कोरोनाच्या जागतिक आपत्ती मध्येही सेवा देणारे डॉक्टर म्हणजे योध्देच होय - डॉ. सुरेश चौधरी ; कोरोनाला हरवण्यासाठी घाबरू नका,घरीच राहा - डॉ.सुरेश चौधरी !
परळी / सोनपेठ (दर्शन) :- (अनंत गित्ते पांगरीकर)
संपूर्ण जगावर आज कोरोना सारखी जागतिक आपत्ती आली असून अद्यापही कोरोनाव्हायरस वर जगातील कोणत्याच वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञांना लस शोधता आली नाही. संपूर्ण जगातील बहुतांश देशात आज कोरोनाने थैमान घातले असून कोरोना मुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येने लाखाचा आकडा केव्हाच ओलांडला असून आपल्या देशात व विशेषतः राज्यातही कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यावर लॉक डाऊन हाच सर्वोत्तम पर्याय असून नागरिकांनी घाबरून न जाता,गरज नसताना घराबाहेर पडू नये.असा सल्ला गणेश पार येथे वैद्यनाथ क्लिनिक नावाने दवाखाना चालवणारे जुन्या पिढीतील डॉक्टर सुरेश चौधरी यांनी सल्ला दिला.
कोरोना वायरस आजार व उपचार याविषयी डॉक्टर चौधरी यांच्याशी चर्चा केली असता ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाव्हायरसला हद्दपार करण्यासाठी आज कोणतीही लस उपलब्ध नसली तरी प्रतिबंधात्मक उपाय करण्याने कोरोनाला आपण हरवू शकतो.यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्वतःला लॉक डाऊन करून घेणे,गरज नसतांना घराबाहेर न पडणे,अति गरजेचे असेल तरच घराबाहेर पडणे व यासाठी तोंडावर, चेहऱ्यावर मास्क,चांगला रुमाल वगैरे बांधणे.शक्यतो चष्मा,गॉगल वापरणे,इतरांशी बोलतांना सुरक्षित अंतर ठेवणे,वेळोवेळी साबणाने हात व चेहरा धुणे,सॅनिटायझर चा वापर करणे,शासनाच्या आरोग्य विभागाचे निर्देश पाळणे,याचबरोबर वेळोवेळी गरम,कोमटपाणी,चहा घेत राहणे.संध्याकाळी गरम दुधात हळद टाकून पिणे,कारण हळदीमध्ये नैसर्गिक आणि दुष्परिणाम नसणारे अँटिबायोटिक,जंतुनाशक,(स्टिरॉइड) हळदीमध्ये असतात.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम,योगासने करावीत.तसेच मानसिक बल वाढण्यासाठी ध्यानधारणा करावी.बाहेरून फळे भाजीपाला आणल्यावर गरम पाण्याने धुऊन घ्यावीत.थंड पदार्थ,शिळे अन्न खाऊ नये.असा सल्लाही डॉ.चौधरी देतात. डॉ.सुरेश चौधरी हे जुन्या पिढीतील अनुभवी डॉक्टर असून त्यांचा गणेश पार येथे वैद्यनाथ क्लिनिक नावाचा दवाखानाही आहे.त्यांचे कर्नाटक युनिव्हर्सिटी मधून १९७६ साली (एम.बी.बी.एस.) वैद्यकीय शिक्षण झाले असून त्या काळी परळी शहरात डॉ.ढाकणे, डॉ.फटाले,आणि डॉ.चौधरी असे मोजकेच वैद्यकीय पदवी प्राप्त डॉक्टर होते.
डॉ.चौधरी यांच्या वयाची सत्तरी ओलांडलेली असतानाही व कोरोना च्या पार्श्वभूमीवर साठ वर्षे वयापुढील डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक नसताना सुद्धा डॉ. चौधरी हे कोणतीही भीती मनात न बाळगता आपली रुग्णसेवा करतच आहेत.(त्यांच्याकडे येणार्या रूग्णांकडून ते अगदीच अल्प मोबदला (फिस)घेत असल्याचे दिसून आले,यातही अनेकांकडे ती अल्प फिस नसते तेंव्हा अशा रूग्णांची सेवाही पैसे नसले तरी डाॅ.चौधरी हे करतांना दिसुन येतात.) याविषयी त्यांच्याशी चर्चा केली असता,डॉ.चौधरी म्हणाले की भगवान श्रीकृष्णाने गितेत म्हटले आहे की रणांगण सोडून पळून जाऊ नये.अगदी त्याच प्रमाणे आज कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर,नर्स,पोलीस युद्धजन्य परिस्थितीशी मुकाबला करत आहेत.आणि यातून पळून जाणे किंवा कोरोनाच्या भीतीने रुग्णसेवा न करणे हे माझ्यासारख्याला न पटणारे आहे.आणि जर ऋग्नसेवा करतेवेळेस मृत्यू ओढवला तर यासारखे ते भाग्य कोणते,असेही डॉ. चौधरी म्हणाले.
कोरोनाव्हायरस आजच्या परिस्थितीत डॉक्टरांना होत असलेल्या असुविधांबद्दल खंतही डॉ.चौधरी यांनी व्यक्त केली.ते म्हणाले की आज डॉक्टरांकडे चांगले मास्क, हँडग्लोज,स्पिरीट, अशा सुविधा मोठ्या प्रमाणात डॉक्टर,नर्स यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे.कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज डॉ.सुरेश चौधरी यांच्या सारखे वयाची सत्तरी ओलांडलेले अनेक डॉक्टर योद्धे रुग्णसेवा करत असून अनेक जणांची भीतीने गाळण उडाल्यामुळे स्वतःला लाॅक-डाऊन करून बसले आहेत. म्हणून डॉ.सुरेश चौधरी यांच्यासारख्या आधुनिक आरोग्य योध्द्यांची आज गरज असून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

No comments:
Post a Comment