सोनपेठ (दर्शन) :-
परमपूज्य पदवाक्यप्रमाणपारावारपारद्रष्टे पूजनीय काशीज्ञानसिंहासनाधीश जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व आनंदवननिवासी ज्योतिर्मयस्वरूप भगवान विश्वनाथाचे चरणी नतमस्तक होतो. तसेच ज्ञानसिंहासनाचे आद्य आचार्य जगद्गुरू विश्वाराध्यांपासून अविरत चालत आलेल्या परंपरेस कोटी कोटी प्रणिपात. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वेदान्ताचार्य गुरू सिद्धलिंग शिवाचार्य व उद्घाटक मा. शिवराज पाटील चाकूरकरसाहेब आणि वीरशैव साहित्यप्रेमी बंधु-भगिनींनो...
परमपूज्य काशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र व दिव्य सान्निध्यात वीरशैव गुरुकुल शताब्दिवर्षात, आज भारतातील या प्राचीन व पवित्र शहरात, वीरशैवांचा हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणार्या ‘जंगमवाडी’ मठात चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे आपल्या सर्वांच्या साक्षीने भव्य, दिव्य स्वरूपात उद्घाटन झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आणि संमेलनाध्यक्षपदाचाही बहुमान आपण दिला, त्याबद्दल मी धन्य झालो आहे. हा बहुमान माझ्यासारख्या एका साध्या अभ्यासक-संशोधकाला दिला, त्यासाठी मी आपला सर्वांचा शतश: ऋणी आहे.
यापूर्वीची तीन संमेलने अनुक्रमे लातूर, साखरखेर्डा व धारेश्वर या ठिकाणी प्रा. डॉ. शे. दे. पसारकर, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर व प्रा. डॉ. भी. शि. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाली आहेत. येथे होत असलेले हे संमेलन महाराष्ट्राबाहेर वाराणसी या पुण्यपावन नगरीत, वीरशैवांच्या अस्मितेचा मानदंड असलेल्या ‘जंगमवाडी’ मठात होत आहे. खर्या अर्थाने या संमेलनाने अखिल भारतीय स्वरूप धारण केले आहे. अशा या पवित्र ठिकाणी भरणार्या संमेलनाचे अध्यक्षपद देऊन परमपूज्य श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींना व संमेलन आयोजन समितीला मी मनापासून धन्यवाद देतो. हा बहुमान स्वीकारताना मी माझ्या आई-वडिलांचे, शांतलिंग स्वामी शिखरशिंगणापूरकरापासून ते शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्यांपर्यंत, पारलिंग प्रभुअय्या-बामणगावकरांपासून ते डॉ. चंद्रशेखर कपाळेपर्यंत, धर्मवीर देशिकेंद्र महाराजापासून ते मोगलेवारांपर्यंत व डॉ. राम तोंडारेपासून ते डॉ. शे. दे. पसारकरापर्यंतच्या सर्व शिवाचार्य, अभ्यासक, संशोधक, संपादक, प्रकाशक यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. तसेच अगदी परवापर्यंत आपल्यात असलेले व नुकतेच शिवैक्य पावलेले आमचे मित्र आनंद कुंभार यांना अंत:करणपूर्वक श्रद्धांजली वाहतो. लातूरपासून धारेश्वरापर्यंत झालेल्या सर्व संमेलनांत त्यांचा सहभाग होता. आज ते आपल्यात नाहीत. त्यांची उणीव प्रकर्षाने भासते.
*काशीपीठ आणि महाराष्ट्र*
काशीपीठातर्फे यापूर्वी २००८ साली वीरशैवांचे सर्वभाषिक संमेलन डॉ. एम. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. त्यात मीही सहभागी झालो होतो. काशीपीठाचा महाराष्ट्राशी प्राचीन काळापासून संपर्क आहे. लिं. जगद्गुरू शिवलिंग शिवाचार्य (८२ वे जगद्गुरू) आणि लिं. जगद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य (८३ वे) हे दोन जगद्गुरू महाराष्ट्रातील अनुक्रमे सोलापूर व तासगाव या मठसंस्थानचे अधिपती होते. ८४ वे लिं. जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य हे तेलंगणा भागातून (मोगलाई) आले होते. ८५ वे जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य आणि ८६ वे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हे कर्नाटकातील असूनही हे उभयता महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी मानतात. लिं. जगद्गुरू शिवलिंग शिवाचार्य व त्यानंतरचे लिं. पंचाक्षर शिवाचार्य यांनीच प्रथम महाराष्ट्रात संचार करून धर्मजागृती घडवून आणली. लिं. जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य हे प्रकांड पंडित होते. त्यांनी ‘काशीपीठाचे प्राचीनत्व’ व ‘वीरशैव मठ व मंदिरे’ ही दोन पुस्तके मराठीत लिहिली आहेत. पूर्वी जगदगुरूंना संचार करणे अवघड होते. सुदैवाने लिं. ज. विश्वेश्वर शिवाचार्य स्वामीजी (८५ वे) व विद्यमान काशीजगद्गुरू महास्वामीजींना दळणवळणाच्या सोयीमुळे मोठ्या प्रमाणात संचार करता येत आहे. उभय जगद्गुरूंनी आपल्या अमोघ वक्तृत्व आणि धर्मोपदेशाने संपूर्ण महाराष्ट्र आपलासा केला आहे व तीच आपुलकीची भावना महाराष्ट्रीय वीरशैवांच्या अंत:करणांत आहे.
*वीरशैव लिंगायत एकच!*
वीरशैव धर्म हा देशातील प्राचीन धर्म आहे. त्यालाच बोलीभाषेत लिंगायत असेही म्हणतात. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व साहित्याचे अवलोकन केले असता दोन्ही नावे एकच आहेत, अशी सर्व महाराष्ट्राची भावना आहे. या धर्मात जरूर दोन भेद आहेत. पंचाचार्यांना मानणारा वर्ग सनातन म्हणून ओळखला जातो तर म. बसवेश्वर आदी शिवशरणांना मानणारा वर्ग हा सुधारकी असून पुरोगामी मानला जातो. कोणत्याही धर्मात अगदी जगातला सर्वांत मोठा धर्म ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्मांत दोन विचारधारा तसेच बौद्ध, जैन आणि अनेक धर्मांत, पंथांत अशी द्विविध विचारसरणी आढळते. त्यामुळे वीरशैव आणि लिंगायत हे दोन शब्द महाराष्ट्रात, मराठी साहित्यात व महाराष्ट्रीय जनामनात वेगळे न समजता एकच मानणारे बहुसंख्य आहेत. या विषयावर गेल्या आठशे वर्षांपासून चर्चा, वादविवाद व दावे प्रतिदावे केले जात असले तरी महाराष्ट्र वीरशैवांचा मानदंड असलेल्या संतशिरोमणींनी आपल्या ‘परमरहस्य’ ग्रंथात
पांची आचार्य शिवाचाराशी मूळ । तयापासाव शिवाचार सकळ ।
वीरशैव मार्ग प्रबळ । विस्तार जाहला ॥ १६-१०
तोचि मुळीचा शिवाचार । कल्याणी अवतरला बसवेश्वर ।
त्यानेही केला विस्तार । शिवाचाराचा ॥ १६-११
कोन्ही म्हणती शिवाचार नवा झाला । बसवेश्वरापासून विस्तारला ।
ते नेणोनि बोलते बोला । अज्ञानपणे ॥ १६-१२
जहींचा शिव तहींचा शिवाचार । नवा झाला म्हणती ते पामर ।
अनादि शिव तरी शिवाचार । अनादिसिद्धचि असे ॥ १६-१३
मन्मथस्वामींच्या या बिनतोड युक्तिवादापुढे वेगळे म्हणणार्यांची डाळ कदापि शिजणार नाही. अलीकडे मन्मथस्वामी आमचेच आहेत हे सांगण्याची चढाओढ नव लिंगायतवाद्यांमध्ये लागलेली आहे. त्यांनासुद्धा मन्मथ माऊलींच्या वरील मांडणीचे खंडण करणे शक्य झालेले नाही ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.
*अन्य संप्रदायांशी संबंध*
कर्नाटकातील वीरशैवांशी महाराष्ट्रातील वीरशैवांची मूळ नाळ जोडली असली तरी महाराष्ट्रातील इतर पंथ-धर्मांच्या निकट सान्निध्याने येथील वीरशैवांची भूमिका ही समन्वयशीलतेचीच राहिली आहे. वारकरी पंथ हा वैष्णव संप्रदाय असून तो शिवालाही तितकेच मानतो, म्हणून वारकरी संप्रदायाचा आणि मराठी वीरशैव संतांच्या साहित्याचा एक परस्परानुबंध आहे. इतकेच नव्हे तर वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संतांवर वीरशैव विचारांचा प्रभाव जाणवतो. या बाबतीत ज्ञानेश्वरांच्या ‘गुरु लिंग जंगम त्याने दाविला आगम’ या मार्मिक उल्लेखाकडे पाहावे लागते. तसेच संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर हे त्यांनी लिहिलेल्या शडुस्छळी (षट्स्थल) या ग्रंथावरून ते वीरशैव तत्त्वविचाराने प्रभावित होते हे स्पष्टपणे जाणवते. महानुभाव संप्रदायातील अनेक संज्ञा वीरशैवांच्या तत्त्वविचारातून घेतल्याचे प्रा. र. मु. भुसारी यांनी सप्रमाण मांडले आहे. दत्त, समर्थ, नागेश, चिम्मड, चिदंबरम्, मुडलगी, सकळ मत संप्रदाय आदी महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील संप्रदायांचे साहित्य आणि वीरशैव मराठी साहित्य यांचा संबंध अनेक स्तरांवर जाणवतो. अधिक विस्तृत स्वरूपात सांगायचे तर वारकरी पंथ हा शिवाशी निगडित असल्यामुळेच मल्लप्पा वासकर, वीरनाथ महाराज औसेकर व गो. शं. राहिरकर या वीरशैव घराण्यातील व्यक्तींना वीरशैव व वारकरीत्व एकत्र वागविताना संकोच वाटत नाही. शिखरशिंगणापूरच्या शांतलिंगस्वामींच्या शिष्यांना कृष्णप्पा-जयराम स्वामींना वडगाव मठाची गादी ‘जंगमाची गादी’ म्हणून चालविताना अडचण वाटत नाही. गुरुदेव रानडे यांच्यावर रेवणसिद्धांचा प्रभाव होता. सकलमत सांप्रदायी माणिकप्रभू हे रेवणसिद्धांना मानतात. म्हणूनच त्यांनी अनेक वीरशैवांचे कुलदैवत असलेल्या केतकी संगमेश्वरावर ‘संगमेश्वर माहात्म्य’ लिहून आपली श्रद्धा प्रकट केली आहे. बसवलिंग या वीरशैव संतकवीने रामदासी संप्रदायातील जयरामस्वामींना पित्याप्रमाणे मानून त्यांची सेवा केली व स्वत:ला ‘जयरामात्मज’ही म्हणवून घेतले. गुरूला महत्त्व देणारा दत्तसंप्रदायही वीरशैवांना जवळचा वाटतो. महाराष्ट्रात वीरशैवांनी कट्टरता न आणता या भूमीशी समरस होण्याची लवचिकता दाखविली म्हणूनच सदुंबरे (जि. पुणे) येथील पंचमवाणी असलेले गवरशेट यांना तुकारामांचा टाळकरी होण्यात संकोच वाटला नाही. तसेच पुण्याचेच वीरशैव असलेले रामचंद्र बापूशेट उरवणे सावकार हे महात्मा ज्योतीराव ङ्गुले यांच्या सत्यशोधक चळवळीत सक्रिय भाग घेतात. हे सर्व महाराष्ट्रातील उदारमनस्क वीरशैवांच्या समन्वयशीलतेचे प्रतीक आहे.
*दृष्टिक्षेपात वीरशैव मराठी साहित्य*
अ :
(१)ओवीग्रंथ- १. आगम ग्रंथ, २. पुराण ग्रंथ, ३. सिद्धान्त/तत्त्वज्ञान आधारग्रंथ, ४. शरण पुराणे, ५. लघुग्रंथ, ६. पूजाव्रतकथा.
(२) अभंगगाथा- १. मन्मथस्वामीपासून ते रेवणसिद्ध शिवाचार्य परंडकर यांचेपर्यंतचे विविध गाथे
(३) स्फुट कविता- १. पदे, २. आरत्या, ३. भारुडे, ४. लावणी, ५. पोवाडे, ६. गीते, ७. खंडकाव्य, ८.पाळणे, ९. स्तोत्रे/अष्टके, १०. व्हडपे
ब
१. बखर, २. लेखसंग्रह, ३. चरित्र, ४.आत्मचरित्र, ५. गौरवग्रंथ, ६. स्मृतिग्रंथ, ७. कथा, ८. कादंबरी, ९. एकांकिका/ नाटके, १०. संशोधन/समीक्षा
क
अनुवाद संस्कृत व कन्नडमधून. तसेच वचनानुवाद.
ड
सा. ‘प्रबोधरत्न’ (१८८४) ते आजपर्यंतची अनेक नियतकालिके
इ
१. संस्था अहवाल, २. स्मरणिका, ३. विविध परिषदा, सभा, साहित्य संमेलनांतील भाषणे.
*वीरशैव मराठी वाङ्मयाचे पायाभूत कार्य*
मुद्रणालये निघण्यापूर्वी मन्मथादी संतांचे वीरशैव साहित्य हस्तलिखित स्वरूपात होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वकाळात लिं. पारलिंग प्रभूअय्या बार्शीकर, म. सं. देवमाले, गंगाधर शिवाचार्य व त्यांचे शिष्य बाळाबुवा कबाडी, धर्मवीर देशिकेंद्र महाराज, चन्ना वारद, विरूपाक्ष शेटे यांनी परमरहस्य, मन्मथादी संताचा गाथा, गुरुदास विरूपाक्ष गाथा व बाळाबुवांचा गाथा तसेच सिद्धान्तसार, वीररहस्यासारखे ग्रंथ मुद्रित केले. पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांनी सुमारे ७५-८० ग्रंथ प्रकाशित केले, जे आता फार दुर्मिळ झाले आहेत. मुंबई राज्याचे माजी मंत्री लिं. म. पु. पाटील यांनी वीरशैव संघ स्थापून त्याद्वारा वीरशैव मासिक व ‘लीला विश्वंभर’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील काही मठाधीशांनी छोटे-मोठे ग्रंथ प्रकाशित केले. काशीपीठानेही वीरशैवांचे सिद्धान्तशिखामणी, लिंगधारण चंद्रिका व वीरशैवरत्न असे अनेकानेक ग्रंथ प्रकाशित केले. या मूळ पायावर पुढच्या संशोधकांना-अभ्यासकांना आपले संशोधनकार्य व अभ्यास करता आला.
*काशीपीठाचे मौलिक वाङ्मयीन कार्य*
१९८९ साली काशीपीठावर आरूढ झाल्यानंतर विद्यमान जगद्गुरू पूज्य डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी ‘शैवभारती शोधप्रतिष्ठान’ची स्थापना करून त्याद्वारे ग्रंथप्रकाशनाच्या कार्याला मोठ्या प्रमाणात गती दिली. शिवागमांचे आणि काही उपनिषदांचे हिंदी अनुवाद, पारमेश्वरागम व चंद्रज्ञानागम या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद, पारमेश्वरागमाचा तेलुगू अनुवाद यांबरोबरच अनेक हिंदी-इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील विद्यापीठांतून मान्य झालेले वीरशैव मराठी साहित्यावरील दहा शोधप्रबंध प्रसिद्ध केले. त्यामुळे वीरशैव साहित्य मुख्य मराठी प्रवाहाशी जोडले जाऊन अनेक अभ्यासकांनी त्याची नोंद घेतली. पूज्य काशीमहास्वामीजींनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’वर केलेल्या आशीर्वचनांचे संकलन/अनुवाद/संपादन डॉ. शे. दे. पसारकरांनी २००१ साली केले. तो ग्रंथ ‘जन्म हा अखेरचा’ या नावाने काशीपीठाने प्रकाशित केला. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या ग्रंथाच्या लाखावर प्रती वितरित झाल्या असून हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला आहे.
वीरशैवांचा प्रमाणग्रंथ ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’चा पूज्य महास्वामीजींनी स्वत: कन्नडमधून अनुवाद केला. त्यानंतर काही वर्षांत या ग्रंथाच्या संस्कृत, तेलुगू, मलयालम्, हिंदी, उडिया, नेपाळी, रशियन आदी १९ भाषांत त्या त्या भाषांतील विद्वानांकडून अनुवाद करून घेऊन हे ग्रंथ प्रकाशित केले. एका मोबाईल अॅपमध्ये ते समाविष्ट करून गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले. ते ग्रंथ डाऊनलोड करण्याचीही सोय करून देण्यात आली. आतापर्यंत एक लाख लोकांनी डाऊनलोड करून घेतले आहे.
*‘श्रीसिद्धान्तशिखामणी’चे विविध मराठी अवतार*
पहिल्या अ.भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सिद्धहस्त लेखक/संपादक डॉ. शे. दे. पसारकरांनी श्रीसिद्धान्तशिखामणीचे ओवीरूपात ‘श्रीसिद्धान्तशिखामणितत्त्वामृत’, अभंगरूपात ‘श्रीसिद्धान्त-शिखामणी अभंगगाथा’ व अनुष्टुभ् छंदात ‘रेणुकगीताई’ असे तीन रूपबंधांत अनुवाद केले. त्यामुळे श्रीसिद्धान्तशिखामणी ग्रंथाचे विविध रूपांत आपणांस दर्शन घडत आहे. याशिवाय ‘श्री जगद्गुरू पंचाचार्य विजय’, ‘मन्मथचरितामृत’ व ‘रमतेरामकथामृत’ असे ग्रंथ सुगम, सरस व रसाळ अशा ओवीछंदात रचले. हे सर्व ग्रंथ अत्यंत लोकप्रिय झाले असून हे मौलिक प्रकाशन कार्य काशीपीठाकडून घडले आहे. या सर्व ग्रंथांची विविध कार्यक्रमांत पारायणेही केली जात आहेत. डॉ. पसारकरांनी श्रीसिद्धान्तशिखामणीचे जे विविध्यपूर्ण दर्शन घडविले आहे त्याने महाराष्ट्रीय वाचकांची जिज्ञासा पूर्ण झाली. तीसेक वर्षांपूर्वी हा ग्रंथ मराठी लोकांना माहीत नव्हता. तो आता महाराष्ट्रातील वीरशैवांच्या घराघरात पोहोचला आहे. काशीपीठाचे व डॉ. शे. दे. पसारकरांचे ऐतिहासिक कार्य नोंद घेण्यासारखे आहे.
प.पू. श्रीकाशीमहास्वामीजींच्या पीएच्.डी. प्रबंधाचा अनुवाद पं. शिवाप्पा खके गुरुजी यांनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी समीक्षा’ या नावाने केला आहे. श्रीकाशीमहास्वामीजींच्या डी.लिट्. प्रबंधाचा अनुवाद डॉ. शे. दे. पसारकर यांनी ‘वीरशैव तत्त्वदर्शन’ या नावाने केला आहे. हे दोन्ही प्रबंध शैवभारती शोधप्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झाले आहेत. मराठी वीरशैव साहित्यातील काशीपीठाचे योगदान सर्वाधिक आहे, याची नोंद घेतलीच पाहिजे.
*वीरशैव नियतकालिकांचे योगदान*
प्रबोधरत्न (बार्शी १८८४) या पहिल्या साप्ताहिकापासून वीरशैव (सोलापूर), वीरशैवमतप्रकाश (खणदाळे), वीरशैवोत्कर्षमाला (कोल्हापूर), वीरशैव संजीवनी (अमरावती), वीरशैव धर्मरहस्य (देऊर सातारा), मुक्तागुच्छमाला (वडांगळी नाशिक), शिक्षणप्रकाश (लातूर), वीरप्रभा (बार्शी), वीरशैव केसरी (पुणे), वीरशैवगर्जना (बार्शी), विजय (सोलापूर), सा. सुदर्शन (सोलापूर), पाक्षिक संग्राम (मोमिनाबाद), लोकमत (उदगीर), वीरशैव (मुंबई), शिवगंगा (नागपूर), ज्ञानप्रसाद (कोल्हापूर), कपिलधार (चाकूर), शिवशरण (अमरावती), वीरशैव दर्शन (पुणे), लिंगेश्वर वाणी (अहमदपूर), धारेश्वर (दिवाळी अंक व त्रैमासिक धारेश्वर), मन्मथ दर्शन (कळंब), ओम नम: शिवाय (परभणी), विभूतिवैभव (वाराणसी), मन्मथ मंत्र (बीड), श्रीपलसिद्ध दर्शन (साखरखेर्डा), शिवदर्शन (औरंगाबाद), बसवदर्शन (औरंगाबाद), धर्मगंगोत्री (सोलापूर), सिद्धेश्वर दर्शन (सोलापूर), वचन ज्योती (उदगीर), शिवभेट (नांदेड), कमलदीप (लातूर), बसवपथ (लातूर), बसवदर्शन (औरंगाबाद), वीरशैव सिद्धान्तामृत (कोल्हापूर), प्रभुप्रसाद (माजलगाव), शिवलिंग दर्शन (औरंगाबाद), शिवसंस्कार (डोंबिवली), जीवनसंगिनी (नांदेड), वीरशैव संहिता (नांदेड), त्रैमासिक संगम (मुंबई) अशी सुमारे १०० पेक्षा अधिक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके गेल्या १०० वर्षांत निघाली. ती अल्पजीवी ठरली. आता केवळ ४/५ नियतकालिके प्रसिद्ध होत आहेत. अशा नियतकालिकांचाही वीरशैव साहित्य समजून घेण्यासाठी, समाजातील चळवळी माहीत होण्यासाठी उपयोग झाला. तसेच या नियतकालिकांनी भरीव असे वाङ्मयीन कार्य करून वीरशैव वाङ्मयाचा प्रवाह वाहता ठेवला.
*वीरशैव संतांची मांदियाळी*
वीरशैवांचे मराठी वाङ्मय बाराव्या शतकापासून लिहिले गेले असावे, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनचे वाङ्मय उपलब्ध होत आहे. पंधराव्या शतकातले लिंगदास, रामलिंग, सुजात व शिवलिंग हे कवी अद्याप पूर्णपणे उजेडात आले नाहीत. मन्मथस्वामींचे अन्य शिष्य लिंगेश्वर, बसवलिंग, शिवदास यांचेही संपूर्ण साहित्य हाती लागले नाही. त्यानंतर सत्यात्मज या महत्त्वाच्या कवीची नवीन माहिती उजेडात आली असून त्याचे दोन शिष्य १ रेवाप्पा, २ गुरुपुत्र यांचे काही साहित्य उजेडात आले आहे. त्याच जुन्या पद्धतीचा वापर करून पुढिलांनी म्हणजे गंगाधर शिवाचार्य वडांगळीकर, त्यांचे शिष्य बाबा झळके व बाळाबुवा कबाडे यांचे साहित्य अद्याप अभ्यासक्षेत्रापासून दूर आहे. चन्ना कवी, विरूपाक्ष, शिवगुरुदास व बसवदास यांचेही साहित्य प्रकाशित झाले आहे, होत आहे. तरी पण विश्वेश्वर शिवाचार्य, मल्लेश्वर ऊर्फ काशीनाथ हवा तसेच सिद्धमल शिवाचार्य वैराग यांचेही साहित्य अप्रकाशित आहे. सांगलवाडीच्या रामलिंगाचे ‘अष्टावरण माहात्म्य’ अर्धवट उपलब्ध झाले आहे. शांतलिंगस्वामी, शिखरशिंगणापूर यांचे दोन ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांच्यावरही संशोधन करणार्यास खूप वाव आहे.
पारलिंग प्रभुअय्यांनी प्रथम मन्मथगाथा, भारुडे व परमरहस्य प्रकाशित करून वीरशैव संतवाङ्मयाला प्रथम प्रकाश दाखविला. त्या पिढीतलेच धर्मवीर देशिकेंद्र महाराज यांचे ११ अध्यायाचे ओवीबद्ध गुरुमाहात्म्य अद्याप प्रकाशित झाले नाही. तसेच त्यांच्या संग्रहातील विदर्भातील पेंटय्या स्वामी ऊर्फ पंचाक्षरी स्वामी यांचे ‘शिवरहस्य’, ‘प्रभुलिंगलीला’ व ‘सिद्धेश्वर माहात्म्य’ हे प्रकाशनाची वाट पाहत आहेत. त्यांचे समकालीन शिवलिंगभाऊ ओझर्डे (देऊर-सातारा), कृष्णप्पा सद्रप्पा कलुरे (चांदा) वै. मा. शेटे, महेश शंकर नागुरे, संग्रामप्पा शेटकार, राचय्या स्वामी निलंगा, शाहीर मुचाटे, शाहीर मेनकुदळे, ना. रा. विभूते (तासगाव) गंगाधर हिरेमठ (सातारा), राम शंभो पुराणिक, वि. तु. चौधरी, कुमार कोठावळे, शि. बा. संकनवाडे, श्रीकांत आळ्ळी आदींचे ग्रंथ व किरकोळ लेखन प्रसिद्ध झालेले आहे. दे. भ. बामणगावकरांनी आपल्या वीरशैव संजीवनीद्वारे वीरशैव वाङ्मयाची भरीव सेवा केली आहे. वीरशैवांनी लघुकथा कशा लिहाव्यात याचेही मार्गदर्शन त्यांनी केले होते. याचवेळचे बं. रे. झुंजे (सोलापूर) हे एक कथाकार होते. त्यावेळी कल्याण शेट्टी हे सोलापूर ‘सुदर्शन’ साप्ताहिक चालवीत, तर पुराणिकशास्त्री ‘विजय’ मासिक काढीत. या काळातील महत्त्वाचे लेखक अंबण्णप्पा शेडजाळे हे पत्रकार व नाटककार होते.
*यांनीही वीरशैव साहित्याला लावला हातभार*
काशीनाथ-विश्वनाथ-आनंद हे सुपेकर घराण्यातील कवी, गणेशअण्णा चौधरी, पं. शिवाप्पा खके गुरुजी, अशोक एडके, बसप्पा वारद, नागय्या लहानकर, महादेव भुसे, ना. गं. कथले, शिवचंद्र माणूरकर, प्रा. विश्वंभर गव्हाणकर, मनोहर कल्लावार, अभय कल्लावार, गुरुनाथ वड्डे, प्रा. डॉ. राजकुमार साबळे, गंगाधरराव पटणे, राजेंद्र जिरोबे, रं. प. लोहार, वीरसंगय्या हिरेमठ ऊर्फ मृत्युंजय (बोराळे), प्रा. विश्वनाथ थोंटे, एस. जी. हिरेमठ (गुड्डापूर), पां. ना. मिसाळ, सुरेश स्वामी गोरटेकर, पंचप्पा जिरगे, श्रीराम गुळवणे, रेवणसिद्ध जाबा, वसंतराव सांगवडेकर, प्रा. बा. म. चमके, शंभूलिंग मसळी, हनुमंत धोंडिबा नावले (बामणी, लोहा), महादेव बाबूराव मिटकरी (येरमाळा), स्नेहलता स्वामी ‘शिवयोगिनी’, सुशीलाबाई वाकळे, काशीनाथप्पा पैके, जी. एम. मंगलगे, डॉ. बी. एम. डोळे, शं. क. हिरेमठ (कोल्हापूर) यांनीही वीरशैव साहित्याला आपला हातभार लावला आहे. त्यात विशेष म्हणजे रामलिंग स्वामी हरंगुळकर यांची नोंद घ्यायला हवी. हे अल्पशिक्षित असूनही स्वत: अभंग, पदे, आरत्या, पवाडे, भारुडे अशी बहुविध रचना करून हरंगुळ येथून रुद्र प्रकाशन ही संस्था काढून ३०-४० पुस्तके प्रकाशित केली आहेत.
