स्वस्त धान्य वाटपात अनियमितता करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
शासनाकडून गरिबांसाठी व विविध योजनातील लाभार्थ्यांसाठी मुबलक धान्य उपलब्ध करून देण्यात आले असून हे धान्य रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे काम जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे करण्यात येत आहे . मात्र अशा परिस्थितीमध्ये
सेलू तालुक्यातील मौजे सावंगी पीसी येथील श्रीमती ज्योती विठ्ठलराव काळे व पाथरी तालुक्यातील मौजे फुलेरवाडी येथील रानबा जगन्नाथ फुलवरे हे दोन रास्तभाव दुकानदार लाभाधारकांना धान्य वाटपामध्ये अनियमीतता करीत असल्याची तक्रार जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार फुलेरवाडी येथील रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले आहे तर सावंगी पीसी रास्तभाव दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूमुळे आपात्कालीन स्थिती ओढवलेली असतांना अशा स्थितीत लाभार्थ्यांना वाटप करावयाचे धान्यामध्ये रास्तभाव दुकानदार यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची अनियमितता होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी सुचित केले आहे. तसेच लाभार्थ्यांना वाटप करावयाचे धान्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अनियमीतता होणार नाही यासाठी रास्तभाव दुकानदार यांनी ग्रामदक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनिधी समक्ष धान्य वाटप करावे. वाटप करण्यात येणाऱ्या धान्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अनियमीतता झाल्यास संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी दिले आहेत. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment