शेतकऱ्याचे आयुष्य ‘इझी गोईंग’ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न - मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे
• महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
• जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी साधला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याशी दिलखुलास संवाद
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करुन कर्जमुक्ती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य ‘इझी गोईंग’ कसे होईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तरी अधिकाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला न दुखावता आनंदाने व प्रामाणिकपणे योजनेची कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी व गिरगाव (ब्रु) येथील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची कामे सुरळीतपणे पहिल्याच दिवशी सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांशी समजुतदारपणे वागून पुर्णत: सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील रहिवाशी असलेले शेतकरी विठ्ठल रुस्तुमराव गरुड यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले 1 लाख 15 हजार 875 रुपये कर्जमाफ झाल्याबद्दल संवाद साधला. यावेळी श्री. गरुड यांनी कर्जमाफीचा लाभ घेत असतांना खुप सहजपणे लाभ मिळाला, कुठलीही किचकट प्रक्रिया पहावयास मिळाली नाही तसेच बँक व्यवस्थापक श्री.शिराळे यांनी खुप सहकार्य केल्याची भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री.ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना आपल्या मुलींच्या लग्नांचे निमंत्रण देवून शासनाने प्रत्यक्ष कर्जमाफी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रमाणे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी श्री.गरुड यांच्याशी संवाद साधून कर्जमाफीचा लाभ मिळताना त्रास झाला का, जमीन किती आहे असे प्रश्न विचारुन शेतकरी आनंदात रहावा त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, घर, लग्न, प्रपंच व्यवस्थित पार पाडावा यासाठी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच परभणी तालु क्यातील पिंगळी येथील बाबाराव शंकरराव दामोदर यांचे 1 लाख 8 हजार 271 रुपयांचे कर्जमाफ झाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. आणि कर्जमाफी घेताना कुठलीही अडचण आली नाही व खुप कमी वेळेत मला कर्जमाफीचा लाभ मिळाला असून या कामात खुपच तत्परता दिसून आल्याचे अनुभवाचे बोल त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणा करुन मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाभ वितरणाची कार्यवाही केवळ 60 दिवसात सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिली. तर उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये हाच कर्जमाफी देतानाचा उद्देश असून बळीराजा कर्जमुक्त व्हावा व त्यांने संसार सुखात व आनंदात करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सला महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेले लाभार्थी शेतकरी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment