Tuesday, March 23, 2021

परजिल्ह्यातून ये-जा करण्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी -जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश

परजिल्ह्यातून ये-जा करण्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी -जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातुन ये - जा करणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांना मंगळवार दि.23 पासून 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (दि.22) सायंकाळी जारी केले.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आजुबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी -  कर्मचार्‍यांचे अपडाऊन रोखणे आवश्यक आहे. त्यावर उपाययोजना म्हणून परभणी जिल्ह्याबाहेरून जे अधिकारी - कर्मचारी जिल्ह्यात अप-डाऊन करतात असे अधिकारी, कर्मचारी अनेक व्यक्ती, नागरिक, प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादूर्भाव जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारपासून ते 31 मार्चपर्यंत जे कोणी अधिकारी - कर्मचारी नोकरी व कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात जातात अथवा बाहेर जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचारी या जिल्ह्यात येतात अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास व जिल्ह्यातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व कार्यालये, विभागप्रमुख यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment