Monday, June 8, 2020

गंगाखेड धान्य प्रकरणात गुुन्हे दाखल ; विजयकुमार शर्मासह ट्रकचालकावर विविध कलमानवे अखेर गुन्हा दाखल

गंगाखेड धान्य प्रकरणात गुुन्हे दाखल ;
विजयकुमार शर्मासह ट्रकचालकावर विविध कलमानवे अखेर गुन्हा दाखल



गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-

शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी विजयकुमार शर्मा यांच्या श्रध्दा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामावर महसुल व पोलिस प्रशासनाने शनिवारी रात्री(दि.6) संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यातून राशनचा गहू अन् तांदळाचा साठा जप्त केला. याप्रकरणात सोमवारी(दि.8) गंगाखेड पोलिस ठाण्यात व्यापारी विजयकुमार शर्मा व ट्रकचालक मुरलीधर शिवाजी बेले या दोघां विरूध्द विविध कलमान्वये सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, संगनमत करून गोरगरीबांना पुुरवठा झालेला शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ बेकायदेशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी खरेदी करून विक्री करण्यासाठी साठविल्याबद्दल पोलिस कर्मचारी राजेश रमेश मस्के यांच्या फिर्यादीवरून या दोघां विरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक वाय.एन.शेख या प्रकरणात तपास करीत आहेत.
सहा जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गव्हाच्या पोत्याने भरलेला एक ट्रक क्रमांक(एम.एच.-22-एच-1814) शहराबाहेर जात होता. त्या ट्रकमधला गहू राशनचा असल्याचा कानोसा पोलिसांना लागला. गंगाखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाय. एन. शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक कोकाटे, पोलिस कर्मचारी मस्के, उमर व पठाण यांनी तो ट्रक थांबवून चौकशी सुरू केली. ट्रक चालक मुरलीधर बेले याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने ट्रकसह ट्रकमधील मालाची कागदपत्रे नसल्याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. ट्रक चालक बेले याने श्रध्दा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामातून आपण ट्रकद्वारे पोते घेवून बाहेर निघाल्याची माहिती दिली. संशय दृढ होताच पोलिसांनी महसुल प्रशासनाच्या अधिका-यांच्या ती बाब तात्काळ निदर्शनास आणली. तेव्हा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलिस निरीक्षक शेख यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास थेट गोदाम गाठून तपासणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ती तपासणी सुरू होती. गोदामात गहु आणि तांदूळाचा साठा असल्याचे गोदाम मालकाने शर्मा यांनी म्हटले होते. प्रशासनाने पहाटे पर्यंत धान्य खरेदी-विक्रीच्या पावत्याची चौकशी सुरू केली. तेव्हा गोदाम मालकाने आपणास राशनच्या दुकानावरून उचलेला गहू आणि तांदूळ काही नागरिकांनी आणून विकल्याचा खुलासा केला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी त्या अनुषंगाने यंत्रणेमार्फत आपण तपास करीत आहेत, असे सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना रविवारी नमुद केले होते.पाठोपाठ सोमवारी तो साठा बेकायदेशीरपणे खरेदी करून विक्रीसाठी साठविल्याचे निष्पन्न झाल्याने यंत्रणांनी व्यापारी विजयकुमार शर्मा व ट्रकचालक मुरलीधर बेले यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment