Wednesday, March 17, 2021

ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांची सेनगावमधून बिनविरोध निवड ; वरपूडकर गटास सुखद धक्का......

ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांची सेनगावमधून बिनविरोध निवड ; वरपूडकर गटास सुखद धक्का......



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सेनगाव (जि. हिंगोली) सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र देशमुख यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मतदार यादीतून बुधवारी (दि.17) वगळले आहे. त्यामुळे देशमुख यांची उमेदवारी आपोआप रद्दबातल ठरली असून ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.या निवडीने जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर गटास सुखद धक्का बसला आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिलासाशी बोलताना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या संस्थेचे नाव मतदार यादीतून वगळले असल्याचे नमूद करीत गुरुवारी (दि.18) या संदर्भात अधिकृत आदेश काढला जाईल, असे स्पष्ट केले.
सेनगाव सोसायटीत गोरेगावकर यांच्यासह राजेंद्र देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. छाननीत देशमुख यांच्या अर्जावर आक्षेप दाखल झाला होता. त्याव्दारे देशमुख यांचा ठराव देणारी सहकारी संस्था ठराव करतेवेळी थकबाकीदार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. परंतु नवडणूक निर्णय अधिकार्यांनी सकृतदर्शनी पुराव्याच्या आधारे त्यांचा आक्षेप फेटाळला. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्या गेले होते. खंडपीठानेही सकृतदर्शनी ठराव देणारी संस्था बेबाकीत आहे, असे स्पष्ट करीत तक्रारकर्त्याचा आक्षेप फेटाळला. त्याविरोधात हिम्मतराव खरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.याचिका दाखल केली. 15 मार्च रोजी पटलावर याचिका आल्यानंतर सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्याने ठराव दाखल करतेवेळी देशमुख यांची संस्था थकबाकीदारच होती, असे निदर्शनास आणून त्या तारखेस थकबाकीदार असणाऱी संस्था मतदारयादीत पात्र कशी ठरू शकते ? असे म्हटले. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे हे म्हणणे ग्राह्य धरले. त्या तारखेत थकबाकीदार असणार्या संस्थेचा मतदारयादीत समावेश होऊ शकत नाही, असा न्यायालयाने निर्वाळा दिला. त्यामुळेच राजेंद्र देशमुख यांचा ठराव करणार्या संस्थेच्या मतदारयादीतील पात्रतेवरच गंडांतर कोसळले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयाची प्रत जिल्हा निवडणूक अधिकार्यांना बुधवारी कार्यालयीन वेळेपर्यंत प्राप्त झाली. त्यापाठोपाठ निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठराव घेतलेल्या त्या संस्थेचे नाव मतदारयादीतून वगळले. पर्यायाने देशमुख यांची उमेदवारीच रद्दबातल झाली आहे. गुरुवारी या अनुषंगाने अधिकृत आदेश काढण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment