Sunday, November 1, 2020

वाचन जागर अभियानाचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते उदघाटन

वाचन जागर अभियानाचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते उदघाटन





परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी येथे प्रसिद्ध मराठी कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते वाचन जागर अभियान अंतर्गत ज्ञानसाधना पुस्तकालयच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रा. संजयराव तालखेडकर, पत्रकार माणिकराव रासवे, प्रा. बाळासाहेब जाधव, प्रा. गणेश मारेवाड, प्रा.प्रवीण पुरी,प्रा.हर्षवर्धन जाधव, समीर पवाडे हे उपस्थित होते.

"हे पुस्तक प्रदर्शन म्हणजे लॉकडाउनच्या अंधारानंतरचा प्रकाश आहे.हा दिवाळीतील ज्ञानाचा प्रकाश आहे.हा एक प्रकाश उत्सव आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे.", असा संदेश इंद्रजित भालेराव यांनी याप्रसंगी सर्वांना दिला.

वाचन चळवळ गतिमान व्हावी या उद्देशाने राज्यातील नामवंत दहा प्रकाशकांनी एकत्र येऊन वाचन जागर अभियान सुरू केले आहे. यामध्ये मेहता, मॅजेस्टिक, राजहंस,  डायमंड ,रोहन, पद्मगंधा, साकेत, साधना , ज्योत्स्ना आणि मनोविकास या प्रमुख प्रकाशकांची प्रत्येकी २५ असे एकूण २५० वाचनीय पुस्तकांचे प्रदर्शन भरवले आहे. याशिवाय ज्ञानसाधना पुस्तकालयने स्वतः इतरही प्रसिद्ध पुस्तकं प्रदर्शनात मांडली आहेत. ही सर्व पुस्तके वाचकांना २५ टक्के सवलतीत मिळतील! हे प्रदर्शन १ ते २५ नोव्हेंबर दरम्यान सर्व वाचकांसाठी खुले राहणार आहे. हे प्रदर्शन दाते किराणाच्या बाजूला, रामकृष्ण नगर, आर. आर. पेट्रोल पंपजवळ, वसमत रोड येथे  असून वाचकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी ज्ञानसाधना पुस्तकालयचे संचालक रावजी लुटे यांनी सर्वांचे आभार मानले. परभणीतील सर्व वाचक प्रेमी मंडळीनी प्रदर्शनास सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment