Saturday, August 8, 2020

ऑगस्ट क्रांती दिन -स्वातंत्र्याची पूर्वसंध्या ..! सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने विनम्र अभिवादन

ऑगस्ट क्रांती दिन  -स्वातंत्र्याची पूर्वसंध्या ..!
सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने विनम्र अभिवादन 



सोनपेठ (दर्शन) :-

  ब्रिटिश सत्तेने देशभर पाया रोवल्यानंतर  अठराशे सत्तावन मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती. आणि संघटितपणे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा पुकारला गेला होता.
दुर्दैवाने स्वातंत्र्याची पहिली ठिणगी विझून गेली मात्र त्यातून निर्माण झालेली ज्वाळा सतत तेवत राहिली .१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनीही आपला राज्यकारभार मवाळ केला मात्र धाकदपटशा ,शोषण चालूच राहिले होते .1857 नंतर अनेक समाजसुधारकांनी सामाजिक सुधारणांना महत्त्व देत भारतीय जनमानस सुधारणांसाठी तयार केले. हाच कालखंड ब्रिटिशांविरुद्ध असंतोष तयार करण्याचा होता. टिळकांचे नेतृत्व उदयास आल्या नंतर भारतीय जनतेच्या असंतोषाला खऱ्या अर्थाने मोकळी वाट मिळाली. 1905 च्या बंगाल फाळणी विरुद्ध सारा देश एकवटला आणि इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध एक झाला .मात्र या आंदोलनात जनमानस पेटून उठले आणि संपूर्ण देशभर स्वदेशीचा नारा गुंजू लागला .1920 पर्यंत लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात देशाने इंग्रजांशी अथकपणे लढा दिला .लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 1920 मध्ये महात्मा गांधीजींच्या युगाला सुरुवात झाली.


महात्मा गांधीजींनी असहकाराचा नवा मंत्र दिला .गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्याची लाट देशभर पसरली .सर्वसामान्य जनता असहकाराच्या चळवळीत सहभागी झाली .सविनय कायदेभंगाने त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट झाली. ब्रिटिश सत्तेला शेवटचा हादरा देण्यासाठी व देश सोडून जा असा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी 8 व 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या "गवालिया टँक मैदानावर "भारतीय काँग्रेसचे महाअधिवेशन भरविण्यात आले होते.8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी "छोडो भारत "चा ठराव मांडला  बहुमताने तो ठराव मंजूर झाला .याच दिवशी अधिवेशनात महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना "चले जाव "चा अंतिम इशारा दिला आणि भारतीय बांधवांना "करेंगे या मरेंगे "चा महामंत्र दिला .9 ऑगस्ट पासून बिटिश सरकार विरुद्ध अद्भूत असे आंदोलन सुरू होणार होते .मात्र 9 ऑगस्टला पहाटेलाच ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आजाद, वल्लभभाई पटेल यासारख्या प्रमुख नेत्यांना अटक केली. यामुळे सारा देश संतापला. उस्फूर्तपणे मोर्चे निदर्शने झाली .शाळा ,दुकाने,ओस पडली, सरकारी वाहने, कार्यालय ,गोदामे, यांना  आगी लावण्यात आल्या.स्थानिक नेत्यांना, पुढाऱ्यांना सरकारने तुरुंगात टाकले .आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला ,गोळीबार केले .या गोळीबारात शिरीष कुमार सारखे असंख्य देशभक्त हुतात्मे झाले. या दडपशाहीविरुद्ध देशभर संतापाची लाट पसरली. अनेक गावातून मोर्चे, निदर्शने निघाली. लोकांनी स्वयंस्फूर्तीने दगडफेक, वाहने आडवुन, संदेश वाहक तारा तोडून आपली चीड व्यक्त केली .अनेक नेत्यांनी भूमिगत राहून या आंदोलनाला दिशा दिली. जयप्रकाश नारायण ,डॉक्टर राम मनोहर लोहिया, अरुणा असफ अली ,मेहर अली ,एस .एम .जोशी, ना.ग.गोरे इत्यादी समाजवादी नेत्यांनी गुप्तपणे देशभर दौरे करून जनमानस चेतविण्याचे काम केले .पत्रके काढून ,विद्युततारा तोडून ,रेल्वेमार्ग उखडून अनेक क्रांतिकारकांनी सरकारी यंत्रणा खिळखिळी केली. हुतात्मा भाई कोतवाल ,जनरल आवारी ,विठ्ठल जव्हेरी ,उषा मेहता यांनी गुप्तपणे प्रक्षेपण केंद्र सुरू करून सरकारला सळो की पळो करून सोडले. अनेक ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाली .लोकांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. ब्रिटिश सरकारला हा जबरदस्त हादरा होता. यापूर्वी भारतीय जनमानस अशा पद्धतीने एकवटले नव्हते .या आंदोलनात सर्व जातीधर्माचे स्त्री-पुरुष ,युवक-युवती व लहान मुले, मुली सहभागी झाली होती . या आंदोलनामुळे स्वातंत्र्य अधिक जवळ आले. त्यांना कळून चुकले की यापुढे भारतात  राज्यकारभार करणे शक्य नाही .या आंदोलनात स्वातंत्र्याची पूर्वसंध्या उगवली. एका अर्थाने भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेली  ही क्रांती होती. म्हणून या दिनाला " ऑगस्ट क्रांती" दिन असे म्हणतात.ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडणाऱ्या नाम-अनाम देशभक्तांना यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम .



No comments:

Post a Comment