कै.राजीव गांधी अनु. जा.- ज.निवासी मा. आश्रम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात ! ; नयनरम्य आदाकारी, संगीतमय व नाविन्यपूर्ण नृत्याविष्काराने विद्यार्थ्यांनी गाजवला रंगमंच
● _विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ - रामप्रसाद यादव_ ●
सोनपेठ (दर्शन) :-
आकर्षक रंगमंच, कर्णमधूर ध्वनीक्षेपन यंत्रणा, प्रकाशयोजनेचे सुंदर मिश्रण व उत्तम संयोजनातून एक दर्जेदार कलाविष्कार प्रेक्षकांना पहावयास मिळाला. नयनरम्य आदाकारी, संगीतमय नजराणा व नाविन्यपूर्ण नृत्याविष्काराने विद्यार्थ्यांनी रंगमंच गाजवला व विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फेडले.कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात साजरे झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हे व्यासपीठ ठरल्याचे मनोगत यावेळी सरपंच रामप्रसाद यादव यांनी व्यक्त केले.
कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था खडका संचलित कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात व जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ' झेप पाखरांची घरटे सहिसलामत ' या नाटकासह विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले.पालक मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलनास अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे हे होते. उद्घाटन खडका येथील सरपंच रामप्रसाद यादव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील वैजनाथ यादव, मुरलीधर यादव, अशोक यादव, संस्थेचे कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, जि. प.शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम सावंत, शाळेचे मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रशांत शिंगाडे यांचे 'व्यक्तीमत्व विकासात महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान झाले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने, सहशिक्षक आर. बी. जोशी यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रम ,प्रगती व निवासी व्यवस्था आदीबाबत माहिती दिली. पालकांनी मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करुन समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना शाळेचे विद्यार्थी घडवून शाळा नावारूपाला आणण्यासाठी संस्था कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.
सूत्रसंचालन एस. डी. जालमिले, विजय महाजन, डी.एम. माने, आर. बी. जोशी यांनी केले. कार्यक्रमाला पालक, नागरिक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने.
या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे डी. एम. माने प्रस्तुत व दिग्दर्शित ' झेप पाखरांची घरटे सहिसलामत ' नाटकाचा प्रयोग व नृत्याविष्काराचा एकत्रित प्रयोग ठरला. प्रत्येक गाण्यावर छोट्या लेकरांची अलगद, सहज थिरकणारी पाऊले पाहून पाहुणे व उपस्थित पालक हरखून गेले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणारा व भारतीय संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन घडविणारा रंगारंग असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात नृत्याविष्कारा सोबत राष्ट्रभक्तीपर गीत , लावणी , सिनेगीत , गोंधळ आदींवर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले .या कार्यक्रमाच्यासादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमाला पालक, नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
■■■■■■■■■






No comments:
Post a Comment