परळी वै 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा
शंभु महादेवाच्या वाघाच्या काठीची मिरवणुक कोरोना वायरसच्या धर्तीवर रद्द!
परळी / सोनपेठ (दर्शन) :-
150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेल्या परळी वैजनाथ येथील शंभू महादेवाच्या वाघाची काठी व कावड ची मिरवणूक कोरोना वायरसच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी रद्द करण्यात आली आहे.
चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी (मठपतींच्या) घरी उभ्या राहणाऱ्या वाघाच्या काठीची व कावडीची दिवसभर पूजा करून दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच साखरेच्या गाठीच्या हाराचा चा पहिला मान शंभू महादेवाच्या काठीला देऊन ती इतरांना दिली जाते.
संध्याकाळी जुन्या परळी विभागातून सवाद्य मिरवणूक काढली जाते त्यावेळी घरोघरीच्या महिला आपल्या घरासमोर महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा-आरती करून स्वागत करीत असतात व महादेवाचे शिवभक्त ही 23 ते 25 फूट उंच असलेली महादेवाची काठी एका हाताच्या तळ्व्यावर लीलया उचलून नाचवीत असतात व याच आनंदाच्या उत्साहात ती काठी व कावड देशमुखपार येथील देशमुख परिवाराच्या वाड्यावर ( गढीवर ) नेऊन उभी केली जाते. एकादशी पर्यंत काठी व कावडीचा मुक्काम देशमुख परिवार कडेच असतो. एकादशीला प्रभु वैद्यनाथाची भेट घेऊन काठी व कावडी चे पुन्हा स्वामी ( मठपती ) परिवाराचे घरी आगमन होते अमावस्येपर्यंत गावातील शिवभक्त सवडीप्रमाणे आंबिल आणि घुगऱ्या नैवेद्य करून काठीस आणून दाखवितात व अमावस्येला स्वामी परिवाराकडून महाअंबिली चा प्रसाद केला जातो व या महिनाभराच्या उत्सवाची सांगता होत असते. याच कालावधीत स्वामी परिवार हे वाघाची काठी व कावड घेऊन शंभू महादेवाच्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूर येथे जात असतात.
यावर्षी कोरोना व्हायरसने घातलेला धुमाकूळ व प्रशासन करत असलेल्या उपाययोजनेस अनुकूल राहण्यासाठी महादेवाची काठी स्वामी परिवार जंगम गल्ली गणेशपार येथे विधिवत उभी केली जाईल व मिरवणूक न काढता स्वामी यांच्या घरीच विराजमान राहील संचारबंदीमध्ये शंभू महादेवाच्या पूजेचा खंड पडू नये यासाठी या वर्षाकरिता हा निर्णय घेतल्याचे श्री दयानंद स्वामी मठपती व श्री अमृत शंकरराव देशमुख यांनी संयुक्त पणे जाहीर केले.

No comments:
Post a Comment