Sunday, July 5, 2020

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर





औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु कारोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत: नागरिकांनी देखील जबाबदारीने व दक्षतेने वागणे आवश्यक आहे. कोरोना मुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, महत्त्वाचे म्हणजे गर्दी टाळणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. 
  पुंडलीक नगर भागातील झोन क्र. 6/7 मधील प्रतिबंधित  क्षेत्राला श्री. केंद्रेकर यांनी आज भेट देऊन या भागातील नागरिकांना दिलासा दिला. यावेळी उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. 
नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरीता सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ उपचार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण  रस्त्यावर कुणीही  फिरु नये. स्वत: लोकांनीच लॉकडाऊन पाळला तर कोरोनाला आपण निश्चितपणे हरवू शकतो. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्याबाबत उदया होणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी  सांगितले. 

 क्वारंटाइन सेंटर, धूत रुग्णालय, कोविड केअर सेंटरची पाहणी
 श्री. केंद्रेकर यांनी गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलातील क्वारंटाइन सेंटर, सेठ नंदलाल धूत रुग्णालय आणि चिकलठाणा औदयोगिक क्षेत्रातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. विभागीय क्रीडा संकुलातील क्वारंटाइन सेंटरच्या पाहणी दरम्यान तेथील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना सूचना करताना ते म्हणाले की, सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच स्वच्छतेवर अधिक भर दयावा, क्वारंटाइन कक्षाचे  वेळोवेळी  निजंर्तुकीकरण करुन घ्यावे. हाय रिस्क असणाऱ्या व्यक्ती  आणि त्यांच्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींची स्वतंत्र व्यवस्था करावी. 
 धूत रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी करुन रुग्णांची  व्यवस्थित काळजी घेण्याची  सूचना श्री. केंद्रेकर यांनी केली. चिकलठाणा औदयोगिक क्षेत्रातील कोविड केअर सेंटरच्या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची चौकशी केली. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. यावेळी उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची त्यांनी भेट घेतली. तसेच त्यांना टाळया वाजून आनंदाने निरोपही देण्यात आला. येथे मिळणाऱ्या सुविधांबददल कोरोना मुक्त रुग्णांनी यावेळी समाधान व्यक्त केले. 
 यावेळी महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिकेच्या वैदयकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींसह अन्य आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



                     

No comments:

Post a Comment