परभणी परिसरात तीन दिवसीय संचारबंदी लागू ;उल्लंघन करणाऱ्यावर होणार कडक कारवाई
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत मनाई आदेश लागू केला असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर व्यक्ती व वाहनांना नियंत्रित करणे आवश्यक असल्याने परभणी शहर महानगरपालिका हद्दीमध्ये व हद्दीबाहेरील 3 किमी परिसरात दि.17 ते 19 एप्रिल 2020 पर्यत संचारबंदी लागू केली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी निर्गमित केले आहेत.
या संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालये व कर्मचारी त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, शासकीय निवारागृहे, कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजूना अन्न वाटप करणारे एनजीओ व त्याची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैदयकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा, शासकीय दुध संकलन व त्यांची वाहने, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक, प्रतिनिधी, वार्ताहर व वितरक याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती, वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, परभणी शहर महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग परभणी , अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, तालुका दंडाधिकारी परभणी यांच्यावर राहील. असेही आदेशात नमूद केले आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment