Monday, September 7, 2020

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; वैद्यकीय प्रवेशाचे 70 30 सूत्र रद्द होणार ! उद्या मंत्र्यांच्या वतीने सभागृहात निवेदन

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; वैद्यकीय प्रवेशाचे 70 30 सूत्र रद्द होणार ! उद्या मंत्र्यांच्या वतीने सभागृहात निवेदन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

वैद्यकीय प्रवेशासाठी संपूर्णपणे बेकायदेशीररित्या असलेले 70: 30 हे सूत्र रद्द करण्यात येणार असून यासंदर्भात उद्या वैद्यकीय शिक्षणमंत्री विधिमंडळात निवेदन करणार आहेत अशी माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी एकमत शी बोलताना दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याची अधिकृत घोषणा उद्या सभागृहात होईल असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
      वैद्यकीय प्रवेशासाठी 70: 30 चे सूत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी आज मराठवाड्यातील आमदारांनी विधीमंडळ परिसरात केली. या बेकायदेशीर सूत्राच्या विरोधात मराठवाड्यातील आमदारांचा आवाज घुमला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान मराठवाड्यातील सर्व आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज पार पडली. 
      देशभरात नीटची एकच परीक्षा असताना प्रवेशासाठी मात्र भेदभाव का? मराठवाड्यातील विद्यार्थी सातत्याने वैद्यकीय प्रवेशात डावलले जात आहेत. या प्रश्नावर आम्ही न्यायालयातही दाद मागितली आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले. तर मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालये कमी असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी विदर्भात जाऊन विद्यार्थ्यांना अकरावी- बारावीला प्रवेश घ्यावा लागत आहे, याकडे आमदार वरपूडकर यांनी लक्ष वेधले. आज मराठवाड्यातील सर्व आमदार या प्रश्नावर एकवटले. आमदारांची ही एकजूट पाहून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या प्रश्नावर आपण गंभीर असल्याचे सांगितले.

लढा यशस्वी झाल्याचे समाधान आमदार- राहुल पाटील
मराठवाड्यातील पालक व सर्वांनी हा विषय सातत्याने लावून धरला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण विधिमंडळातही सातत्याने आवाज उठवला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या काळातही या विषयावर आवाज उठवण्यात आला होता. आता मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय मिळवून दिला आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राहुल पाटील यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी यासंदर्भात निर्णय भूमिका घेतल्याने हा निर्णय होऊ शकला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment