Wednesday, December 25, 2019

विद्यार्थ्यांमधील गुणात्मक विकासाचे ध्येय शालेय स्तरावरून निश्चित होते - रमाकांत जहागीरदार कै.राजकुमार मव्हाळे पुण्यतिथी व अटलबिहारी वाजपेयी जयंतीचा संयुक्त समारंभ ; विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप

विद्यार्थ्यांमधील गुणात्मक विकासाचे ध्येय शालेय स्तरावरून निश्चित होते - रमाकांत जहागीरदार कै.राजकुमार मव्हाळे पुण्यतिथी व अटलबिहारी वाजपेयी जयंतीचा संयुक्त समारंभ ; विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप
सोनपेठ (दर्शन) :- 
 विद्यार्थ्यांमधील सर्व गुण वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकच खरे संस्कार करु शकतात. विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्या गुणांच्या विकासात्मक बदलासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील गुणात्मक विकासाचे ध्येय शालेय स्तरावरून निश्चित होते. हा दृष्टिकोन ठेवून कै.राजकुमार मव्हाळे यांनी पाहिलेले स्वप्न कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून साकार होत आहे असे प्रतिपादन सोनपेठ नागरिक बँकेचे चेअरमन तथा भाजपा जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार यांनी केले. 
     खडका येथील कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेच्या प्रांगणात  कै.राजकुमार मव्हाळे पुण्यतिथी व अटलबिहारी वाजपेयी जयंतीचा संयुक्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनपेठ नागरिक बँकेचे चेअरमन तथा भाजपा जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई चे जिल्ह्याचे नेते मारोतराव रंजवे, वैद्यकीय विस्तार अधिकारी पंडित चव्हाण, राजीव गांधी काॅलेज सोनपेठ चे प्राचार्य बालाजी शिंदे, कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, आरोग्य सहाय्यक व्ही. डी. राठोड, आर. एम. राठोड, आर. बी. सुर्यवंशी, पी. एस. चव्हाण, खडका येथील पोलीस पाटील वैजनाथ यादव, रामेश्वर यादव, मुरलीधर यादव, मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने, महिला वस्तीगृह अधिक्षिका सौ.आम्रपाली मव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व कै.राजकुमार मव्हाळे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे यांनी प्रास्ताविक केले. समारंभाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी कु.प्रिती कांबळे व कु.साक्षी पाटोळे यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कै.राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेच्या वतीने "भारताची महासत्तेकडे वाटचाल" या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, हाॅलिबाॅल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खो खो स्पर्धा आदी क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक यु.डी.राठोड उपस्थित होते. यावेळी मारोतराव रंजवे, शिवाजीराव मव्हाळे, सहशिक्षक आर.बी.जोशी, राजीव गांधी काॅलेज सोनपेठच्या प्रा. दिक्षा सिरसाट आदींनी मनोगत व्यक्त केले.  
       यावेळी बोलताना शिवाजी मव्हाळे यांनी सांगितले की शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना पुढे आणण्याचे कार्य डोळ्यासमोर ठेवून कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था काम करत आहे.या संस्थेच्या माध्यमातून खडका येथील कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा नवीन भव्य इमारत, सुसज्ज सोयी सुविधा, परिपूर्ण वसतिगृह व अनुभवी तज्ञ शिक्षकवृंद या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.या समारंभात कै.राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मव्हाळे कुटुंबियांच्या वतीने शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना आवश्यक उबदार शालींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक एस.डी.जालमिले यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक विजय महाजन यांनी केले. कार्यक्रमाला मव्हाळे कुटुंबिय, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment