Friday, May 22, 2020

वादळापूर्वीची शांतता ? भारतकुमार राऊत

वादळापूर्वीची शांतता ? भारतकुमार राऊत


महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारविरुद्ध जनमताचा उद्रेक घडवून आणण्याचा भाजपचा पहिला डाव तरी फसला आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या 'मेरा आंगन मेरा रणांगण' आंदोलनाची हाक दिली खरी पण ती हवेतच विरूनही गेली. स्वत: पाटील व मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर हातात फलक घेऊन उभे राहीलेले देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे व चार-सहा दुय्यम फळीतील नेते वगळता या मोहीमेला कुठेच फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या अपयशाची जबाबदारी राज्यातील शीर्ष नेत्यांनी घ्यायलाच हवी.

याचा अर्थ जनतेला हे काही चालले आहे, तेच मान्य आहे, असा नाही. पण जनभावना कृतीत परावर्तित करण्यासाठी ज्या कल्पक व समर्थ नेतृत्वाची व कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीची आवश्यकता असते, त्यांचा कमालीचा अभाव आज दिसला.

दुसरे असे की आज कोरोनाशी लढतानाच जनतेची इतकी दमछाक होत आहे की त्या पलिकडे जाऊन आंदोलन करण्याची कुणाची मानसिक तयारी नाही. त्यासाठी जे काम करावे लागते, ते करण्याची इच्छाच ज्येष्ठ मंडळींत नाही. मग आंदोलन सफल कसे व्हायचे? असो.

पण आता 'जीतं मया' चे चित्कार करत सत्ताधाऱ्यांनी स्वस्थ बसणे हेसुद्धा आत्मघातकी ठरेल. कोरोनाबाधितांचा व मृत्यूंचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. नोकरशाही निपचित पडून आहे व पोलिसांची दमछाक होत आहे. सरकारमधील चार-पाच मंत्री वगळता बाकी सर्व आपापल्या गावांत किंवा बंगल्यांत स्वस्थ आहेत.

आता रेल्वे सुरू होईल; विमानेही उडू लागतील. पण याचा अर्थ आपण कोरोनाला हरवले, असा होत नाही. उलट त्यामुळे आपण कोरोनापुढे गुढघे टेकून शरणागतीचं पांढरा निशाण फडकावले, असा अर्थ निघतो.

विरोधकांच्या चुकांमुळे हा गेम सरकार पक्षाने जिंकला, हे खरे पण सामना अद्याप संपलेला नाही. ही केवल वादळापूर्वीची शांतता आहे!!

 

No comments:

Post a Comment