पदवीधरसाठी उद्या सकाळी आठपासून मतदान ; जिल्ह्यात 32 हजार 715 मतदार बजावणार हक्क
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.एक) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात होणार आहे. जिल्ह्यात 78 मतदान केंद्र असून 32 हजार 715 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, सोमवारी (दि.30) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेण्यासाठी दाखल झाले होते. दुपारी 78 मतदान केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी मतपेट्यांसह अन्य साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले.
जिल्ह्यात 6 हजार 770 महिला तर 25 हजार 945 पुरूष असे मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 एकूण रूट गाईड, 374 मतदान अधिकारी,कर्मचारी, 100 सुक्ष्म निरीक्षक, 12 आरोग्य नोडल अधिकारी, 156 आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रावर व्हीडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. 78 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. शिवाय मतदान केंद्रावर जाणा-या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेले वाहन व मतदान पथकाच्या वाहनास जीपीएस बसविण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली. 78 मतदान केंद्रावर 114 पोलिस कर्मचाऱी, 42 महिला पोलिस कर्मचारी तैणात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पाच पोलिस अधिकारी, 78 पोलिस कर्मचारी,78 होमगार्ड आदींचा बंदोबस्त असणार असून सेक्टर पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी 19 पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डची नियुक्ती करण्यात आल्याचीही माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा करून त्या औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्ट्रॉगरूमकडे रवाना करण्यात येणार आहेत.


No comments:
Post a Comment