बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्दविहार उदघाटन समारंभ संपन्न ; मराठवाड्यातील विकासात्मक कामांसाठी
शासनाकडून सर्वोतोपरी मदत - राज्यमंत्री संजय बनसोडे
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पुर्णा येथील भुमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून नितिमान माणूस घडविण्याचे महान कार्य येथे होत आहे. धम्माच्या आचरणाची शिकवण येथील मातीत मिळत असून पुर्णा येथील धम्म कार्य ऐतिहासिक असल्याने बुध्दविहार परिसरातील तसेच मराठवाड्यातील विकासात्मक कामांसाठी शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल. असे प्रतिपादन पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वयच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भुकंप व पुर्नवसन आणि संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
17 व्या बौध्द धम्म परिषदेनिमित्त बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्दविहार उदघाटन समांरभ कार्यक्रमाचे आयोजन पुर्णा येथे करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो, भदन्त प्रज्ञादिप महाथेरो, भदन्त सदानंद महाथेरो, थायलंडचे भदन्त फ्रा सुर्या, दक्षिण कोरियाचे भदन्त चेऊंगडॅम व बुध्दीस्ट विद्यापीठाचे कुलगुरु भदन्त वोनेवुंग, मान्यमारचे भदन्त आयुपाल, प्रोफेसर भदन्त मैत्रिवीर नागार्जूना यांच्यासह परभणीच्या महापौर अनिताताई सोनकांबळे, डॉ.एस.पी.गायकवाड, यशवंत उबारे, प्रा.गौतम मुंडे, आर.के.गायकवाड, ॲड सतिश देशपांडे, श्रीमती ज्योती बगाटे, उत्तम खंदारे आदिची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून शासन विविध कामे करीत आहे. धम्मात कार्य करणारा मी सर्वसाधारण कार्यकर्ता असून पुर्णा येथील विविध विकास कामांचा प्रस्ताव सादर केल्यास तात्काळ मान्यतेसह निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच मराठवाड्यातील दाभाड, औरंगाबाद या ठिकाणच्या बौध्द स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाकडून नियोजनबध्द कार्यक्रम लवकरच आखला जाणार आहे. असे सांगून चैत्युभूमी येथील स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी काम करण्यात येत असून या कामास गती देवून 2022 पर्यंत स्मारकाचे काम पुर्ण होईल. असेही ते यावेळी म्हणाले.
सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय राहणारे व योगदान देणारे नेतृत्व म्हणजे राज्यमंत्री संजय बनसोडे हे होय असे सांगून उपस्थित भिक्खु संघाचा सविस्तर परिचय कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी करुन दिला. समारंभात राज्यमंत्री श्री.बनसोडे यांचा बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुध्दविहार समिती पुर्णाच्यावतीने बुध्दमुर्ती व स्मृतिचिन्ह भेट देवून सत्कार करण्यात आला. सुरुवातीस बुध्द विहाराचे उदघाटन राज्यमंत्री श्री.बनसोडे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले तसेच ‘लुंबिनी’ स्मरणीकेचे प्रकाशन राज्यमंत्री संजय बनसोडे व भदन्त प्रज्ञादिप महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभास उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment