Friday, March 12, 2021

कुचराई केल्याबद्दल वैद्यकीय अधिकार्‍यासह नऊ कर्मचार्‍यांचे वेतन कपात...

कुचराई केल्याबद्दल वैद्यकीय अधिकार्‍यासह नऊ कर्मचार्‍यांचे वेतन कपात...



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महानगर पालिका हद्दीतील इनायतनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि.12) कोविड लसीकरणाच्या मोहीमे दरम्यान वेळेवर हजर न झालेल्या एका वैद्यकीय अधिकार्‍यासह नऊ कर्मचार्‍यांचे महापालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांनी एक दिवसाचे वेतन कपात केले आहे.
येथील इनायत नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड लसीकरणाची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. विशेषतः या परिसराअंतर्गत आसपासच्या प्रभागातीलसुध्दा ज्येष्ठ नागरिक या आरोग्य केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यापासून हजर राहत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी (दि.11) केंद्रास सुट्टी होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी या केंद्रावर मोठ्या रांगा लावल्या परंतु महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचाऱी सकाळी 11 वाजेपर्यंत थांगपत्ताच नव्हता. स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब बुलबुले यांनी या केंद्रावरील ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा ओळखून तात्काळ खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यापूर्वीसुध्दा ते या व्यवस्थेत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अधिकारी - कर्मचारी न फिरकल्याने संतप्त नगरसेवक बुलबुले यांनी आयुक्त श्री.पवार यांच्या निदर्शनास ती बाब आणून दिली. महापालिकेच्या पथकाने पाहणी केली तेव्हा 11 वाजपेर्यंत रांगा असूनसुध्दा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्रावर आढळले नाहीत. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जगताप यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये केंद्रावरील वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य कर्मचार्‍यांना कोविड लसीकरण मोहीमेत केंद्रावर वेळेवर हजर न झाल्याबद्दल तसेच त्यांच्या या वागणूकीने ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास झाल्याबद्दल एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात या पध्दतीने कृती केल्यास आठ दिवसांचे वेतन कपात केले जाईल, असा इशाराही उपायुक्त जगताप यांनी या पत्राव्दारे दिली. या बाबी सर्व आरोग्य केंद्रांना लागू राहतील, असेही नमूद केले.
यात वैद्यकीय अधिकारी डॉ. नाहीद फातेमा, कर्मचारी शेख मारिया, स्नेहा लांडगे, जे.आर. ठाकूर, पी.आर. गऊळकर, मनिषा सूर्यवंशी, अंजना दुभाळकर, रेणूका मुराडी यांच्यासह सर्व आशा स्वयंसेविकांच्या वेतनात एकदिवसाची कपात झाली आहे.

No comments:

Post a Comment