Thursday, August 22, 2019

किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारपासून शिबिरे ; प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार शिबिर ; तालुक्यातील अधिका-यांना पर्यवेक्षणाच्या सूचना ; प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी

किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारपासून शिबिरे ; प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार शिबिर ; तालुक्यातील अधिका-यांना पर्यवेक्षणाच्या सूचना ; प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी

अमरावती / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अल्पभूधारक शेतक-यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळवून देणा-या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी दि. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान गावोगावी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतक-यांना सहभागी होता येईल. पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रूपये प्रतिमाह निवृत्तीवेतन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूदही योजनेत आहे.योजनेची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली. मात्र, अद्यापही नोंदणी समाधानकारक नसल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीत लाभार्थी शेतक-यांची शिबिरे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिबिर आयोजनाचा आराखडा तयार करावा. महसूल मंडळनिहाय गावांचे नियोजन करून तीन दिवसांत मंडळातील सर्व गावांत शिबिरे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी यांना दिले आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावर या तीन दिवसांत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिरे आयोजित करावीत.तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्र काढून पात्र शेतकरी बांधवांना सहभागाचे आवाहन करावे व मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.योजनेतील लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या सेवा केंद्रातील व्हीएलई, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देऊन गावातील शिबिराची तारीख, वेळ याबाबतची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.नोंदणीसाठी लागणा-या आधारकार्ड, बँक पासबुक, खातेउतारा (आठ-अ) आदी माहितीही लाभार्थ्यांना आधीच द्यावी. सर्व सेवा केंद्रचालकांना पूर्णवेळ केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोंदणीचा फॉर्म छापून घेऊन तो लाभार्थ्यांकडून भरून घेतल्यास एकत्रित माहिती संकलन (Data Entry) करणे सोयीचे होईल. आवश्यकतेनुसार योग्य तो पर्याय वापरावा. या तीन दिवसांत 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र धारण करणा-या जास्तीत जास्त शेतक-यांची नोंदणी होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश श्री. नवाल यांनी दिले आहेत.
प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी
सदर योजनेत प्रत्येक तालुक्यासाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, हे नोडल अधिकारी मोहिमेदरम्यान गावागावांत भेटी देतील.  वरिष्ठ स्तरावरील पर्यवेक्षिय अधिका-यांना तालुके वाटून देण्यात आले आहेत. पर्यवेक्षिय अधिका-यांनी या तीन दिवसांत विविध गावांना भेटी देऊन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाते किंवा नाही, याची खात्री करावी. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शिबिराला उपस्थित राहण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

                                              

No comments:

Post a Comment