श्रीचं आगमन व विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध
बप्पाची घरगुती मुर्ती दोन तर सार्वजनिक चार फुटांच्या मर्यादेत
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्यानिमित्ताने शनिवारी(दि.11) काही मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यात श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध घालण्यात आले असून सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपर्यंत व घरगुती गणपतीची दोन फुटांच्या मर्यादेपर्यंत मुर्ती असावेत, असे निर्देशही बजावल्या गेले आहेत.
राज्याच्या गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका परिपत्रकाद्वारे एकूण 12 सूचना लागू केल्या आहेत. त्यामधून घरोघरी व सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव कशा पध्दतीने साजरा करावा, याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्या सूचना पुढील प्रमाणे ः
1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्याचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.2. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादीत स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी.4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील घातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमुर्तीचे विसर्जन पुढे ढकलने शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन/विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतः व कुटूंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल.5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.7. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.8. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.9. गणपती मंडपामध्ये निर्जंतूकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.10. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नयेत.11. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.12. कोविड - 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.



No comments:
Post a Comment