राष्ट्रसंत श्री.ष.ब्र.डाॅ.शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी वीरमठ, मु.पो.ता. अहमदपूर (राजूर),जि. लातूर (महाराष्ट्र) लेखक : शशी पसारकर
अहमदपूरचा वीरमठ हा रंभापुरी पीठाचा शाखामठ असून पुत्रवर्गपरंपरेतील मठ आहे. या मठातील प्राचीन हस्तलिखित पुराव्यानुसार इ.स. ९३१ पासून या मठाची परंपरा चालत आली आहे असे दिसून येते. या मठावर आजपर्यंत १५ मठाधिपती होऊन गेले आहेत. श्री ष.ब्र. मडिवाळ शिवाचार्य हे मूळपुरुष होऊन गेले. हल्लीचे मठाधिपती श्री ष. ब्र. डॉ. शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हे पंधरावे मठाध्यक्ष होत. ते पूर्वाश्रमी अहमदपूरच्या श्री वे. विश्वनाथ स्वामी तसेच सौ. प्रयागबाई या दंपतीच्या पवित्र गर्भी शनिवार, दि. २५.२.१९१७ रोजी जन्मास आले.
त्यांनी अहमदपूर येथील उर्दू शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर अहमदपूरच्या तुकारामशास्त्रींकडे संस्कृतच्या अध्ययनास प्रारंभ केला. संस्कृतचा प्रारंभिक अभ्यास पूर्ण करून पुढील संस्कृतच्या अभ्यासाकरिता सोलापूर येथील श्रीमद् वीरशैव वारद संस्कृत पाठशाळेत प्रवेश घेतला. तेथे पं.जगदीश शास्त्री नालवार यांचे शिष्यत्व पत्करून साहित्यशास्त्राचा अभ्यास केला. १९३८ मध्ये काव्य-आद्य ही परीक्षा ते हुब्बळ्ळी केंद्रातून उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांचे गुरू श्री ष.ब्र. मडिवाळ शिवाचार्य यांनी वयोवृद्ध झाल्याने आपल्या हयातीतच त्यांचा १९३७ च्या माघ मास कृष्ण सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर वीरमठावर पट्टाधिकार केला. पट्टाभिषेकानंतर आपले शिक्षण पुढे चालू ठेवण्याकरिता ते पुन्हा सोलापुरास आले. १९३८-३९ मध्ये काव्यतीर्थ, व्याकरण-मध्यमा आणि वेदान्त या परीक्षांत ते उत्तीर्ण झाले.
पुढे बार्शी परंडकर मठाचे श्री ष.ब्र. राचलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या प्रेरणेने उच्च व्यासंगाकरिता काशीक्षेत्रास आले. तत्कालीन पीठाध्यक्ष श्रीजगद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य महास्वामींच्या अनुमतीने त्यांनी दि २३.७.१९३९ रोजी श्रीजगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुलात प्रवेश घेतला. काशीतील न्यायशास्त्राच्या विद्वांनाकडे नव्यन्यायाचा अभ्यास केला. तेव्हा पीठाच्या बँकेचे व्यवहार कोर्टाच्या विचाराधीन होते. कोर्टाच्या कामातही स्वामीजींनी सहकार्य केले. मठात कारभारी म्हणून काम पाहत असणारे श्री. शंकरप्पा नावाच्या गृहस्थामुळे मनस्ताप होऊन मनात विरक्त भाव आल्याने तपस्या करण्यासाठी ते हिमालयात निघून गेले. देशसंचार करीत असताना १९४०-४१ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. १९४५ मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून डॉक्टर उपाधी प्राप्त केली.
१९५२ पर्यंत सुमारे १२ वर्षेपर्यंत देशाटन करून विविध अनुभव प्राप्त करून पुन्हा अहमदपूरला येऊन मठाचा कार्यभार हाती घेतला. विद्वान स्वामीजींनी मराठी वीरशैव संतवाङ्मय प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने मन्मथस्वामींचा 'परमरहस्य' ग्रंथ संपादून १९६१ मध्ये प्रकाशित केला. (हा ग्रंथ तत्पूर्वी पारलिंग प्रभुअय्या बार्शीकर यांनी इ .स. १८८७ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केला होता.) महाराष्ट्रात चालणाऱ्या सप्ताह आदीच्या पारायणात त्यांचा ग्रंथच लोक वापरत असल्याने एक लाखाहून अधिक ग्रंथांची विक्री झाली आहे. २००१ मध्ये 'परमरहस्य' चतुःशताब्दी महोत्सव खूप वैभवात महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला.
स्वामीजी सुमारे पन्नास वर्षांपासून कार्तिक पौर्णिमेला कपिलधार क्षेत्राची पदयात्रा करीत आहेत. त्यांनी काही ग्रंथरचना करून मराठी वीरशैव साहित्यात भर घातली आहे. महाराष्ट्रात शिवसांप्रदायिक कीर्तन ते स्वतः करतात. अनेक कीर्तनकारांना तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. 'श्रीसिद्धान्तशिखामणी'वर संस्कृत व्याख्या लिहिणारे पंडित अशी त्यांची ख्याती आहे. श्रीपलसिद्ध बृहन्मठ, साखरखेर्डा, जि. बुलडाणा येथे २५ व २६ मे २००८ रोजी अ.भा. दुसरे वीरशैव मराठी साहित्य संमेलन श्री ष. ब्र शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ते निःस्वार्थी आणि निर्भय असून १०२ वर्षांतही तरुणांसारखे धर्मप्रचार कार्यात निरंतर मग्न असणाऱ्या त्यांचा विश्वाराध्य गुरुकुलास अभिमान आहे.
(संदर्भ :
श्री काशी विश्वाराध्य गुरुकुल, पृ. ३६७-३६८)
***
मराठी वीरशैव साहित्य ग्रुप वरून.

No comments:
Post a Comment