परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या धर्तीवर सुध्दा सटर फटर वाळू माफियांचा धूमाकुळ
(पावसाळ्यापूर्वी वाळू साठविण्याची स्पर्धा)
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
एकापाठोपाठ एक कोरानाबाधित रुगण आढळत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात शासकीय यंत्रणेसह सर्वसामान्य नागरीक पूर्णतः हादरला असतांना वाळूमाफियांनी मात्र शासकीय यंत्रणा कोरोना युध्दात गुंतल्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रात जेसीबी मशीन, प्रचंड क्षमतेचे टिप्पर तैनात करीत मोठा धूमाकुळ सुरु केला आहे.
या जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून वाळू माफियांचा धूमाकुळ सुरु आहे. सोनपेठ, गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात या वाळू माफियांद्वारे शेकडो जोसीबी मशीन तसेच शेकडो टिप्पर तैनात करीत रात्री - बेरात्री मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. विशेषतः पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त वाळू साठवणूकीकरीता या वाळू माफियांनी चंग बांधला आहे. सरकारी यंत्रणा पूर्णतः कोरोनाविरुध्दच्या लढाईत गुंतल्याचे ओळखून या वाळू माफियांनी लॉकडाऊन पूर्णतः कॅश करण्याचा सपाटा लावला आहे.
नदी काठावरील गावातील काही उपद्रवी, काही सरकारी कर्मचारी, पोलीस खात्यातील काही कर्मचार्यांच्या भक्कम अशा सहकार्याने वाळूचा दररोज तूफान उपसा सुरु आहे. विशेषतः रात्री-बेरात्री आडवळनावरील गावांमधून मोठ्या प्रमाणावर टिप्परद्वारे वाळूची वाहतूक करीत शेता-शेतांमधून ही वाळू साठविली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रागसुधा आर. यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने वाळू माफियांविरोधात मोठे हत्यार उपसले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाथरी तालुक्यातील कारवाई होय. लिंबा या गावी गोदावरी नदीच्या पात्रालगत तालुक्यातील काही वाळू माफियांनी 125 ब्रास वाळूचा साठा साठविला होता. जिल्हा पोलीस यंत्रणेने तो साठा अचानक छापा मारुन तो साठा जप्त केला. महसूल प्रशासनाच्या स्वाधीन केला. जवळपास लॉकडाऊनच्या काळात पावणेदोन कोटी रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. या वरुनच वाळू माफियांनी या दोन महिन्यात काठावरील तालुक्यात सुरु केलेल्या लुटमारीची बाब सहजपणे लक्षात येईल. वाळू माफियांमागे एक साखळीच कार्यरत असून सत्तारुढ व विरोधी पक्षातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आशिर्वादही महत्वपूर्ण ठरला आहे.

No comments:
Post a Comment