Friday, March 6, 2020

श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे.यासाठी हा विशेष लेख...

श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे.यासाठी हा विशेष लेख...


सोनपेठ (दर्शन) :- 

महान समन्वयाचार्य श्रीरेणुकाचार्य
जगातील धर्मांमध्ये वीरशैव हा एक प्राचीन धर्म मानला जातो. या धर्माला प्राचीन इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभलेली आहे. इष्टलिंगधारणेच्या वीरव्रताचे प्रबोधन करणारा, शरीर हेच शिवालय असे प्रतिपादन करणारा, पंचसूतके नाकारणारा, अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समन्वय साधण्याचा उपदेश करणारा, लिंगदीक्षेमध्ये वर्ण-जाति-लिंगभेद न पाळणारा, लिंगांगसामरस्यबोधक विद्येत रममाण व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म होय. या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून, तिच्या जातीचा विचार न करता दीक्षा दिली जाते. दीक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो. 

या धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु-लिंग-जंगमांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अन्नदेखील शिवार्पित करून, प्रथम भुकेल्यास देऊन नंतर स्वत: ग्रहण करण्यास सांगितले आहे. अशी शिकवण देणारा जो धर्म आहे त्याला ‘वीरशैवधर्म’ म्हणतात. या धर्मालाच समाजात ‘लिंगायत’ असे पर्यायनाम असून वीरशैव व लिंगायत हे भिन्न आहेत असा प्रचार करणारे दिशाभूल करतात असे समजले पाहिजे. 

वेद, अागम व उपनिषदांतून वरील तत्त्वांचे प्रतिपादन केलेले आहे. ही तत्त्वे लोकमनात बिंबवण्यासाठी शिवाच्या आज्ञेने पंच शिवगणांनी लिंगांतून प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते. हे पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून हेच वीरशैवधर्माचे संस्थापक होत. या शिवगणांनी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर व पंचाक्षर या नावांनी; त्रेतायुगात एकवक्त्र, द्विवक्त्र. त्रिवक्त्र, चतुर्वक्त्र व पंचवक्त्र या नावांनी; द्वापरयुगात रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण व विश्‍वकर्ण या नावांनी आणि कलियुगात रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य व विश्‍वाराध्य या नावांनी अवतार घेतला. पंचाचार्यांनी रंभापुरी, उज्जयिनी, केदार, श्रीशैल व काशीक्षेत्र येथे पंचपीठांची स्थापना केली. ही वीरशैवांची राष्ट्रीय महापीठे होत. 

पंचाचार्यांच्या या दिव्य परंपरेतील श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य हे रंभापुरी पीठाचे आचार्य होते. फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला तेलंगणा प्रांतातील सुप्रसिद्ध कोल्लिपाकी क्षेत्रातील सोमेश्‍वर महालिंगातून ते प्रादुर्भूत झाले. या प्रदेशाला ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’त त्रिलिंग देश असे म्हटले आहे. श्रीशैलमल्लिकार्जुन, कोल्लिपाकी सोमेश्‍वर आणि द्राक्षाराम क्षेत्रातील भीमनाथ (रामनाथ) ही तीन लिंगे या प्रदेशात असल्यामुळे याला त्रिलिंग देश असे म्हटले जात असे. याशिवाय इष्टलिंग, प्राणलिंग व भावलिंग या त्रिलिंगांची पूजा करणार्‍या वीरशैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलिंग देश म्हणतात, असेही एक मत आहे. विशेष म्हणजे सोमेश्‍वरलिंगातून रेणुकाचार्य, भीमनाथलिंगातून एकोरामाराध्य व मल्लिकार्जुनलिंगातून पंडिताराध्य यांचा उद्भव झाल्यामुळे ही तीनही लिंगे वीरशैवांची श्रद्धास्थाने होत. 

सोमेश्‍वरलिंगातून प्रादुर्भूत झाल्यावर श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य आकाशमार्गाने मलयपर्वतावर गेले आणि तेथे अगस्त्य महर्षींना त्यांनी शिवाद्वैताचा उपदेश केला. तोच उपदेश श्रीशिवयोगी शिवाचार्यांनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’ या ग्रंथात ग्रथित केला आहे. महर्षी अगस्त्यांनी प्रत्यक्ष श्रीरामाला आदित्यहृदय-कवचाचा उपदेश केला होता. अशा थोर अगस्त्य ऋषींना दीक्षा देऊन आणि शिवाद्वैताचा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरू रेणुकाचार्यांनी दूर केला. यावरून जगद्गुरू श्रीरेणुकाचार्यांचे थोरपणही सहज लक्षात येते. 

जगद्गुरू श्रीरेणुकाचार्यांनी जो उपदेश केला त्याचा सारांश अशाप्रकारे सांगता येईल. धर्म हा आचरणासाठी असतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप व ध्यान यांचे आचरण करणे म्हणजे धर्म होय. धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो आणि व्यक्तित्व विकसित झाल्यामुळे समाजाचे कल्याण साधते. धर्माचरण करताना अन्य धर्मतत्त्वांचे खंडन करू नये. शिवदीक्षा घेतलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. जीवाचा आध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभाव प्राप्त व्हावा यासाठी षट्स्थलांचे आचरण करावे. षट्स्थलातील १०१ उपस्थले म्हणजे मानवी मनाचा क्रमबद्ध विकासच होय. 

जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षींना पडविडी सूत्राचा उपदेश केला. पडविडी म्हणजे पदविधी. श्रीगुरूला शरण गेल्यानंतरच कोणतेही तत्त्व प्राप्त करून घेता येते, असा या सूत्राचा अर्थ होय. दीक्षाविधी स्पष्ट करताना सामाजिक असमानता दूर करण्याचा त्यांनी जसा उपदेश केला त्याप्रमाणेच सोपाधिक, निरुपाधिक व सहज असे दानप्रकार सांगून आर्थिक असमानता दूर करण्याचीही शिकवण दिली. याशिवाय जे लोक शिवयात्रा करतात त्यांच्यासाठी अन्न व जलाची व्यवस्थाही करण्यास सांगितले. 

श्रीरेणुकाचार्य हे एक महान पुरुष होते. शुद्धाचरण, शुद्ध विचार आणि अष्टमहासिद्धी या गुणांनी ते संपन्न होते. तीन कोटी आचार्यांची रूपे धारण करून त्यांनी श्रीलंकेत त्रिकोटी लिंगस्थापना केली. असे ते महासिद्ध पुरुष होते. त्यांनी कलियुगात रेवणसिद्ध या नावाने अवतार घेतला. आद्य शंकराचार्यांना लिंगप्रदान केले, कोल्हापूरच्या गोरक्षराजाचे गर्वहरण केले, कांचीमध्ये वरदराजमूर्तीचे शिरकंपन थांबविले, अशा त्यांच्या अनेक चमत्कारकथा ‘रेणुकविजयपुराणा’त वर्णिलेल्या आहेत. 

सर्व वीरशैवांनी अवश्य साजरा केली पाहिजे. त्यांनी जो महान उपदेश केला त्याबद्दल त्यांना मानवंदना दिली पाहिजे. याशिवाय प्रत्येक पीठात त्या त्या पीठाचार्यांचे उत्सव साजरे होतात. परंतु सर्व पीठाचार्यांनी एका व्यासपीठावर येऊन समाजाचे व शासनाचे सहकार्य घेऊन पाचही आचार्यांचा प्राकट्यमहोत्सव साजरा केला पाहिजे.

No comments:

Post a Comment