Friday, August 28, 2020

डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेण्याची अफवा, लातुरात भक्तांची तोबा गर्दी

डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेण्याची अफवा, लातुरात भक्तांची तोबा गर्दी




लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
लातूर जिल्ह्यात डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याच्या अफवेतून मोठी गर्दी उसळली होती. मात्र शिवाचार्य महाराज आज (शुक्रवार 28 ऑगस्ट) समाधी घेणार नसल्याचे त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा आज सकाळपासून पसरली होती. डॉ शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरु आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हते, तर राज्याबाहेरही शिवाचार्य महाराज यांना मानणारा मोठा भक्तजन आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वय 100 वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आश्रमाबाहेर जमा झाला. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दर्शन घेण्याची ओढ भक्तांना लागली होती.
अहमदपूर इथल्या ‘भक्तीस्थळ’ या त्यांच्या आश्रमात समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र आज महाराज समाधी घेणार नसल्याचे त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाजूला सारुन भक्तजनांनी गर्दी केल्याने चिंता व्यक्त केली जात होती. लातुरात आतापर्यंत सात हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालाच मात्र, काही भक्तांनी मास्क न लावल्याने काहीशी काळजी व्यक्त केली जात आहे

No comments:

Post a Comment