Sunday, November 29, 2020

धनंजय मुंडे यांच्याकडे येणार परभणी पालकमंत्रीपदाची सूत्रे नवाब मलिक हटाव मोहिमेची पक्ष नेतृत्वाकडून दखल ; काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता

धनंजय मुंडे यांच्याकडे येणार परभणी पालकमंत्रीपदाची सूत्रे नवाब मलिक हटाव मोहिमेची पक्ष नेतृत्वाकडून दखल ; काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता
 

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या कानावर पालकमंत्री नवाब मलिक यांच्याविषयी  नाराजी व्यक्त केल्यानंतर  आता  जिल्ह्याचे  पालकमंत्रीपद बदलण्याचे संकेत असून विद्यमान पालकमंत्री नवाब मलिक यांना हटवून धनंजय मुंडे यांची नियुक्ती पालकमंत्रीपदी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. लवकरच या संदर्भातील घोषणा होईल असे कळते. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीत पालकमंत्री बदलाच्या मोहिमेने वेग घेतला होता.
        महायुतीच्या काळात शिवसेनेकडे पालकमंत्रीपद होते. महाविकास आघाडीच्या सरकारनंतर ज्या पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक वर्चस्व त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र ठरले. त्यानुसार राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद गेले. नवाब मलिक यांच्या रूपाने एक ज्येष्ठ मंत्री पालक म्हणून लाभल्यानंतर कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागतील अशी भावना पक्षात निर्माण झाली. मात्र लवकरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवनवे अनुभव यायला लागले. त्यातूनच नवाब मलिक यांच्याविषयीची नाराजी वाढत गेली.
        शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्रीपदाची सूत्रे राष्ट्रवादीकडे आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल या आशेवर बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काही दिवसातच भ्रमनिरास झाला. त्यातूनच पालकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध पक्षात  नाराजी दिसून आली. एक महिन्यापूर्वी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी  जिल्हा दौर्‍यावर येऊन गेलेल्या नवाब मलिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही जबाबदार पदाधिकारी अथवा कार्यकर्ता फिरकला नाही. यावरून ही नाराजी किती टोकाची होती याची कल्पना यावी. जिल्ह्यात जिंतूर, पालम, गंगाखेड, सोनपेठ या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचे मोठे नुकसान झाले असताना पालकमंत्र्यांनी मात्र औरंगाबादहून परभणीकडे येताना रस्त्यातील काही निवडक एक -दोन ठिकाणी भेटी दिल्या. परभणीत आढावा घेऊन ते पाथरीमार्गे पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले होते. परतीच्या रस्त्यावरच काही गावांची त्यांनी पाहणी केली. यावरून या दौर्‍याची औपचारिकता लक्षात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांंची मोठी फौज आहे. एरवी ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा फौजफाटा दौर्‍यात पाहायला मिळतो. नवाब मलिक यांच्या एक महिन्यापूर्वीच्या दौर्‍यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता औषधालाही सापडला नव्हता. तेव्हा ही नाराजी प्रकर्षाने समोर आली . 
        राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाकडे जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांनी सर्व परिस्थिती कानावर घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला  पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी,  माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे  दोन-तीन दिवस मुंबईत तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या भावना स्थानिक नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या कानावर घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या बाजूने पक्षाने कौल दिल्याचे समजते. त्यातूनच नवाब मलिक यांना हटवून धनंजय मुंडे किंवा संजय बनसोडे या दोघांपैकी एकाचे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत होते. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या नावाबाबत संमती झाल्याचे कळते.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत.
नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपला रोष व्यक्त केला. कार्यकर्त्याने विकास प्रश्नावरचे कोणतेही काम पालकमंत्र्यांकडे नेल्यानंतर ते अतिशय तुच्छतेची वागणूक देतात, कार्यकर्त्यांच्या भावना कधी जाणून घेत नाहीत, आतापर्यंत ते केवळ स्वातंत्र्यदिन, मराठवाडा मुक्तीदिन या ध्वजारोहणाला आले.करोनाकाळात सुरुवातीला एकदा आले आणि त्यानंतर अतिवृष्टीच्या पाहणीचा फार्स त्यांनी उरकला. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी काही घेणेदेणे नाही. त्यामुळे आम्हालाही त्यांच्याविषयी आस्था वाटण्याचे कारण नाही. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पाऊल ठेवलेले नाही,असेही हा कार्यकर्ता म्हणाला.

No comments:

Post a Comment