Thursday, July 23, 2020

परभणी सिव्हिल हॉस्पिटलला बूस्टर डोसची गरज;आपत्तीच्या काळातील निष्काळजीपणा धोकायदायकः असंख्य तक्रारी

परभणी सिव्हिल हॉस्पिटलला बूस्टर डोसची गरज;आपत्तीच्या काळातील निष्काळजीपणा धोकायदायकः असंख्य तक्रारी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यावासिय तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणा गेल्या साडेतीन-चार महिन्यांपासून अक्षरक्षः अस्वस्थ असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचे एक-एक किस्से समोर येवू लागले असून पूर्णेतील कोरोनाबाधित महिलेस बुधवारी दुपारी डिस्चार्ज दिल्याचा खळबळजनक प्रकार म्हणजे कळसच ठरला आहे. 
साडेतीन-चार महिन्यांपासून सरकारी यंत्रणा कोरोना विरूध्दच्या संघर्षात महसुल, पोलिस, आरोग्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थां सारख्या यंत्रणां युध्दपातळीवर काम करीत आहेत.विशेषतः जिल्हा शासकीय रूग्णालयावर निश्‍चीतच कामाचा मोठा ताण आहे. कारण कोरोनाबाधित व्यक्तींची, संशयितांची तसेच क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची वाढती संख्या त्या पाठोपाठ तपासणीसह स्वॅब, रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टचे वाढते प्रमाण, कोविडच्या कक्षातून बाधित व्यक्तींवर औषधोपचार, त्या व्यक्तींचे कोरोना व्यक्तिरिक्त अन्य आजार वगैरे गोष्टी निश्‍चीतच संवेदनशील, गुंतागुंतीच्या अन् कामाचा ताण वाढविणा-याच आहेत. या आपत्तकालीन स्थितीत रुग्णालयातंर्गत काही अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे अहोरात्र काम करीत आहेत. परंतू काही अधिकारी व कर्मचा-यांची उदासीनता, गलथान, बेफिकीरपणा कोरोना विरूध्दच्या या संघर्षात चिंताजनक, संतापजनक व धोकादायक ठरतो आहे. विशेषतः परभणी तालुक्यातील एका रुग्णास ऑक्सीजन वेळेवर न मिळाल्याची व्हायरल व्हिडीओ क्विप पाठोपाठ पूर्णेतील कोरोनाबाधित महिलेस अवघ्या तीन दिवसांत डिस्चार्ज दिल्याचा प्रकार अक्षरक्षः कळस गाठणारा आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या विरोधात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच तक्रारींची मालिका सुरू झाली. विशेषतः कोरोनाविरूध्दच्या या लढाईतील साहित्य खरेदीबाबतच व्यक्त होणा-या शंकापासून रुग्णालयाच्या कारभारातील अनियंत्रण, बेफिकीरपणा, उदासिनता वगैरे गोष्टीबाबत माध्यमांपासून विविध पक्ष व संघटनांनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर टिका टिप्पणी केली. विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या जिल्ह्याच्या प्रत्येक दौ-यातून, आढावा बैठकांमधून नागरगोजे यांच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दांत टिका-टिप्पणी केली. सर्वा समक्ष कानपिचक्या दिल्या. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपत्तकालीन या स्थितीत जिल्हा रुग्णालयावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने नियुक्तीपासून काही गोष्टी निश्‍चीतच नियंत्रणात आणल्या. परंतू दैनंदिन औषधोपचारासह प्रशासकीय पातळीवरील अनागोंदी रुग्णालय प्रशासनाद्वारे नियंत्रणात आणण्यात आली नाही. रुग्णालयातील कोवीड कक्ष, क्वारंटाईन व्यक्तींसाठीची स्वतंत्र कक्ष,  वैद्यकीय तपासणीपासून औषधोपचारातील अनियमतता, अस्वच्छता, असुविधां तसेच रुग्णांसह कुटुंबियांशी प्रशासनाचा असमन्वय, समज-गैरसमज, शंका-कुशंका, माध्यमां बरोबरीलही असमन्वय, काही गोष्टीची लपवा-लपवी वगैरे असंख्य तक्रारीं, किस्से दिवसेदिवस समोर येत आहेत. परंतू डॉ.नागरगोजे व अन्य काही बेजबाबदार अधिकारी याबाबत सराईत मौन बाळगून आहेत.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.



No comments:

Post a Comment