*संशोधनाद्वारा यांनी कळस चढविला*
डॉ. चंद्रशेखर कपाळे, डॉ. सुधाकर मोगलेकर, डॉ. शंकरराव कप्पिकेरी यांच्या काळातील ही पिढी शाळा-महाविद्यालयांतून नुसतीच शिकली नव्हती तर ते मराठी वाङ्मयाचे अभ्यासकही होते. म्हणून ते संशोधनकार्याकडे वळले. डॉ. मोगलेवारांच्या पाठोपाठ डॉ. भी. शि. स्वामी, डॉ. राम तोंडारे, डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. वैजनाथ फास्के, डॉ. शे. दे. पसारकर, डॉ. सूर्यकांत घुगरे, डॉ. अशोक मेनकुदळे, डॉ. चंद्रशेखर कपाळे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. शोभा कराळे, डॉ. अनिल काटकर, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. मु. व्ही. बनाळे, डॉ. अनिल सर्जे, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. उल्हास मोगलेवार, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. सचिदानंद बिचेवार, डॉ. एकता पंकज शेटे, डॉ. शिल्पा कारंजकर, डॉ. संतोषकुमार गाजले, डॉ. कोळी, डॉ. वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर, डॉ. रत्नाकर लक्षट्टेे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवशरण धाराशिवे, डॉ. व्यंकट पाटील, डॉ. मीनाक्षी हिरेमठ, डॉ. शशिकांत दरगु, डॉ. अपर्णा जिरवणकर व डॉ. जितेंद्र शरणप्पा बिराजदार अशी सुमारे ४० पीएच.डी. प्राप्त अभ्यासकांची नावे आहेत.
मन्मथादी संतांनी जिचे प्रथम पोषण केले, अनेक संपादक/संशोधकांनी खतपाणी घालून वाढविले त्या वीरशैव साहित्याला आता बहर आला आहे. त्याची फळे नवेनवे अभ्यासक/संशोधक चाखत आहेत. मराठी साहित्याच्या प्रवाहाशी एकरूप झाल्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. पन्नास वर्षांपूर्वी वीरशैव वाङ्मय फारसे उपलब्धही होत नव्हते. आज आमच्या डोळ्यांदेखत त्याला आलेले हे भव्य स्वरूप पाहून मनस्वी आनंद होत आहे. तसेच याचे सक्रिय साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे.
*महाराष्ट्रातील मठाधीशांचे साहित्यात योगदान*
महाराष्ट्रात एकेकाळी ८०० मठ होते अशी माहिती ‘वीरशैव मूळस्तंभ’ या १०० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात नमूद केली आहे. आज काळाच्या ओघात त्यांपैकी अवघे ५०-६० मठ आपले अस्तित्व टिकवून आहेत. शांतलिंग हे शिंगणापूरचे मठाधीश असून त्यांचे विवेक चिंतामणी व करण हसुगे (कर्णहंस नव्हे) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शांतलिंग स्वामी उदार मनाचे असल्यामुळे कृष्णप्पा व जयराम स्वामी वडगावकर आदींना त्यांनी शिष्यत्व दिले. अमरावतीचे विरक्त मठाधीश शंकर मृगेंद्र यांचा गाथा प्रसिद्ध असून तो आता दुर्मिळ झाला आहे. वडांगळी मठाचे गंगाधर शिवाचार्य यांनी ‘वीररहस्य’, अभंगगाथा व अनेक लघुग्रंथ रचले आहेत. होटगी मठाचे पूर्व मठाधीश ष. ब्र. चन्नवीर शिवाचार्य यांनी ग्रंथमाला चालवून अनेक छोटे-मोठे ग्रंथ प्रसिद्ध केले. लिं. राचलिंग शिवाचार्य व ष.ब्र. रेवणसिद्ध शिवाचार्य यांनी ‘वीरशैव गर्जना’ हे साप्ताहिक सुमारे ३५ वर्षे अनेक खस्ता खाऊन चालविले. महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांमध्ये त्यांच्याशिवाय पानही हलत नसे. श्रीगुरू रेवणसिद्ध शिवाचार्यांनी अभंगामृत व अभंगसुधा या नावाचे दोन गाथे रचले असून ते प्रसिद्धही झाले आहेत. अहमदपूरच्या ष.ब्र. डॉ. शिवलिंग शिवाचार्यांच्या अभूतपूर्व कार्याला तोड नाही. संतशिरोमणी मन्मथस्वामी यात्रेला ते गेल्या ६५ वर्षांपासून हजारो भक्तांसह पायी दिंडी काढतात. तसेच त्यांनी सिद्धान्तशिखामणी ग्रंथावर स्वतंत्र भाष्य केले आहे. याशिवाय संस्कृती प्रकाशनाद्वारा परमरहस्य, रत्नत्रय, मन्मथ गाथा, शिवानंद बोध, बसवपुराण आदी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांनी मन्मथस्वामींच्या कपिलधार यात्रेला व कार्याला, परंपरेला उजाळा दिला आहे.
माजलगावचे ष.ब्र. प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य यांनी आपल्या मठ संस्थानातर्फे अनेक ग्रंथ प्रकाशित केले असून मन्मथ जन्मोत्सवाच्या वेळी कपिलधार येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे ते आयोजन करतात. ष.ब्र. नीळकंठ शिवाचार्य, मठ संस्थान धारेश्वर यांच्यातर्फे अनेक मासिके, दिवाळी अंक, गुरुपौर्णिमा अंक व अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. साखरखेर्डा हे विदर्भातील पुरातन मठ संस्थान असून सुमारे १००० वर्षांचा इतिहास असलेला मठ आहे. त्यांनीही श्रीपलसिद्ध दर्शन मासिक व बृहद् लक्ष्मण गाथा, सिद्धेश्वर माहात्म्य, गाथा पारायण प्रत व इतर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. याशिवाय ष.ब्र. डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधाम, ष.ब्र. दहिवडकर, तमलूरचे शिवाचार्य, शिंगणापूरच्या भांडारगृहाचे शिवाचार्य, हावगी स्वामी मठ संस्थान, उदगीर, माणूरचा जहागीरदार मठ व डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मठ संस्थान, मुखेड यांनी अलीकडेच अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. अनेक मठांकडून छोटीमोठी पुस्तके, मासिके, नियतकालिके चालविली जातात. थोडक्यात वीरशैव मराठी वाङ्मयाच्या वाढीसाठी, प्रसारासाठी महाराष्ट्रातील अनेक शिवाचार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
*वीरशैव महिलांचे मराठी साहित्य*
म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपतीच्या समाजजागरणामुळे स्त्रियांच्या चळवळीला महाराष्ट्रात वेग आला. शाळेत कधीही न जाणार्या मुली शाळेत जाऊ लागल्या. पुरुषासारखे लिहू लागल्या. हे होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. या शतकात स्त्रीशिक्षणाला बर्यापैकी महत्त्व आले. स्त्रिया शिकू लागल्या, लिहू लागल्या आणि आपली ठाम मते मांडू लागल्या.
वीरशैव समाज तर व्यापारी वृत्तीचा. मुलींना शिक्षण कशाला पाहिजे? असे म्हणणारा. तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभी वीरशैव स्त्रिया लिहू लागल्या. त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. सौ. गंगाबाई पटणे (अक्कलकोट), गिरिजाबाई ओझर्डे, शांताबाई बाप शिवलिंग ओझर्डे (देऊर सातारा), रत्नमाला कुर्हे, महादेवी वाघमारे, शांता गं. सातेकर अशा काही स्त्रियांचे लेखन ‘शिक्षण प्रकाश’, ‘वीरशैव संजीवनी’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागले. प्रथम तर पुरुषांनाच स्त्रियांच्या प्रश्नावर लिहावे लागत असे. आता त्या स्वत: आपले प्रश्न मांडू लागल्या. क्वचित कथाही लिहीत होत्या. त्रिवेणीबाई इसापुरे व भागीरथीबाई कटाप या विदुषी त्या काळात प्रसिद्ध झाल्या.
*भावंडी : आद्य वीरशैव अभंगकर्ती*
भावंडी ही वीरशैवांच्या पाटील कुळात जन्मलेली व लहान वयातच वैधव्य प्राप्त झालेली स्त्री. पुढे गुरूंच्या मार्गदर्शनाने तिने आपले आध्यात्मिक जीवन वाचन-लेखनाकडे वळविले आणि भावंडी वीरशैवांची पहिली कवयित्री ठरली. ती स्वत: वैराग्यमूर्ती होती. तिने कठोर शब्दांत आपल्या भावना अभंगबद्ध केल्या आहेत. तिने आपले मार्गदर्शक संगशेट्टी पाटील ऊर्ङ्ग गुरुदास यांच्या गाथ्यात स्वत:चे अभंग समाविष्ट करून गुरुदास गाथा प्रकाशित केला. काळाबरोबर स्त्रीशिक्षणाचे महत्त्व जाणवत होते. त्यातून बोध घेऊन शिक्षणाला प्राधान्य मिळू लागले आणि बरोबरीने नसले तरी बर्यापैकी स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली.
*प्रमुख वीरशैव लेखिका*
लिं. जयदेवीताई लिगाडे या मराठी-कन्नड भाषा जाणत होत्या. त्यांनी दोन्हीही भाषांत लिखाण केले. महात्मा बसवेश्वरादी शरणांच्या वचनांचे अनुवाद केले. सिद्धवाणी, बसवदर्शन, शून्य संपादने, सिद्धलिंग वाणी, वचनामृत, सिद्धरामांची त्रिविधी ही त्यांची प्रमुख ग्रंथरचना. त्यांची कन्या शशिकला मडकी व नात सौ. स्वरूपा बिराजदार यांनीही भरपूर लेखन, अनुवाद केले आहे. सिद्धान्तशिखामणीच्या अभ्यासिका सौ. महानंदाताई खके यांनी लक्ष्मण महाराजांच्या शिवपाठावर भाष्य केले.
रेखा अष्टुरे, प्रमिलाताई कोठाळकर, शालिनी दोडमणी, शकुंतला अनसिंगकर, स्नेहलता स्वामी, शिवाबाई पाटील, सौ. रजनीताई मंगलगे आदींनी केलेले लेखनकार्य मौलिक आहे. प्रा. सौ. लावण्यवती चौधरी यांनी ‘बाप्पा : एक आनंदयात्री’, ‘भक्ताश्रमिका कलावती’ ही दोन चरित्रे आपल्या आईवडिलांविषयी लिहिली आहेत. तसेच दिवंगत बंधू सतीश याचे ‘तालयात्री’ नावाचे चरित्र लिहिले असून या तीनही ग्रंथांत वीरशैव कुटुंबातील जीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडते. अल्पशिक्षित असलेल्या सौ. मालती आचमारे यांनी त्यांचे गुरू ष.ब्र. सिद्धलिंग शिवाचार्य यांचे चरित्र, गुरूवर, शिवावर भक्तिगीते व पोवाडेही रचले आहेत. डॉ. श्यामा घोणसे व डॉ. सौ. शोभा कराळे, डॉ. सुचिता किडीले यांनी वीरशैव साहित्यावर पीएच्.डी. मिळविली आहे. स्वाती साखरकर (कारंजा लाड) यांचे संतशिरोमणी मन्मथस्वामींच्या अभंगांवरील ‘म्हणे मन्मथशिवलिंग’ हे भाष्य आणि ‘कथा श्रीरमतेरामांची’ हे ललित संतचरित्र काशीपीठाने प्रसिद्ध केले आहे.
*वीरशैवेतरांचे वीरशैव साहित्यास योगदान*
वीरशैव मराठी साहित्य प्रकाशनाच्या पायाभरणीत अनेक वीरशैवांचा वाटा महत्त्वाचा आहे. वीरशैव समाज मूळचा व्यापारी पेशाचा. त्यांचा लेखनाशी केवळ हिशोब लिहून ठेवण्यापुरताच माहीत होता. तेव्हाचे शिक्षणाचे प्रमाणही कमी अशा काळात अनेक वीरशैवेतरांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये कै. वि. ल. भावे, मुमुक्षुकार ल.रा. पांगारकर, कवि-काव्यसूचीकर्ते गो. का. चांदोरकर, डॉ. पां. ना. कुलकर्णी, डॉ. पंडित आवळीकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, प्रा. अ. का. प्रियोळकर, ज. शा. देशपांडे, कृ. पां. कुलकर्णी, बाळाचार्य खुपेरकर शास्त्री, ग. वा. तगारे, अनिल बडवे, नरहरशास्त्री खरशीकर, ना. ब. जोशी, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. निर्मलकुमार ङ्गडकुले, डॉ. अशोक कामत, डॉ. यू. म. पठाण, गं. ना. मोरजे, र. म. भुसारी, डॉ. अ. ना. देशपांडे, प्रा. अ. रा. तोरो, प्रा. डॉ. र. बा. मंचरकर, सु. ग. जोशी (लातूर), प्रा. ल. रा. नसिराबादकर, प्रा. डॉ. शिवाजीराव गऊळकर, र. रा. गोसावी, गं. दे. खानोलकर, सुहास पुजारी, प्रा. धोंडिराम वाडकर, डॉ. संजीवकुमार पांचाळ, प्रा. डॉ. माणिक धनपलवार, प्रा. डॉ. सतीश बडवे अशा अनेकानेक वीरशैवेतर अभ्यासकांनी, संपादकांनी वीरशैव साहित्याचा परिचय करून दिला. इतिहासात वीरशैव मराठी साहित्याची नोंद केली. वेगवेगळ्या रूपांत वरील वीरशैवेतरांनी वीरशैव मराठी साहित्याच्या उभारणीत, उत्कर्षात, प्रकाशित करण्यात आपली भूमिका महत्त्वपूर्णरित्या बजावली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वीरशैवातून अनेक अभ्यासक-संशोधक पुढे आले आहेत.
वीरशैव मराठी साहित्याचा एक भाग असलेले बसवेश्वरादी अनेक शरणांची चरित्रे, वचने, वचनानुवाद या कामी अनेक वीरशैवेतरांनी मौलिक कामगिरी केली आहे. यात अविनाश हरि लिमये, म. म. देशपांडे, प्रा. कृ. ब. निकुंब, कॉ. कृष्णा मेणसे, डॉ. न. म. जोशी (पुणे), प्रा. डॉ. प्रभाकर पाठक, प्रा. ल. का. मोहरीर, प्रा. गौतम गायकवाड (अंबाजोगाई), प्रा. अर्जुन जाधव, गंगाधर गिते, प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे, सुभाष देशपांडे, प्रा. डॉ. विजया तेलंग, प्रा. वि. शं. चौघुले, प्रा. रा. तु. भगत, डॉ. सुधाकर देशमुख (उदगीर) इ. चा समावेश असून त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरक आहे. त्यांच्या कार्याबद्दल वीरशैवांनी कृतज्ञता बाळगून त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी लागेल इतके त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.
*कीर्तनकारांची भूमिका*
वीरशैव समाज जागा ठेवण्याचे कार्य गुरूंबरोबरच संतांनी कीर्तनमाध्यमाचा आश्रय घेऊन केले आहे. कीर्तनकारांचा इतिहास सुमारे ४०० वर्षांचा आहे. शिवलिंग स्वामी, मन्मथस्वामी, लिंगेश्वर, बसवलिंग व शिवदास हे प्रारंभीचे कीर्तनकार. त्यांनी कीर्तनसंस्थेची उभारणी केली. त्यासाठी अभंगादी काव्यरचना केली आणि त्यातून पुढे शिष्यपरंपरेने हे चालत राहिले आहे. मधल्या काळात भजन परंपरेला उतरती कळा लागली होती. केवळ बार्शी, अहमदपूर, चाकूर, परळी, शिरूर अनंतपाळ, नागापूर, लातूर इ. ठिकाणी चन्नाप्पा वारद, गुरुदास साखोळकर आणि सदानंदबुवा जोडजवळेकर, शिवगुरुदास व बसवदास यांच्या द्वारा मंदगतीने चालत होती. परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्यांनी १९५५ ला चापोलीहून कपिलधारला पायी दिंडी काढली व या शिवभजन परंपरेला त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या प्रेरणेतून आज ४००/५०० ठिकाणी शिवनाम सप्ताह चालू असून ३००/४०० कीर्तनकारांची ङ्गळीही उभारली आहे. खरा समाज गुरू आणि संतांनी जागृत ठेवला आहे. त्या संतांपासून प्रेरणा घेऊन कीर्तनकार पुढे येत आहेत. त्यामुळे सर्व समाजाला आपले संत, आपले साहित्य माहीत होऊ लागले. परमरहस्य ग्रंथ घराघरात पोहोचला. त्याची पारायणे महाराष्ट्रभर होत आहेत. लेखक-अभ्यासक-संशोधक संतांचे ग्रंथ संपादून प्रकाशित करतात. नवे नवे अभंग शोधून काढतात. त्या अभंगांवर कीर्तनकार भाष्य करतात, अर्थ सांगतात, त्याचे महत्त्व पटवून देतात. थोडक्यात संशोधकांनी निर्माण केलेले साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करतात. पण दुर्दैवाने या उभयतांचा संपर्क नाही. एकमेकांना एकमेकांची आवश्यकता आहे हे मान्य नाही असे दिसते. खरे तर हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कीर्तन शिकण्याच्या शाळा आता आपल्याकडे तुरळक सुरू झाल्या आहेत. त्याचे प्रमाण वाढले पाहिजे. कीर्तनकारांनी आपली कीर्तने लिहून पुस्तकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यातून नव्या कीर्तनकाराला दिशा मिळते. मार्गदर्शन होते. वीरशैवांची अशी काही कीर्तने प्रथम डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लिहिली होती. अलीकडे मन्मथप्पा डांगे, शि. बा. स्वामी मानखेडकर, भुसे, नावंदे, महावीर ब्रिदावळे वगैरेनी कीर्तने लिहून प्रकाशित केली आहेत. पण हे प्रमाण अल्प आहे. प्रसिद्धीची कितीही नवी नवी माध्यमे आली तरी छापील माध्यमाला पर्याय नाही. याचा विचार करून यू ट्यूबपेक्षा प्रभावी माध्यम मुद्रण आहे हे लक्षात घ्यावे. यू ट्यूबवर तुमची छबी दिसते तर मुद्रित कीर्तनामुळे विचारांना खोली प्राप्त होते व ते विचार ‘अक्षर’ स्वरूपात टिकून राहतात. कीर्तनकारांनी साहित्यप्रसाराला प्राधान्य द्यावे. ग्रंथ मिळवावेत, वाचावेत, आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि ते लोकांना वाटावे तरच खरे प्रबोधनकार ठरतील.
अलीकडची तरुण कीर्तनकार मंडळी जिज्ञासू आहेत. त्यापैकी पाच-सात तरुण कीर्तनकारांनी संताच्या समाधिदर्शनाला जाण्याचे नियोजन केले. मला त्याबद्दल त्यांनी विचारणा केली. मी सांगितल्याप्रमाणे ते सर्व ठिकाणी गेले नाहीत. पण त्यांचा हा प्रयत्न निश्चित चांगला आहे. पुन्हा चांगले नियोजन करून सर्व संतांच्या समाधिस्थानी जावे.
