सोनपेठ- परभणी बससेवा सुरू ; प्रवाशांची गैरसोय दूर तर प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच टप्प्या-टप्प्याने बस सुरु होतील
सोनपेठ (दर्शन) :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली पाथरी आगाराची सोनपेठ - परभणी बस मागील चार दिवसांपासून पूर्ववत सुरू झाली आहे. बसच्या दोन फेऱ्या सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बसेस टप्प्या-टप्प्याने सोडण्यात येत असून आता प्रवाशी वाहतूक व्यवस्था पूर्ववत हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोनपेठ -पाथरी, गंगाखेड- सोनपेठ दोन तासाच्या अंतराने काही फेऱ्या सुरू झाल्या असून लांब पल्ल्याची औसा - सेलू बस पाच महिन्यानंतर मंगळवारपासुन पूर्ववत सुरू झाली आहे.
जिल्ह्याला जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाथरीचे प्र.आगारप्रमुख पानझाडे यांनी सोनपेठ-परभणी बस बसफेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. सोनपेठ -पाथरी मार्गे परभणी ही बस सोनपेठहून सकाळी ६ वाजता सोडण्यात येत असुन परभणीहून सोनपेठ मुक्कामी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान सोडण्यात येत आहे.याखेरीज पाथरी आगाराच्या सोनपेठला चार फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
गंगाखेड आगाराच्या शेळगाव मार्गावर सात फेऱ्या व नरवाडी मार्गावरून दोन फेऱ्या सोडण्यात येत आहेत.
जिल्हा अंतर्गत बस सुरू झाल्या असल्या तरी बाहेर जिल्ह्यातील बस अध्याप पूर्ववत सुरू झाल्या नाहीत, मागील चार दिवसापुर्वी सोडन्यात आलेल्या परळी-सोनपेठ बसफेऱ्याला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून दोन दिवसापासुन फेऱ्या काही दिवसासाठी रद्द केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी नुसार थोड्याच दिवसात टप्प्या-टप्प्याने बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती सा.सोनपेठ दर्शनशी भ्रमणध्वनीवर बोलताना परळीचे आगारप्रमुख आर.बी.राजपुत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रा.प.महामंडळाकडून सोडण्यात येत असलेल्या बस प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच टप्प्या-टप्प्याने सोडण्यात येतील,अशी माहिती सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना सोनपेठ बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सी.टी.कुलकर्णी यांनी दिली आहे.
पाथरी आगारासमोर आता खराब रस्त्याचे आव्हान
कोरोनाच्या संकटावर मार्ग काढत पाथरी आगाराने सुरू केलेली पाथरी - सोनपेठ बस खराब रस्त्यांमुळे आता दुहेरी संकटात सापडली आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार यामुळे सोनपेठ- पाथरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे ५० मिनिटाच्या प्रवासाला दीड- पावणेदोन तास लागत असून यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडले आहे.पाथरी रस्त्यावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments:
Post a Comment