ब्रह्मीभूत वेदांतकेसरी गुरुवर्य ह.भ.प.श्री रंगनाथ महाराज_सोनपेठकर (गुरुजी) यांचा संक्षिप्त चरीत्र- परिचय
सोनपेठ (दर्शन) :-
मूळ नाव—श्री.रंगनाथ कोंडिबा चिद्रेवार.जन्मगाव—सोनपेठ, जि.परभणी.जन्म—शके १८११-इ.स.१८८९. महारांजाचे पूर्वज—पणजोबा— राणोबा—विठ्ठलाचे निस्सिम भक्त, तुकाराम गाथा तोंडपाठ, सोनपेठवरुन पंढरीची पायी वारी करीत, पंढरपूरच्या वाळवंटातच अखेरचा श्वास.आजोबा— आबा—भगवद्भक्त व निष्ठावंत वारकरी, पंढरीची मासिक वारी सुरु केली, पंढरीरायाच्या चरणीच अखेरचा श्वास.
वडिल— कोंडिबा व आई— मनुबाई—दोघेही भगवद्भक्त व अध्यात्मिक वृत्तीचे.महाराजांची भावंडे—थोरले बंधू विठ्ठल तर लक्ष्मण व मारुती ही लहान भावंडे.शिक्षण— इ.४ थी— ५ वी पर्यंत.महाराज सहा— सात वर्षांचे असताना मातृ—पितृ छत्र हरपले.
महाराज बालपणापासून अंतरंगी रंगणारे व अध्यात्माची ओढ असणारे होते.कापसाचा तेजी—मंदीचा व्यापार केला, परंतु त्यात तोटा आल्याने तो व्यापार सोडला व ते अध्यात्माकडे वळले.
दैठणा येथील ठाकूरबुवा महाराजांकडून तुळशीची माळ घालून घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केला.सोनपेठ येथील सत्पुरुष योगानंद यांचे शिष्य गंगाराम यांच्याकडून अध्यात्माचे प्राथमिक धडे घेतले.
प.पू.श्री.शंकरानंद सरस्वती स्वामी यांच्याकडून विचारसागर व वृत्तीप्रभाकर या गुढतत्वज्ञानदर्शक ग्रंथांचे मार्गदर्शन घेतले व या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला.काशीक्षेत्री जाऊन संस्कृत भाषेचे शिक्षण व वेदांत ग्रंथांचे अध्ययन, लौकिकार्थाने शिक्षण कमी असूनही अध्यात्माच्या ओढीने पूर्ण केलै. अध्यात्मातील गोडीमुळे विवाह न करण्याचा निर्णय, त्यामुळे लहान बंधू लक्ष्मण यांचा विवाह निश्चित करण्यात आला.लहान बंधूच्या विवाहानिमित्त महाराज पुण्यात आले, विवाह समारंभानंतर वर्हाड माघारी परतले. परंतु महाराज मात्र आळंदीच्या साधकाश्रमात पोहोचले.गुरुवर्य ह.भ.प.श्री.विनायक महाराज साखरे तथा दादा यांना गुरुस्थानी ठेवून साधकाश्रमात त्यांनी अध्यात्मिक अध्ययनाला निष्ठापूर्वक सुरुवात केली.गुरुंनी घेतलेल्या परीक्षेत ते यशस्वी ठरले व श्रद्धापूर्वक अध्ययनामुळे आपल्या गुरुचे ते लाडके शिष्य बनले. अनेक वर्षे चिकाटीने, जिद्दीने व अध्यात्माच्या ओढीने ते साधकाश्रमात शिकत राहिले व तेथून ते अधिकारी पुरुष म्हणून प्रबोधन कार्यासाठी बाहेर पडले.आपल्या गुरुबरोबर काशीक्षेत्री विद्वान पंडित अशा ब्राह्मणसभेत गेल्यानंतर त्यांच्याठायी असणार्या विद्वत्तेमुळे त्यांचा गौरव करण्यात आला.साधकाश्रमातील अध्ययन व वास्तव्याने महाराजांच्या अंगी प्रखर वैराग्य प्राप्त झाले, म्हणूनच प्रबोधनकार्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या वाट्याला आलेले सोनपेठ येथील वडिलोपार्जित घर नगरेश्वर मंदिराला दान देऊन टाकले.अद्वैत वेदांताचा गाढा अभ्यास असल्यामुळे अतिशय सहज—सोप्या भाषेत वेदांत सांगण्याचे कौशल्य महाराजांकडे होते.वेद, वेदांत, संस्कृत उपनिषदे, संतांचे वाड्मय या सार्यांचा अभ्यास करणारे महाराज मोक्षाचे महत्त्व जाणून होते.
मोक्षप्राप्तीसाठी भक्ती व नामस्मरण ही कलीयुगातील साधनेही महाराज जाणून होते.भक्ती व नामस्मरण करण्यासाठी वारकरी होण्यासारखे सहज—सोपे साधन कोणतेही नाही हे पटवून देण्यासाठी महाराज महाराष्टभर पायपीट करु लागले.आपल्या कीर्तन—प्रवचनातून वारकरी होण्याचा सातत्याने महाराजांनी आग्रह धरला.अतिशय सहज—सोपी भाषाशैली, मराठवाड्याच्या बोलीभाषेचा वापर, उदाहरणे—दृष्टांत देऊन विषय पटवून देण्याची पद्धत, सामान्यजणांना पटेल—रुचेल—समजेल व पचेल अशा पद्धतीने गहन, गूढ, अवघड व क्लिष्ट भागही समजावून देणे या महाराजांच्या कीर्तन—प्रवचनांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या कीर्तन—प्रवचनासाठी हजारो श्रोत्यांची गर्दी जमत असे.पंढरपूरात चातुर्मासात राहून कीर्तन—प्रवचनाबरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांचे विवरणही सांगितले.पाठाच्या माध्यमातून वेद—वेदांतग्रंथांचे विश्लेषण समजावून देण्याचा नवीन प्रकार रुढ केला.महाराज मनाने प्रेमळ होते परंतु त्यांची भाषाशैली स्पष्ट व परखड अशी होती. श्रोत्यांच्याच नव्हे तर समकालीन महाराज मंडळींच्यादेखील ते चूका दाखवून देत व प्रसंगी कानउघाडणीही करीत असत.सुमारे पन्नासवर्षांहूनही अधिक काळ त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार—प्रसारासाठी कार्य केले व हजारो—लाखो लोकांच्या जीवनात भगवद्भक्ती निर्माण केली.पायाला भिंगरी लावल्यागत ते संपूर्ण महाराष्टभर कीर्तन—प्रवचनासाठी फिरत राहिले, पण या गोष्टीचा त्यांनी कधी मोठेपणा मिरवला नाही.महाराजांच्या ठायी प्रखर वैराग्य होते, त्यामुळे त्यांची राहणी व खान—पानदेखील अतिशय साधे होते. महाराज कीर्तन—प्रवचनासाठी कधीही मानधन घेत नसत, कोणी देण्याचा प्रयत्न केला किंवा घेण्याचा आग्रह केला तर ते तो कार्यक्रमच घेत नसत. कोणी कपड्याचा आहेर करु लागले तर प्रथम नम्रपणे नाकारत पण कोणी जबरदस्ती करु लागले तर काडीपेटी घेऊन त्या कपड्यांना आग लावू का? असे म्हणत.
महाराज कीर्तन—प्रवचनासाठी कधीही स्वतंत्र गाडीची मागणी करत नसत, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करीत असत.त्यांनी आपला मठ स्थापन केला नाही की मंदिर, तसेच शिष्य जमवले नाहीत व गादीही निर्माण केली नाही.महाराजांकडे जसे प्रखर वैराग्य होते तसे ते आयुष्यभर प्रसिद्धी पासूनही लांब राहिले, त्यामुळेच ते जिवंत होते तोपर्यंत त्यांच्यावर कोणी साधा लेखही लिहू शकले नाही. त्यांच्या निर्वाणानंतरच त्यांचे चरित्र व त्यांनी केलेल्या कीर्तन—प्रवचनाची संपादीत करण्यात आलेली पुस्तके प्रसिद्ध होऊ शकली.महाराजांनी देह, आत्मा, परमात्मा, मनोनिग्रह, भक्तिमार्ग, संतसंगती, नामस्मरण, परमार्थ व जीवन्मुक्ती अशा विषयांवर समाजाचे अध्यात्मिक प्रबोधन सहज—सोप्या भाषेत केले.संसारासक्ती, संसारातील फोलपणा, संसारातील विरक्ती, संसार आणि परमार्थ, सद्गुरुंचे महत्त्व, सद्गुरुंचा शोध, सद्गुरुंची शिकवण, सद्गुरुसेवेचा लाभ,मोहनिवृत्ती, वारकरी संप्रदाय, ज्ञान—अज्ञान, सर्वांमध्ये ईश्वराचा अंश, अनिती—अनाचार—व्यसनांपासून दूर व भक्तीचा खरा मार्ग या विषयांवर महाराजांनी समाजाचे वैचारिक प्रबोधन केले.देहावर मनुष्यत्वाचे संस्कार आवश्यक, वैराग्य—ज्ञान—मोक्ष, श्रवण भक्ती, वारकरी संप्रदाय, पर्यावरण रक्षण, समता—समरसता, मानवता, भूतदया, मदतीचा भाव, संघटन, अन्यायाविरुद्ध संघर्ष, स्री—पुरुष समानता या संदर्भातील सामाजिक जाणिवा महाराजांनी आपल्या कीर्तन—प्रवचनातून विकसित केल्या.महाराजांनी केलेल्या अध्यात्मिक प्रबोधनामुळे लाखो लोक वारकरी संप्रदायात आले, अनेक गावे व्यसनमुक्त झाली.एका सामान्य कुटूंबात जन्मलेले रंगनाथ हे आपल्या कर्तुत्वाने अध्यात्मिक क्षेत्रात अधिकारी पुरुष म्हणून गणले गेले व अखेर संतपदाला पोहोचले.वारकरी संप्रदायाचा इतिहास रंगनाथ महाराजांची नोंद घेतल्याशिवाय लिहिला जाऊ शकत नाही, एवढे महान कार्य महाराजांनी केले आहे.
आयुष्यभर प्रबोधनाचे कार्य करणारे रंगनाथ महाराज मार्गशीर्ष वद्य एकादशीस शके १८९७ दि. ४ जानेवारी १९७० रोजी अनंतात विलीन झाले. (यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीस म्हणजे रविवार दि.२२ डिसेंबर २०१९ रोजी त्यांचे पन्नासावे पुण्यस्मरण असणार आहे.) परभणी या त्यांच्या कर्मभूमीत त्यांची महायात्रा निघाली, या अत्यंयात्रेत वारकरी संप्रदायातील सर्व अधिकारी पुरुष व वीस—बावीस हजार वारकरी सामील झाले होते.संतचरित्रकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री.दा.का.थावरे महाराजां बद्दल म्हणतात, "संत तुकाराम महाराजांनंतर वारकरी संप्रदायात रंगनाथ महाराज होऊन गेले." या मताचा विचार करता रंगनाथ महाराजांचे मोठेपण लक्षात येते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अंशावतार असणार्या रंगनाथ महाराजांनी माणसातील सद्गुण प्रवृत्ती वाढविण्यासाठी कार्य केले.महाराजांनी मानवी मनाची मशागत करुन त्यांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त केले, याचा परिणाम म्हणून विशेषतः मराठवाड्यातील लोकांचे स्थलांतर व धर्मांतरण कमी झाले.वेदांतयोगी असणार्या रंगनाथ महाराजांवर सोलापूर विद्यापीठातून मला पीएच.डी.करण्याचे भाग्य लाभले व त्यांचे चरित्रही त्यांच्याच कृपेवरुन मला लिहिणे शक्य झाले, म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो.
रंगनाथ महाराजांनी जे विचार मांडले ते आपल्या आचरणात उतरविणे व त्यांच्या कार्य—विचारांचा प्रसार करणे हिच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
—संतसेवेत
डाॅ.सचिन वसंतराव लादे,पंढरपूर.
मो.7588216526.
No comments:
Post a Comment