Monday, January 13, 2020

वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे - खासदार संजय जाधव

वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे - खासदार संजय जाधव
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता रस्ता सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. तरी वाहन चालकांनी वाहन चालवितांना सामाजिक बांधिलकेतून  वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करुन अपघातमुक्त परभणी जिल्हा करावा. असे आवाहन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केले. 
 31 वे रस्ता सुरक्षा अभियान 2020 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.विघ्ने, विभाग नियंत्रण श्री.जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, पोलिस निरीक्षक श्री.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरवदे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी व्ही.व्ही. माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 खासदार श्री.जाधव म्हणाले, नागरिकांनी मद्यपान करुन आणि भ्रमणध्वनीवर बोलतांना वाहने चालवू नयेत. अपघातग्रस्त कुटुंबाला अपघात झाल्यावर खुप अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे अपघात होणार याची दक्षता घेऊन योग्य त्या वेगात वाहन चालविणे हे प्रत्येक वाहन धारकांचे कर्तव्य असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अपघाताच्यावेळी आर्थिक नुकसानीपासून बचाव करण्यासाठी वाहनांचा विमा नेहमी नुतनीकरण करुन अद्यावत ठेवलेला असावा. अति जास्त वेग हा अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने योग्य वेगात वाहन चालवावे तर अतिवेगात वाहन चालविणे टाळावे. तसेच अपघातग्रस्ताचे सोशल मीडियावर चित्रीकरण टाकणे अथवा  छायाचित्र अपलोड करणे टाळून अपघातग्रस्त व्यक्तीस  तात्काळ वैद्यकीय मदत पोच करुन माणुसकीच्या नात्याने जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
 सर्व नवीन व जुन्या वाहनधारकांनी वाहतुकींच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन वाहन चालवावे असे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी सांगितले. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काटकर यांनी रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयात प्रबोधनपर मार्गदर्शन केले जात आहे. गतवर्षी परभणी जिल्ह्यातील अपघातात अंदाजे 9 ते 10 टक्के घट झाली असल्याचे सांगून रस्ता सुरक्षित करण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 
 कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी वाहतुक नियमावली या पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातात अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणारे डॉ.संतोष घुले, मोटार वाहन निरीक्षक अभिजित वाघमारे, अभिजित तरकसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरवदे, प्रशांत वाव्हळे, बसचालक गजानन गायकवाड यांचा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आणि वाहन अनुज्ञप्ती प्राप्तीकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या श्रीमती करमरकर हीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम समारोपात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिसरातील वाहनांवर मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर्स लावण्यात आले. कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अधिकारी- कर्मचारी, वाहनधारक, वाहनचालक, ड्रायव्हिंग स्कुल चालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 -*-*-*-*-

No comments:

Post a Comment