Tuesday, December 24, 2019

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न ; वस्तु अथवा सेवेची पडताळणी करुन खरेदी करावी - जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न ; वस्तु अथवा सेवेची पडताळणी करुन खरेदी करावी -  जिल्हाधिकारी पी.शिवशंकर
परभणी (दर्शन) :- 

खरेदीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून आजचा  ग्राहक हा थेट ऑनलाईन खरेदी करताना दिसत आहे. ई-कॉमर्स प्रचंड प्रमाणात वाढले असून जबाबदारीतही मेाठी वाढ झाली आहे. ग्राहकाने कुठल्याही प्रकारची खरेदी करत असताना वस्तुची अथवा सेवेची पडताळणी करुन खरेदी करावी. असे प्रतिपादन परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले.
            राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात ग्राहक जनजागृतीबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा अनुराधा सातपुते, सदस्य ईकबाल शेख, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना धुळे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोरे आदि प्रमुख उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी पी.शिवशंकर म्हणाले की, राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहकामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात गॅस सिलेंडर, बि-बियाणे, खते  विषयक कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.  ग्राहकांना त्यांचे अधिकार व कर्तव्य ज्ञात होण्यासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  असे सांगून ग्राहकांनी नेहमी सजगतेने खरेदी करण्यावर भर द्यावा. खरेदीच्या वेळी पक्की पावती नेहमी हक्काने मागून घेणे हे ग्राहकाची जबाबदारी आहे.  ती पावती  जतन करावी जेणेकरुन आपली फसवणुक झाली आहे असे लक्षात आल्यास ग्राहक न्याय मंचाकडे पुरावा म्हणून ती सादर करुन आपली नुकसान भरपाई मिळेल व आर्थिक हानीपासुन बचाव होईल.
            यावेळी अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते यांनी ग्राहकांना ग्राहक मंचाकडे तक्रार नोंद कशी करावी, काय खबरदारी घ्यावी तसेच खरेदी करतांना व पावती घेताना कोणत्या स्वरुपाची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सदस्य श्री.शेख यांनी नवीन ग्राहक कायदा 9 नोव्हेंबर 2019 विषयी सविस्तर माहिती दिली. आणि आखिल भारती ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती देवून ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकामध्ये त्यांच्या हक्काप्रती जागृती करण्यास सदैव तत्पर राहण्यास सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक पुरवठा विभागाचे विवेक पाटील यांनी केले तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी  श्रीमती ज्योत्स्ना धुळे यांनी मानले. यावेळी उपस्थित ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्राहकांनी मांडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे जिल्हा ग्राहक न्याय मंच अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते यांनी दिली. या चर्चासत्रास ग्राहक पंचायतीचे धाराजी भुसारे, के.बि.शिंदे, अब्दुल रहीम, किरण स्वामी आदिसह प्रादेशिक परिवहन, आरोग्य, नियंत्रक वैधमापणशास्त्र, जिल्हा पुरवठा, कृषी, अन्न व औषध प्रशासन, बीएसएनएल आदि विभागाचे अधिकारी, महिला, ग्राहक मोठ्या संख्येने उपसि्थत होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment