फेरफारासाठी लाच स्वीकारणारा गंगाखेड तालुक्यातील वाघदरा मंडळ अधिकारी लटपटे व सरपंच गोविंद दत्तराव सानप ताब्यात...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार वडील व चुलत्याच्या नावे लावण्यासाठी लाचेची मागणी करणार्या मंडळ अधिकार्यासह सरपंचास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी (दि.22) रंगेहात पकडले.
गंगाखेड तालुक्यातील वाघदरा शिवारातील आजोबांच्या नावाने असलेल्या जमिनीचा कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार आपले वडील व चुलत्याच्या नावे लावून द्यावा, अशी विनंती राणीसावरगाव येथील मंडळ अधिकारी बालाजी संभाजी लटपटे यांच्याकडे तक्रारदाराने केली होती. मात्र, मंडळ अधिकारी लटपटे यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद न देता वाघदरा येथील सरपंच गोविंद दत्तराव सानप यांच्यामार्फत फेरफार करण्यासाठी 15 हजार रुपये लागतील, असा निरोप देत लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी परभणी येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे व पोलिस निरीक्षक अमोल कडू यांच्याकडे मंडळ अधिकार्याविरूध्द तक्रार केली. श्री. हुंबे व कडू यांनी कर्मचारी अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमील जागीरदार, हनुमंते, शेख मुखीद, माणिक चट्टे, शेख मुख्तार, कदम, चौधरी, महिला पोलिस कर्मचारी दंडवते, महिला कर्मचारी सारिका टेहरे आदींच्या पथकाने सोमवारी लटलटे यांच्या निवासस्थानी गंगाखेड येथे सापळा लावला. तक्रारदार यांचे वाघदरा शिवारातील त्यांचे आजोबाच्या नावाने असलेला जमिनीचा कोर्टाकडून झालेला तडजोडीचा फेरफार त्यांचे वडीलांचे व चुलत्याच्या नावे लावण्यासाठी मंडळ अधिकारी बालाजी लटपटे, सरपंच गोविंद सानप यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 12 हजार 500 रुपये बालाजी लटपटे यांच्या गंगाखेडातील व्यंकटेशनरातील निवासस्थानी सरपंच गोविंद सानप यांच्या मार्फत स्वीकारले. लाचेच्या रकमेसह दोघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.
No comments:
Post a Comment