसाठी पहिले पाच दिवस हेअंत्यत महत्वाचे असतात. त्यामुळे या पाच दिवसात त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्यास रुग्ण तातडीने कोरोना मुक्त होवू शकतो. रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता खासगी ड़ॉक्टरांनी देखील त्यांच्या रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी आरक्षित कराव्या लागणार असून याकरीता मानसिक तयारी करून ठेवावी. तसेच रुग्णाची लुट होणार नाही याची देखील दक्षता घेतली गेली पाहिजे असे ही त्यांनी सुचविले.
जिल्ह्यात ऑक्सीजनच्या सिलिंडरचा पुरवठा पुरेसा आहे की नाही याची देखील तातडीने तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयांना यावेळी दिल्या. तसेच जिल्हा परिषदेची इमारत तातडीने कोरोना केअर सेंटरसाठी अधिगृहित करावी. जिल्ह्यातील रुग्ण खांटाची संख्या मर्यादीत असल्याने इतर खासगी रुग्णालयातील खाटा आरक्षित कराव्या लागणार हे लक्षात घेवून त्याबाबत पूर्व नियोजन करावे. कोरोना कक्षात भरती असलेल्या रुग्णांना मानसिक आधार द्यावा, नातेवाईक रुग्णांत संवाद रहावा यासाठी कोरोना कक्षाच्या बाहेर स्क्रिन लावून अधून-मधून रुग्णांचे नातेवाईकांशी बोलणे करून द्यावे असे ही त्यांनी सूचविले. कंटेन्मेट झोनमधील रहिवाशी विनाकारण बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी दिले.नागरिकांनी देखील अतिमहित्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि पत्रकार यांची उपस्थिती होती.
****



No comments:
Post a Comment