*सामाजिक ऐक्य : एक ज्वलंत प्रश्न*
कोणताही समाज एकत्र असला तर त्या समाजाची प्रगती होते, पण आपल्या वीरशैव समाजात लवकर मतैक्य होत नाही. म्हणून समाज आज मागे पडत आहे. समाजात चांगली गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्र-कर्नाटकात व इतर राज्यांत अनेक संघटना निर्माण झाल्या, पण त्या टिकल्या नाहीत. वीरशैव तरुण संघ, निजाम प्रांतिक वीरशैव परिषद, राष्ट्रीय वीरशैव समाज संघ, महाराष्ट्र वीरशैव सभा, बसवसेना, बसवब्रिगेड, मध्य दक्षिण वीरशैव परिषद, वीरशैव युवकाची ‘शिवा’ संघटना आदी निघाल्या आहेत. नवनव्या संघटना निघाल्याने नेत्यांचा विकास होतो, समाज तिथेच राहतो. महाराष्ट्रात केवळ तीन-चारच संस्था शंभर वर्षांपासून कार्यरत आहेत. कायम टिकून आहेत. त्यात यवतमाळची वीरशैव संघटना, कै. भिकुबाई मेनकुदळे (पुणे) अशा काही संस्थांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्र वीरशैव सभा ही संघटना काही कारण नसता आपसातील स्पर्धेमुळे, इर्षेमुळे मरणप्राय अवस्थेत पोहोचली आहे. शिवा संघटना ही प्रा. मनोहर धोंडे यांच्या बलदंड नेतृत्वाखाली धडाडीने कार्य करीत आहे. प्रा. मनोहर धोंडे यांना प्रश्नांची जाण आहे व ते कसे सोडवावे याचे भान आहे. त्यांनी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. समाजबांधवांनी संस्थांच्या उभारणीत आपापसातला मतभेद, हेवेदावे टाळून खंबीरपणे पाठीशी राहून त्या सक्षम कशा बनतील व समाजाचे प्रश्न समर्थपणे मार्गी लागतील याची काळजी घ्यायला हवी. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.
*अभ्यासक/संशोधकांना आवाहन*
वीरशैव मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी/संशोधकांनी काही महत्त्वाच्या बाबी विशेषत्वाने लक्षात घ्यायला हव्यात. त्या प्रामुख्याने अशा:-
१. अभ्यास-संशोधनातला तोचतोपणा टाळून इतिहास, समाजशास्त्र, दैवतशास्त्र, स्थलमाहात्म्य, लोकसाहित्य अशा बहुआयामी मार्गाचा अवलंब करून अभ्यास मांडावा.
२. महाराष्ट्रात औरंगाबाद, धुळे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औंध (सातारा), तेर, नांदेड इ. ठिकाणी हस्तलिखित संग्रहालये आहेत. त्यात कितीतरी दुर्मिळ हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ व नियतकालिके आहेत. ते मिळवावेत व त्याचा अभ्यास करावा.
३. महाराष्ट्रातील शासनाच्या विविध ठिकाणच्या दप्तरखान्यात कितीतरी वीरशैवविषयक कागदपत्रे उपलब्ध आहेत. विशेषत: पुणे दप्तरखान्यात शिरसंगी, वंटमुरी, कित्तूर, बेलवडी व नवलगुंद येथील वीरशैव संस्थानिकांचा ऐतिहासिक पत्रव्यवहार व वीरशैव-लिंगायतांच्या इतिहासाची कागदपत्रे असलेले शेकडो ‘रुमाल’ उपलब्ध असून त्यात लक्षावधी कागदपत्रे आहेत. त्यासाठी मोडी शिकून ही कागदपत्रे अभ्यासून त्यावर संशोधनपर लेखन करावे.
४. प्राचीन संतांची निवासस्थाने, समाधिस्थाने, जन्मस्थाने तसेच त्यांच्या परंपरेतील मठ असलेल्या गावांची वर्णनात्मक स्थानसूची व त्याचा नकाशा (Atlas) तयार करावा.
५. वीरशैव संताचे/लेखकाचे वारसदार, त्यांच्या वंशावळी व पत्त्यासह यादी करणे.
६. महाराष्ट्रातील विविध मठांचा इतिहास, मठातील कागदपत्रे व पोथ्या मिळवून जतन करून प्रकाशितही केल्या पाहिजेत.
७. वीरशैवविषयक ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे जे पुणे, मुंबईच्या शासकीय ग्रंथालयांत उपलब्ध आहेत त्यांचाही अभ्यास होऊ शकतो.
*संमेलनपूरक उपक्रमाविषयी सूचना*
या संमेलनाच्या माध्यमातून साहित्योपयुक्त बाबी सुचवू इच्छितो.
१. अ.भा. वीरशैव साहित्य संमेलने प्रतिवर्षी न चुकता आयोजित करावीत.
२. काशीपीठातर्फे कै. कपाळे साहित्य पुरस्काराबरोबर इतर ५/६ पुरस्कार दिले जातात. अशा प्रसंगी दिवसभर एखाद्या विषयावर चर्चासत्र ठेवून चर्चासत्राच्या समारोपाच्या वेळी हे पुरस्कार दिले जावेत.
३. एक दिवसीय साहित्य संमेलने आयोजित करावीत. जेणेकरून त्याचा लाभ नव्या व होतकरू अभ्यासकांना प्रेरणादायी ठरेल.
४. गदगच्या मठाने जशी चरित्रमाला काढली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वीरशैवांच्या साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण व राजकारणातील प्रमुखांची चरित्रमाला निर्माण करावी.
५. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मठाने आपला इतिहास लिहून घ्यावा. मठाच्या शिष्यपरंपरेची सूची तयार करावी.
६. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वीरशैवविषयक साहित्य उपलब्ध आहे. त्याचे अनुवाद करून मराठी भाषकांना उपलब्ध करून द्यावीत.
७. जैन समाजाप्रमाणे स्वतंत्ररित्या इतिहास परिषदा व कथा-कादंबरी लेखनासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात.
८. वीरशैव विश्वकोशाची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करून ते प्रकाशित करावे.
९. शास्त्रीय पद्धतीने (दाते ग्रंथसूचीप्रमाणे) वीरशैवांच्या मराठी ग्रंथांची व ग्रंथकारांची अद्ययावत सूची करावी.
*समारोप*
मागील दहा वर्षांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आला आहे. काय भाग्याची गोष्ट आहे की, हे संमेलन ज्ञाननगरी काशीमध्ये संपन्न होत आहे. योगायोगाने संमेलनाच्या आयोजकांच्या भूमीत हे संमेलन पार पडत आहे. हा दुग्धशर्करायोग मानायला हवा. याप्रसंगी मी कृतार्थ भावनेने काशीपीठाचे, सर्व अभ्यासकांचे, संशोधकांचे आणि उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरे तर हे सर्व मांडताना माझ्या भावना शब्दांत पकडणे शक्य होत नाही. माझ्या भावना संत शिवदासांच्या शब्दांत व्यक्त करून मी आपला निरोप घेतो.
धन्य आजी दिन भला । आम्हा थोर लाभ झाला ॥१॥
बहुत सुकृताच्या गाठी । तेणे झाल्या संतभेटी ॥२॥
मूळ पूर्वजांचा ठेवा । तेव्हा बालकासी मेवा ॥३॥
शिवदास देखियले । शिवयोग्याची पाऊले ॥४॥
* * *

No comments:
Post a Comment