कापसाच्या गाड्या एसएमएस आल्याशिवाय आणू नका - जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतक-यांनी संबंधीत बाजार समितीकडून एसएमएस किंवा मोबाईलवर निरोप आल्याशिवाय कापसाच्या गाड्या आणू नयेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सोमवारी(दि.22) सायंकाळी काढलेल्या एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
ज्या शेतक-यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कापूस विक्री संदर्भात एसएमएस किंवा मोबाईलवरून जोपर्यंत कळविण्यात येत नाही तोपर्यंत संबंधीत शेतक-याने कोणतेही वाहन बाजार समितीच्या आवारात किंवा जिनिंगसमोर असलेल्या रस्त्यावर आणून उभे करू नये, असे जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी म्हटले आहे.
एसएमएस किंवा मोबाईलवरून मेसेज आल्याशिवाय जे शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून येतील, अशा शेतक-यांना बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारचे टोकन दिले जाणार नाही. तसेच पणन महासंघामार्फत संबंधीत शेतक-यांचा कापूस ही खरेदी केला जाणार नाही, असेही उपनिबंधक सुरवसे यांनी नमुद केले असून जे शेतकरी अशा पध्दतीने खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून येतील, त्यांच्या वाहनांचा खर्च व इतर निर्माण होणा-या अडचणी संदर्भात संबंधीत वाहनधारक व शेतकरीच जबाबदार राहील तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत वाहन आणणारे जबाबदार राहतील, असा इशाराही सुरवसे यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment