आयुक्तांकडून परभणी सिव्हिलचं पोस्टमार्टम
कोविड रुग्णालयास भेटः बाधितांबरोबर हितगूज
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर फोपावल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मंगळवारी (दि.11) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरला थेट भेट देवून कोरोनाबाधित रुग्णांबरोबर हितगूज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीतून आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हा रुग्णालयातंर्गत अनागोंदी कारभारावर अक्षरक्षः सडकून टिका केली. विशेषतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांची कठोर शब्दांत खरडमपट्टी काढली. जिल्हा रुग्णालयातंर्गत कोविड सेंटरमधील बाधित रुग्णांच्या तपासणीसह औषधोपचारातील दिरंगाईबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. आपण स्वतः फिजिशिअन आहात, परंतू कोविड सेंटरला आपण भेट सुध्दा देत नाहीत. बाधित रुग्णांची तपासणी तर दूर हितगुज सुध्दा करत नाहीत, खडेबोल सुनावून आपण जबाबदार अधिकारी आहात, आपत्तीच्या काळात संयमाने वागा, जबाबदारीचे भान राखा असे सुनावून कोविड सेंटरतंर्गत वैद्यकीय सुविधांचा अभाव, बाधित व्यक्ती आणि वैद्यकीय अधिका-यांमधील असमन्वय वगैरे गोष्टींवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोरोना सेंटरमधील अवस्थेबद्दल किस्सेस किस्से समोर आले आहेत, असे नमुद करीत आता सावध व्हा, कामात तत्परता दाखवा, जबाबदारीने वागा अन्यथा आपल्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा आयुक्त केंद्रेकर यांनी डॉ.नागरगोजे यांना दिला. जिल्हा रुग्णालयावर आपले नियंत्रण नाही. यंत्रणांमध्ये समन्वयक नाही, अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना आपण कामास लावू शकला नाहीत, असे सुनावून केंद्रेकर यांनी प्रत्येक गोष्टीतील हलगर्जीपणामुळे स्थिती दिवसेदिवस गंभीर होत आहे, असे नमुद केले.प्रत्येक वेळेस समस्या सांगून नेहमीचं रडगाण बंद करा, या शब्दांत आयुक्त केंद्रेकर यांनी डॉ.नागरगोजे यांची खरडमपट्टी केली.



No comments:
Post a Comment