Wednesday, October 2, 2019

विधानसभा 2019 मित्र पक्षाच्या वाटेला चारही जागा, परभणी जिल्ह्यात यंदा कमळ फुलणारच नाही

विधानसभा 2019 मित्र पक्षाच्या वाटेला चारही जागा, परभणी जिल्ह्यात यंदा कमळ फुलणारच नाही

परभणी/ सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण निर्माण झालेले असतांनाही जिल्हयातील एकाही मतदार संघातून भाजपने आपले उमेदवार उभे केले नाहीत. भाजपच्या वाटेला आलेल्या जागेपैकी जिंतूर रासपला तर पाथरीची जागा रिपाईला देण्यात आली आहे. त्यामुळे जिंतूर मधून मेघना बोर्डीकर यांना रासपच्या तर पाथरी मधून आमदार मोहन फड यांना रिपाईच्या चिन्हावर निवडणुक लढवावी लागणार आहे.
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातून महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. यात परभणी व गंगाखेड या दोन विधानसभा शिवसेनेकडे देण्यात आल्या आहेत. यात परभणीतून विद्यमान आमदार डॉ.राहूल पाटील तर गंगाखेड मधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित पाथरी व जिंतूर हे दोन मतदार संघ महायुतीत भाजपला मिळाले होते. परंतू या दोन्ही जागा भाजपने मित्र पक्ष असलेल्या रिपाई व रासपला सोडल्या आहेत.
त्यामुळे जिल्हयात भाजपच्या चिन्हावर एकही जागा लढवली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाथरी मधून अपक्ष आमदार मोहन फड हे भाजपचे सहयोगी आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मागील पाच वर्षात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना सहज भाजपचे तिकीट मिळेल अशी शक्यता होती. परंतू तसे झाले नाही. आता मोहन फड यांना रिपाईच्या चिन्हावर निवडणुक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे लोकसभेपासून भाजपवासी झालेल्या मेघना बोर्डीकर यांनाही रासपच्या तिकीटावर निवडणुक लढवावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2 शिवसेना, एक रिपाई व एक रासप जागा लढवेल.

बोर्डीकर, फड यांच्यासमोर प्रश्नचिन्ह

महायुतीत पाथरी व जिंतूर मतदार संघाच्या जागा या मित्र पक्षाला गेल्यानंतर पाथऱीचे आमदार मोहन फड व जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासमोर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या दोन्ही मतदार संघात या दोघांनही त्या - त्यापक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कसा होईल याची चिंता या दोन्ही उमेदवारांना लागून राहीली आहे.

पूर्वी असा होता फॉर्मुला

पूर्वी महायुतीत जिल्ह्यातील जागा वाटपाचा फॉर्मुला सरळ सरळ होता. परभणी शिवसेना, पाथरी शिवसेना, जिंतूर शिवसेना तर गंगाखेड मतदार संघ हा पारंपारिक भाजपकडे होता. परंतू यंदा हा फॉर्मुला बदलूनच टाकण्यात आला आहे.  
 

No comments:

Post a Comment