Thursday, August 6, 2020

लालपरीत हजारोंची प्रवाशी संख्या शेकड्यांवर...! परभणी आगार ; उत्पन्नात 90 टक्के घट...

लालपरीत हजारोंची प्रवाशी संख्या शेकड्यांवर...! परभणी आगार ; उत्पन्नात 90 टक्के घट...



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पाठोपाठ वारंवार होणाऱ्या संचारबंदीने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची सेवासुद्धा पूर्णतः कोलमडली आहे.विशेषतः दररोज 20 ते 25 हजार प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या एसटीची लालपरी आता शेकड्यावर आली आहे.महामंडळाच्या परभणी आगाराअंतर्गत एसटीच्या सेवेवर लॉकडाऊनचा मोठा विपरित परिणाम झाला आहे. या आगारातुन परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम, सेलू, मानवत, पाथरी, जिंतूर,पूर्णा या तालुक्यात लालपरी धावते. परंतु अनलॉकच्या दुसऱ्या टप्यापर्यंतसुध्दा एसटीची सेवा काही टक्केसुध्दा पुर्ववत झाली नाही.विशेषतः सरकारी बंधने, त्यातच कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांनी फिरवलेली पाठ वगैरे गोष्टी परभणी आगाराच्या दृष्टीने मारक ठरल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांपासुनचे हे चित्र भविष्यात आणखीन किती दिवस अनुभवावे 
लागेल, याच चिंतेने आगाराच्या अधिकाऱ्यांना ग्रासले आहे.

लॉकडाऊनपुर्वी अशी होती स्थिती...

परभणी आगारात 70 बस आहेत. साधारण दिवशी या बसच्या 350 फेऱ्या होत असत. या फेऱ्यांच्या माध्यमातून साधारणतः 23 हजार 
किलोमीटरचा प्रवास होत होता. सरासरी 25 हजार प्रवाशी एसटीने प्रवास करीत. त्यातून एसटीला रोज साधारण 9 ते 10 लाखांच्या घरात उत्पन्न मिळत होते.

लॉकडाऊन नंतरची अशी स्थिती...

लॉकडाऊननंतर जिल्हाअंतर्गत सेवा बजावण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रवाशांना लालपरी त्यांच्या गावी सोडण्यासाठी तत्पर सेवेस सज्ज असतानाच कोरोनाच्या दहशतीने प्रवाशांनी लालपरीकडे पाठ फिरवली आहे. सद्यस्थितीत या बसेसमधुन दोन अंकी संख्येतच प्रवाशी प्रवास करत आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे.सद्यस्थितीत दररोज 60 ते 70 हजार रुपये इतकेच उत्पन्न परभणी आगाराच्या तिजोरीत जमा होत आहे. पुर्वीच हेच उत्पन्न दररोज दहा लाखाच्या आसपास असायचे. सरासरी तब्बल 90 टक्के तोटा सहन करत सेवा दिली जात आहे. 

लालपरी पुन्हा सज्ज...

लॉकडाऊन जसे शिथील झाले तसे शासनाच्या आदेशानुसार काही महिने आगारातच थांबलेली लालपरी बाहेर पडली. प्रथम परराज्यात जाणाऱ्यांना लालपरीने सेवा दिली. कोरोनामुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडले.नुकसान सहन करत, शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्थीच्या अधीन राहून पुन्हा उभारी घेण्यासाठी लालपरी सज्ज झाली. एका सीटवर 
एकच प्रवाशी बसवण्यासह कोरोनाचे नियम पाळत सोशल डिस्टिंसिंग ठेवत लालपरी आठवड्यातील पाच दिवस जिल्हाअंतर्गत सेवा देऊ लागली आहे. शनिवारी व रविवारी संचारबंदी लागू असलेल्या या दोन्ही दिवशी एसटीची सेवा बंद ठेवली जात आहे.

एसटीनेच प्रवास करा - दयानंद पाटील

दरम्यान, संचारबंदीच्या दिवशी पूर्णतः एसटी बंद ठेवत आहोत.सद्यस्थितीत सोमवार ते शुक्रवार या पाच दिवस सेवा दिली जात आहे.जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला प्राधान्य द्यावे, एसटीनेच प्रवास करावा, असे आवाहन परभणी आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी "सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना केले.

No comments:

Post a Comment