महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती ; “माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.”–यशवंतराव चव्हाण.
सोनपेठ (दर्शन) :-
_महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।_
_मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले।।_
_खरा वीर वैरी पराधीनतेचा।_
_महाराष्ट्र आधार या भारताचा।।_
महाराष्ट्राचा देशाला केवढा आधार आहे, याचं वर्णन करणार्या सेनापती बापटांच्या कवितेच्या या ओळी. त्या सार्थ केल्या यशवंतराव चव्हाणांनी. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेले. महाराष्ट्राच्या गैरवशाली इतिहासात त्यानी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचे हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हते. तर हा नेता होता, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता.
‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.
मार्च १२, इ.स.१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.
१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना त्यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.
यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली. "माणसे शेवटी जी मोठी होतात, ती निव्वळ मोठ्यांच्या पोटी जन्माला येतात म्हणून नव्हे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मिळणारे मोठेपण आता जुन्या इतिहासात जमा झाले आहे. आधुनिक काळात समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक आव्हाने निर्माण होत असतात. त्यांचा धैर्याने स्वीकार करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा जी माणसे प्रयत्न करतात, तीच माणसे मोठी होतात.”
- यशवंतराव चव्हाण
----------------------------------------------------------------------
नुकत्याच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रापुढे आणि महाराष्ट्रापुढे उभ्या असलेल्या आभाळाएवढ्या प्रश्नांना,आव्हानांना भिडून नवे राष्ट्र, नवा महाराष्ट्र,नवा समाज घडवणार्या यशवंरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यकतृत्वाला मानाचा मुजरा!

No comments:
Post a Comment