Friday, May 15, 2020

जिल्हावासियांनी घाबरून जावू नये व अफवांना बळी पडू नये - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर ; 3 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीची प्रकृती स्थिर (आज रोजी 19 स्वॅब तपासणीसाठी पाठविले)

जिल्हावासियांनी घाबरून जावू नये व अफवांना बळी पडू नये - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर ; 3 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीची प्रकृती स्थिर 
(आज रोजी 19 स्वॅब तपासणीसाठी पाठविले)


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रकारे सुसज्ज असून जिल्हावासियांनी घाबरुन जावू नये तसेच अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे .
      गुरुवार दि .१४ मे २०२० रोजी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या स्वॅब अहवालानुसार जिंतुर तालुक्यातील शेवडी गावातील एकाच कुंटुबातील ३ व्यक्तींपैकी एक महिला वय ३० वर्ष व दोन मुले वय अनुक्रमे ९ व ५ वर्ष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असुन संबधितांना परभणी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात वैद्यकिय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तिनही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. हे कुटुंबिय मागील जवळपास तीन महिन्यापासुन मुंबई येथे वास्तव्यास होते. या कुटुंबातील कुंटुबप्रमुखाचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे.
         कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचे रहिवास असलेल्या जिंतुर शहरानजीकचा शेवडी भाग केंद्रस्थानी ठेवुन सभोवतालचा ३ किलोमीटर परिसर सिल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यालयामार्फत पथक तयार करण्यात आले असून सील केलेल्या परिसरातील प्रत्येक घरात सर्वेक्षणाचे  काम सुरु झाले आहे. शुक्रवार दि. १५ मे २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १ हजार २४१ व आज दाखल १९ असे एकुण १ हजार २६० संशयित व्यक्तींची नोंद झाली आहे. तर आज रोजी एकुण १९ स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
             -*-*-*-*-

No comments:

Post a Comment