जिल्हा बँकेत 15 जागांकरिता वरपुडकर विरूध्द बोर्डीकर यांच्यात लढाई...
सहा जागा बिनविरोध... : 33 उमेदवार रिंगणात....
परभणी / सोनपेठ (दर्शन):-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणातून बुधवारी (दि.दहा) हिंगोली व गंगाखेड सहकारी संस्था मतदारसंघ अपवाद अन्य 15 मतदारसंघात 33 प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज कायम राखले आहेत. परिणामी, वरपुडकर विरूध्द बोर्डीकर या दोन गटात निवडणूक अटळ ठरली आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी विविध मतदारसंघात अर्ज दाखल केलेल्या बहुतांशी इच्छुकांव्दारे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, असे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे हिंगोली व गंगाकेड सहकारी संस्था मतदारसंघ अपवाद, अन्य मतदारसंघातील हौश्या-नवश्या इच्छुकांनी अर्थपूर्ण तडजोड करीत अर्ज मागे घेतले. वरपुडकर - बोर्डीकर गटातील प्रतीस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज कायम राखले आहेत.
हिंगोली मतदारसंघातून दत्तराव जाधव यांच्या पाटोपाठ गुलाबराव सरकटे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे तेथून आमदार तानाजी मुटकूळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. गंगाखेडातून सुभाष ठवरे व प्रल्हादराव मुरकूटे झोलकर या दोघांनी माघार घेतली. त्यापाठोपाठ भगवान सानप यांच्या कन्य यशश्री सानप यांनीही माघार घेतली. त्यामुळे भगवान सानप यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
वसमतमधून आमदार राजू नवघरे यांचा अर्ज कायम राहिला. तेथून अंबादासराव भोसले, दत्तराव काळे, खोब्राजी नरवाडे या तिघांनी माघार घेतली. सविता नादरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यामुळे आमदार नवघरे यांचा बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसली.
पालममधुन गणेशराव रोकडे विरूध्द लक्ष्मणराव दुधाटे यांची अटळ ठरली. तेथून तुषार दुधाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु नारायणराव शिंदे यांनी अर्ज कायम राखला.
सोनपेठमधून श्रीकांत उत्तमराव भोसले यांनी माघार घेतली. त्यामुळे तेथून राजेश विेटेकर विरूध्द गंगाधर कदम यांच्या लढतीचा मार्ग मोकळा झाला.
बँकेच्या विद्यमान संचालक तथा ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांनी सेनगावमधून आपला उमेदवारी अर्ज कायम राखला. तेथून विद्यमान संचालिका रुपाली पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. परंतु राजेंद्र देशमुख यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना खीळ बसली. त्या ठिकाणी गोरेगावकर विरूध्द देशमुख अशी लढत अटळ झाली.
औढानागनाथमधून राजेश पाटील गोरेगावकर यांच्या विरूध्द शेषराव कदम यांच्यात लढत अटळ ठरली आहे. येथून गयाबराव नाईक यांनी उमेदवारी मागे घेऊन खळबळ उडवली. त्यापाठोपाठ मनिष आखरे यांनीही माघार घेतली.
कळमनुरीमधून यशोदाबाई चव्हाण यांनी आपापला उमेदवारी अर्ज कायम राखला. तेथून आता सुरेशराव पतंगे वडगावकर विरूध्द माजी खासदार शिवाजीराव माने व चव्हाण यांच्यात तिरंगी लढत अटळ झाली.
कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातून भावना बोर्डीकर व सुशीलकुमार देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येथून माजी आमदार सुरेश देशमुख विरूध्द बाळासाहेब निरस यांच्या लढतीचा मार्ग मोकळा झाला.
इतर शेती संस्था मतदारसंघातून समशेर वरपुडकर, शशीकांत वडकुते, चंद्रकांत चौधरी, भगवानराव वटाणे, सोपानराव करंडे, बालाजी त्रिमले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तेथून विजय जामकर विरूध्द आनंद भरोसे यांच्यातील लढाईत ज्ञानेश्वर जाधव यांचाही अर्ज कायम राहिला आहे.
महिला प्रतिनिधी मतदारसंघातून यशश्री सानप, अंजली देशमुख, करूणा कुंडगीर व वेणूबाई आहेर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून रुपाली पाटील, प्रेरणा वरपुडकर, विद्या चौधरी व भावना रामप्रसाद कदम बोर्डीकर यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून व्दारकाबाऑई कांबळे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, डॉ. प्रतिभा साबळे भालेराव, गौतम मोगले, सुशील मानखेडकर, प्रशास ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तेथून अतुल सरोदे विरूध्द शिवाजीराव मव्हाळे यांच्यात सरळ लढतीचा मार्ग मोकळा झाला.
विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून पंकजकुमार राठोड, भगवान सानप, सुमीत परिहार, सुरेश गिरी, सौ. करुणा कुंडगीर व नारायण पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तेथून अॅड. स्वराजसिंह परिहार, दत्तात्रय मायंदळे व भगवानराव वटाणे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून अंजली रवींद्र देशमुख, प्रशांत जनार्ध कापसे व मनिष आखरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे तेथून भगवानराव वाघमारे व प्रल्हादराव चिंचाणे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

No comments:
Post a Comment