Tuesday, June 23, 2020

कोरोना नियंत्रणास संयुक्त प्रयत्न सहाय्यभूत रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा राज्यात दुसरा

कोरोना नियंत्रणास संयुक्त प्रयत्न सहाय्यभूत 
रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा राज्यात दुसरा
परभणी, दि.23(प्रतिनिधी)- 
या जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुच्या नियंत्रणास महसुल प्रशासनासह जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः जिल्हा पोलिस यंत्रणेसह अन्य शासकीय यंत्रणांचे सामुहिक प्रयत्न तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींची सकारात्मक भुमिका, स्वयंसेवी संस्था, संघटना, मित्रमंडळांची सक्रीयता व नागरिकांची सतर्कताच या जिल्ह्यात कारणीभूत ठरली आहे. 
राज्यातील काही भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः यात कोल्हापुर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 90.4 इतका राहिल्याने तो जिल्हा अव्वल स्थानावर आहे. त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्याचाही रिकव्हरी रेट 87.1 राहिल्याने जिल्हा दुस-या स्थानावर आला आहे. तर मराठवाड्यात परभणी प्रथम क्रमांकावर आला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील (पुणे) यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे जिल्हावार प्रमाण सोमवारी (दि.22) जाहीर केले.
गेल्या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाही परभणीत रुग्ण संख्येचे प्रमाण त्याप्रमाणात वाढलेले नाही. आतापर्यंत 98 रुग्णांची नोंद झाली असून त्यात केवळ तीघांचा मृत्यू झाला आहे. 90 रुग्णांची सुटका झाली आहे तर 5 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येने प्रमाण व त्यात दिवसांचा फरक हा मोठा राहिला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातूनच ग्रीनझोनमध्ये हा जिल्हा होता. दुस-या टप्प्पाच्या अखेरीस पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लॉकडाऊनच्या बाबतीत सुरुवातीपासूनच कठोर भुमिका स्विकारल्या. विशेषतः अन्य जिल्ह्याच्या तुलनेत पोलिसांच्या भक्कम सहकार्याने सर्वप्रथम जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या.पाठोपाठ कठोर असे नियम लागू केल्याने व त्यात गरजेनुसार शिथिलता दिल्याने अनलॉकच्या पहिल्या टप्प्यापर्यंत या रोगाचा फारसा प्रादुर्भाव आढळला नाही. प्रामुख्याने पुणे, मुंबई व अन्य राज्यातून आलेल्या रुग्णांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या नागरीकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. 
जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली महसुल यंत्रणा विशेषतः निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच अन्य विभागप्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षासह नऊ तालुक्यांच्या तहसीलदारांसह अऩ्य अधिकारी, कर्मचारी अडीच-तीन महिन्यांपासून कोरोनाविरूध्दचा लढाईत कार्यरत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, डॉ.रिजवान काजी, डॉ.किशोर सुरवसे, डॉ.दुर्गादास पांडे, डॉ.दिनाजी खंदारे, डॉ.योगिता नरवाडकर, डॉ.कलबरकर,डॉ.मृण्मयी मोरे,डॉ.जयश्री यादव, डॉ.केंद्रेकर,डॉ.विशाल चौधरी,डॉ.कल्याण कदम,डॉ.अनिल कान्हे, डॉ.किरण सगर, डॉ.मनिषा राठोड, डॉ.तेजस तांबोळी, डॉ.रहेमत, डॉ.खाजा खान,  जिल्हा शासकीय रुग्णालयातील वार रूममधील मंगेश जोशी, किशोर गऊळकर, शरद कदम, अच्युत चौधरी, माऊली काळे, आनंद पाईकराव, अधिसेविका रजनी पडदुणे, पारिचारिका अल्का आखाडे, फातेमा, हटकर, मुकाद्दम सय्यद खालेद,सुभाष कंडेरे यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी तसेच डॉ.रामेश्‍वर नाईक,डॉ.रुपेश नगराळे तसेच त्या-त्या तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांचे अहोरात्र प्रयत्न निश्‍चीतच कोरोना नियंत्रणासाठी कारणीभुत ठरले आहेत. 
जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलिस अधीक्षक रागसुधा आर, सहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी संबंधीत ठाण्यांचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार तसेच अन्य कर्मचारीही कोरोना विरूध्दच्या लढाईत आजही कार्य्रत आहेत.  जिल्ह्याच्या सीमेवरील 12 पॉईट तसेच सीमालगतच्या 83 गावांच्या ठिकाणचे पेट्रोलिंग महत्वपूर्ण ठरले आहे. 
परभणी महानगरात शहर पोलिस यंत्रणेतंर्गत अधिकारी, कर्मचा-यांची कामगिरीही वाखण्याजोगी राहिली आहे. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार, विद्यमान आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग,अग्निशामक दल तसेच तालुक्या स्थानच्या नगरपालिकांनी गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समयसूचकता दाखविली आहे. 
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश खंदारे व अन्य अधिकारी, कर्मचा-यांची विशेषतः अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणाची भुमिकाही लक्षणीय राहिली आहे. 

जनतेच्या सहकार्यामुळेच यश- मुगळीकर
कोरोना प्रादुर्भावाच्या उपाययोजनेसाठी प्रशासकीय स्तरावर त्रिस्तरीय व्यवस्था आखण्यात आली. लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. अजूनही जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरीकांचे मोठे सहकार्य प्रशासनाला लाभल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यश आले. पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर हायरीस्क कॉन्टॅक्टमधील लोकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याने संपर्क टाळल्या गेला. इतरांशी संपर्क न होण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्या दृष्टीने वर्गवारी करुन उपाययोजना करण्यात आल्या. सरकारी व खासगी डॉक्टरांच्या योगदानामुळेच जिल्हा परिस्थितीवर नियंत्रण करु शकला, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर म्हणाले.

No comments:

Post a Comment