Wednesday, August 7, 2019

संजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्याच्‍या योजनांच्‍या अनुदानात वाढ करण्‍याचा निर्णय ; 32 लाख लोकांना विशेष सहाय्य योजने अंतर्गत वाढीव अर्थसहाय्याचा लाभ

संजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्याच्‍या योजनांच्‍या अनुदानात वाढ करण्‍याचा निर्णय ; 32 लाख लोकांना विशेष सहाय्य योजने अंतर्गत वाढीव अर्थसहाय्याचा लाभ

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थसंकल्‍पीय घोषणेची पूर्तता विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी देण्‍यात येणा-या अनुदानाच्‍या रकमेत वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2019-20 या वर्षीचा अर्थसंकल्‍प विधीमंडळाला सादर करताना याबाबत घोषणा केली होती. त्‍यानुसार राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. सदर योजनांच्‍या राज्‍यातील  32 लाख लाभार्थ्‍यांना वाढीव अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत लाभार्थ्यांना दरमहा 600 रुपये मिळत होते त्यात 400 रुपयांची वाढ करून हे अर्थसहाय्य आता  दरमहा 1 हजार रुपये असे करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार यासंबंधीच्या प्रस्तावास आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या दोन्ही योजनेत लाभ घेणा-या विधवा लाभार्थ्यांना 1 अपत्य असल्यास 1100 व 2 अपत्ये असल्यास दरमहा 1200 रुपयांचे वाढीव अर्थसहाय्य मिळेल असेही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.  त्याप्रमाणे या लाभार्थ्यांना वाढीव अर्थसहाय्याचा लाभ मिळेल. यामुळे शासनावर वार्षिक1647 कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्यपुरस्कृत योजनांशिवाय राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना व इतर केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांची ही अंमलबजावणी केली जाते.

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या अचूक करून त्या संगणकीकृत करण्याचे तसेच लाभार्थ्यांना हे अर्थसहाय्य नियमित मिळेल अशी ऑनलाईन व्यवस्था  निर्माण करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, ती व्यवस्था ही लवकरच होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाच्‍या माध्‍यामतुन राज्‍यातील 32 लाख आर्थिकदृष्‍टया दुर्बल नागरिकांना मदत होणार असून त्‍यांच्‍या चेह-यावर निर्माण होणारा आनंद आपल्‍यासाठी विशेष महत्‍वाचा असल्‍याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

No comments:

Post a Comment