वैयक्तिक वैफल्याचे बोथट हत्यार : नोटा
माझ्या मतदारसंघात सगळे बेकार उमेदवार आहेत..मी नोटा वापरणार
पक्षाचे खोगीरभरतीचे धोरण मला पसंत नाही..मी नोटाचे बटण दाबणार
माझ्या इथे आयात उमेदवार आहे..मी नोटाचा सोटा मारणार.
मॉब लिंचिंग करतात..मी नोटाचा तडाखा देणार.
निवडणूक आली की हल्ली असे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वाभिमानी आविष्कार नजरेस पडतात.
लोकशाहीच्या सदऱ्याला हे बटण कुणी शिवले ?
(पीयूसीएल) या डाव्या विचारसरणीच्या एका सामाजिक संस्थेने केंद्र सरकारविरुद्ध एक खटला दाखल केला होता. त्यात निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर नोटाचे बटण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती.सप्टेंबर २०१३ मधे सुप्रीम कोर्टात तसे आदेश दिले. निकालपत्रात खालीलप्रमाणे मत नोंदवले.
“If the right to vote is a statutory right, then the right to reject a candidate is a fundamental right of speech and expression under the Constitution.
राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना योग्य उमेदवाराला तिकीट द्यावे ही अपेक्षा योग्यच आहे.उमेदवार गुन्हेगार नसावा,भ्रष्ट नसावा,चारित्र्यवान असावा यात दुमत असण्याचे कारण नाही. मी व्यक्तिशः नोटाच्या विरोधात आहे म्हणजे नोटाच्या मूळ हेतू मला अमान्य आहे असा अर्थ नाही.जे उमेदवारी अर्ज दाखल करतात ते प्रचलित कायद्याच्या चौकटीत राहून भरतात इतके तरी मान्य आहे की नाही ? यावर खरा उपाय पात्रतेचे निकष बदलणे हा आहे ,नोटा नाही हे माझे ठाम मत आहे.
NOTA म्हणजे None of the above.म्हणजे उमेदवार की पक्ष. माझ्यामते उमेदवार. सुप्रीम कोर्टाने Candidate हाच शब्द वापरला आहे.पण पद्धतशीरपणे नोटाचा रोख विशिष्ट पक्षाच्या विरोधात वळवला जाताना दिसतो.
उमेदवार पक्षप्रतिनिधी असतो. नोटावाले एका व्यक्तिमुळे पक्षावर अन्याय करत असतात. तुम्हाला तुमच्या आवडत्या पक्षाचा तुमच्या मतदारसंघातील उमेदवार नालायक वाटला म्हणून जर नोटा दाबलात तर त्यामुळे त्या पक्षावर अन्याय होतो. कदाचित असा एक पक्ष ज्याचा तुम्ही सतत तिरस्कार करता त्याला फायदा होऊ शकतो.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष महत्वाचा मानावा. नोटा समर्थक एक गोष्ट विसरतात की ते फक्त उमेदवार डोक्यात ठेऊन नोटाच्या बाजूने वाद घालतात. देश आणि राज्य दुर्लक्षित करतात. मत पक्षाला असते, उमेदवार प्रतिनिधी असतो. नोटा दाबून तुम्ही पक्षाला नाकारता. राज्यासाठी, देशासाठी नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे ,कोणाचे हात बळकट करायचे,कोणता पक्ष योग्य ते ठरवणे गरजेचे असते.
पहिला मुद्दा असा की ही निवडणूक आहे आणि इथे कोणालातरी निवडायचे असते. “उपलब्धांतून उत्तम” हा निवडणूकीचा मतितार्थ आहेत. तो पटण्यासारखा आहे.चांगला उमेदवार देणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी आहे हे पक्षांनी लक्षात घेऊन तिकीट वाटप करावे.
दुसरा मुद्दा असा की आता नोटाचा वापर राजकीय पक्षांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जातोय. हे करा नाहीतर नोटा दाबू ,ते करा नाहीतर नोटा दाबू असे हल्ली सर्रास लिहिले जाते. आज कमी प्रमाणात असले तरी उद्या एखादा मोठा जनसमूह किंवा मोठी वस्ती,गाव नोटाचा हक्क राजकीय पक्षांच्या ब्लॅकमेलिंगचे साधन म्हणून वापरु शकतो. याचे दूरगामी परिणाम भयंकर असू शकतात.अशामुळे नोटांचा मूळ हेतूलाच खीळ बसू शकतो.
तिसरा मुद्दा म्हणजे काही लोकशाहीविरोधी लोक पद्धतशीरपणे सत्ताधारी पक्षाला अपशकुन करण्यासाठी नवमतदार आणि कुंपणावर बसलेले मतदार या दोन घटकांना नोटा वापरण्यासाठी उद्युक्त करताना दिसून येतात.”सगळे राजकारणी चोर आहेत” ही यांची आवडती टॅगलाईन.लोक पटकन भुलू शकतात कारण काही राजकीय पक्षांची विश्वासार्हता लयाला गेली आहे.
चौथा मुद्दा म्हणजे (सुदैवाने) नोटाला कमीतकमी आज तरी धारच नाही. बोथट हत्यार आहे ते. कितीही मते नोटाला पडली तरीही निवडणूक रद्द होत नाही. वैयक्तिक वैफल्याला वाट करून घ्यायचे एक बटण यापलीकडे त्याला किंमत नाही.निवडणूक प्रक्रियेत नोटाला काडीचीही किंमत नाही.
राजकारण बरबटलेले आहे हे जरी खरे असले तरी देश घटनेनुसार चालवावा लागणार आहे हे अंतिम सत्य आहे. निवडणूक होऊन सरकार स्थापन होते. निवडणूक राजकीय पक्ष लढवतात आणि त्यांचे नेतृत्व राजकारणी करतात.
NOTA may be good at law but bad in spirit.
नोटा हा लोकशाही विरोधी कन्सेप्ट आहे असे माझे स्पष्ट मत आहे. नोटाला एक उमेदवार समजायला काय हरकत आहे अशी अत्यंत घातक मागणी केली जात आहे. याचे परिणाम भयंकर आहेत.
लोकशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रचार याच्या आधारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ म्हणजे कमीतकमी ८५+ इतकी करण्याचा दृष्टीने प्रयत्न आणि राजकीय पक्षांनी चांगल्या लोकांना उमेदवारी देणे या दोन्ही गोष्टींच्या सहाय्याने लोकशाही मजबूत होईल नोटामुळे नव्हे.
मी , माझी आवड,माझा उमेदवार,माझ्या भावना हा संकुचित विचार झाला.तुम्ही पक्ष नाकारता हे लक्षात ठेवा. म्हणजेच पक्षाने दिलेले सर्व उमेदवार नालायक आहेत असे का समजायचे ? स्वच्छ शीर्षस्थ नेतृत्वाकडे बघून मतदान करता येत नाही ? स्वतःपलीकडे विचार नाही करता येत तुम्हाला ? तुमच्या नकारात्मकतेमुळे राज्य किंवा देश अस्थिर होऊ शकतो हे कळते की नाही ?
नोटा समर्थकांनी दोन वाक्प्रचार लक्षात ठेवाव्यात..
दगडापेक्षा वीट मऊ
आगीतून फुफाट्यात
आनंद विश्वनाथन.
No comments:
Post a Comment