'लावणी सम्राट' संगीतकार राम कदम - भारतकुमार राऊत
एक काळ असा होता की मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात भावगीते, भक्तिगीते यांचाच दबदबा होता. त्यामुळे अशा घरांत सुधीर फडके, यशवंत देव अशा संगीतकारांचीच नावे ठाऊक असायची. पण लावणी या अस्सल मऱ्हाटी ग्रामीण लोककलेला मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दिवाणखान्यांत पोहोचवून तिथे रुजवण्याचे काम संगीतकार राम कदम यांनी केले. त्यांचा आज जन्मदिन.
ग्रामीण मराठी चित्रपट संगीत सर्वत्र लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे.
'पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे.
दादा कोंडके यांच्या अस्सल 'दादा छाप' सिनेमांतल्या तशाच उडत्या चाली बांधणाऱ्या कदमांनी काही गंभीर संगीत रचनाही केल्या.
सांगली जिल्ह्यात मिरजेमध्ये जन्मलेल्या कदमांना बालपणीच संगीताने पछाडले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना रस्त्यावरच्या बँड पथकात काम करावे लागले पण त्यांनी ज़िद्द सोडली नाही.
मिरजेतील किराणा घराण्याचे उस्ताद करीम खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर कदम पठ्ठे बापुरावांकडे लोकसंगीत शिकू लागले. त्यांनी सुधीर फडकेंकडेही संगीताचे धडे घेतले.
कामाच्या शोधात वणवण करताना कदम व्ही. शांतारामांच्या प्रभात चित्र कंपनीत पोहोचले. तिथे त्यांना ॲाफिसबाॅयचे काम मिळाले. ते त्यांनी स्वीकारले. तिथेच चित्रपट संगीतातील त्यांच्या यशाचा पाया रचला गेला.
भालजी पेंढारकरांनी कदमांना स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन करण्याची पहिली संधी 'मीठ भाकर (१९४९) साठी दिली. कदमांनी प्रभातबरोबर पुढील नऊ वर्षे काम केले. त्यांचा 'गावगुंड' चित्रपट गाजला. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली 'सांगत्ये ऐका' या सिनेमाने.
व्ही शांतारामांच्या 'पिंजरा'तील प्रत्येक गीत गाजले. कदमांनी दोनशेहून अधिक चित्रपट गीतांना संगीत दिले व स्वत:ची चित्रपट निर्मितीही केली. जगदीश खेबुडकर, अनंत माने व कदम या त्रिकुटाने एक काळ अक्षरश: गाजवला.
ग. दि. माडगुळकर, पी. सावळाराम यांच्या शब्दांनाही त्यानी सूर दिले.
असे अस्सल मऱ्हाटमोळे राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुण्यात निधन झाले.
मराठी लावणीचे लावण्य खुलवून कदमांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. या दृष्टीने राम कदम हा असा एकमेव संगीतकार होता.



No comments:
Post a Comment