सैन्य भरतीसाठी 19 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी
- जिल्हाधिकारी पी.शिवशंकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्ह्यात दि.4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे. तरी सैन्य भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी दि.19 डिसेंबर 2019 पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
सैन्य भरती मेळाव्यानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, सैनिक कल्याण विभागाचे कल्याण संघटक श्री.पाटील आदिची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी पी.शिवशंकर म्हणाले की, ऑनलाईन नोंदणी करुन प्राप्त केलेल्या प्रवेशपत्राशिवाय या सैन्य भरतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे बंधनकारक असून याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे सांगून सैन्य भरती मेळाव्यानिमित्त येणाऱ्या उमेदवारांना तात्पुरती निवास सुविधा विद्यापीठातील परिसरात करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. भरतीच्या कालावधीत वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य विभाग, महानगरपालिका, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, अग्निशामक, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा सैनिक कल्याण आदि विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेवून जबाबदारी सुयोग्यरित्या पार पाडण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment