Tuesday, September 22, 2020

खा.फौजीया खान अन्नत्याग करणार..

खा.फौजीया खान अन्नत्याग करणार..

mp faujiya khan news




परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले कृषी विधेयक आणि त्या विरोधात संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला आता मोठा पाठिंबा मिळतांना दिसतो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपण देखील आंदोलकांसोबत एक दिवस अन्नत्याग करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता त्यांच्या पक्षाच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील अन्नत्याग करत या आंदोलनात सहभागी होत असल्याचे सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना सांगितले.कृषी विधेयकला विरोध करत राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या कॉंग्रेससह अन्य पक्षाच्या आठ खासदारांना उपसभापतीने सात दिवसांसाठी निलंबित केले होते. या कारवाई आणि कृषी विधेयकांच्या विरोधात या सर्व खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळच उपोषण सुरू केले. याचे पडसाद आजही संसदेत उमटले आणि खासदारांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला सुरूवात झाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपोषणाला बसलेल्या खासदारांना पांठिबा दर्शवत शरद पवार यांनी देखील आपण एक दिवस अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.

शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे इतर खासदार देखील या आंदोलनात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात खासदार फौजिया खान यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आमचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय ते एक दिवस अन्नत्याग करत कृषी विधेयकाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या सदस्यांच्या आंदोलनात देखील सहभागी होत आहेत. मी देखील सभात्याग करून बाहेर पडले असून अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

कृषी सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदानासाठी ठेवले तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने वॉकआऊट केले होते. राष्ट्रवादीच्या या कृतीवर अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीने एकप्रकारे विधेयकाला पाठिंबाच दिला असा आरोप देखील केला गेला.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय कुणीही कृषी विधेयक व पक्षाच्या भूमिके बद्दल अधिक भाष्य केले नव्हते. परंतु आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विधेयक आणि त्यावरून देशाच्या काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलन व सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईवर आपली सविस्तर भूमिका मांडली. शिवाय अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही जाहीर केले.


सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
 

No comments:

Post a Comment