Tuesday, July 2, 2019

गरजूवंत रुग्णांसाठी मी वेळप्रसंगी भीकही मागतो - ओमप्रकाश शेटे

गरजूवंत रुग्णांसाठी मी वेळप्रसंगी भीकही मागतो - ओमप्रकाश शेटे

गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-

जी माणसे इलाजासाठी पैशाअभावी मरतात. उपचारामुळे आणि पैशाअभावी एकाही माणसाचा मृत्यू होता कामा नये तसेच गरजूवंत रुग्णांसाठी मी वेळप्रसंगी भीकही मागतो असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्याने मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून दररोज जवळपास चारशे लोकांच्या रांगेतील शेवटच्या माणसाला न्याय दिल्याशिवाय उसंत घेत नाही असे प्रतिपादन ओमप्रकाश शेटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख (मुंबई) यांनी गंगाखेड येथे सोमवार (दि. 1 जुलै) रोजी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.हेमंत मुंढे होते.
‘प्रेस असोसिएशन गंगाखेड’च्या पुढाकारातून ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित सन्मान सोहळा प्रसंगी श्री. शेटे पुढे म्हणाले, लेक बापासाठी भीक मागणे असे चित्र कधी पाहण्यात येत नाही पण एक बाप आपल्या लेकासाठी भीक मागणे हे राजकारणामध्ये असतं... माझ्या पोराला ‘मत’ टाका.... पण इथे मात्र बाप पोराच्या विलाजास्तव आयुष्यासाठी भीक मागत असताना त्याला लागेल ती मदत करण्याचा आणि आपल्या पदाचा धर्म मी पाळतो. वेळ प्रसंगी नियमात बसून अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या गरजू रुग्णाला कशी मदत करता येईल यावर आपला कटाक्ष असतो. अशा गरजूवंत रुग्णांसाठी मी वेळप्रसंगी भीकही मागतो. ज्या भीक मागण्याने एका गरिबाचे प्राण वाचत असतील ती भिक नव्हे तर सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे असे मी समजतो असेही शेटे यावेळी भावनिक होत म्हणाले. ‘प्रेस असोसिएशन’ गंगाखेडने ‘डॉक्टर्स डे’निमित्त एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्धल श्री. शेटे यांनी संयोजकांचे कौतुक केले.यासपीठावर प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते चेतन दळवी, डॉ. संजय कदम, (आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदेड) डॉ. संतोष तोतला (संचालक तोतला हॉस्पिटल, औरंगाबाद) डॉ. सूर्यकांत देशमुख (संचालक, आयसीयू, परभणी) डॉ. राजगोपाल तोतला (अध्यक्ष, बाल रोग तज्ञ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश) यांची उपस्थिती होती.वैद्यकीय क्षेत्रात सामाजिकतेची जाण ठेवून कार्य केल्याबद्दल याप्रसंगी जालना येथील सिगेदार एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. किशनराव गारोळे (अभिषेक हॉस्पिटल गंगाखेड) सौ. शालिनी लिंबाजी डावकर (परिचारिका शासकीय ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ) डॉ. कैलास देशमुख (प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग) श्री. विनोद डावरे (देहदान अवयवदान कार्यकर्ते) यांचा पुष्पहार, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात डॉक्टर कन्या असणार्‍या कु. रुचिता प्रशांत काबरा, कु. धनश्री बालासाहेब मानकर यांनी परीक्षेत विशेष गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
--------------------------------------------------
डॉक्टरांनी रुग्ण सेवा हीच ‘ईश्वर सेवा’
समजून कार्य करावे -चेतन दळवी

डॉक्टर हे सकाळ पासून ते सायंकाळपर्यंत रुग्णांच्या बरे होण्यासाठी दक्षता घेत असतात. स्वतः तणावाखाली राहूनही आपल्याला वरच्या घरी न जाऊ देण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतात. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचा आदर करण्यावर अधिक भर द्यावा.डॉक्टरांनीही ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून कार्य करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते चेतन दळवी यांनी गंगाखेड येथे केले.‘डॉक्टर्स डे’निमित्त सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना दळवी म्हणाले, डॉक्टर हे आपल्या ज्ञान कौशल्याने सदैव कार्यरत असतात. जो आपल्याला आपल्याला आजारपणातून बरे करण्यासाठी प्रयत्न करतो, तो खरा डॉक्टर. पत्रकार हा कोण असतो? आपल्याला घराघरात पोचवतो तो पत्रकार...(प्रचंड हशा). तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट करा तो घराघरात पोहोचवणारच.... (प्रचंड हशा) रुग्णांवर अधिक बिलाचा बोजा न लादता वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करावे.यावेळी हास्याचे फवारे उडवताना आपल्या भाषणात दळवी म्हणाले, पूर्वी मी एक एमआर. होतो.(प्रचंड हशा) त्यावेळी ‘टूरटुर’ हे नाटक करायचो.... नाटक संपवून मी घरी निघालो, सोबत असणार्‍या बॅगेत आयुर्वेदिक, ऍलोपॅथिक प्रॉडक्स होती. डॉक्टर परदेशी यांच्याकडे मी गेलो. ते वैतागलेले दिसले, ते म्हणाले.... तू मला चार नॉनव्हेज जोक सांग..... मी तुझे सगळे प्रॉडक्ट विकत घेतो.... (प्रचंड हशा). डॉक्टरांना असे जोक्स फार आवडतात....(प्रचंड हशा) आईच्या संदर्भात दवाखान्यात घडलेला किस्सा सांगताना दळवी म्हणाले,डॉक्टर हे तन्मयतेने काम करताना मी अनुभवले आहे.डॉ.सुजाता पटवर्धन यांच्याकडे इलाजासाठी मी एकदा आईला घेऊन गेलो. त्यांनी या गंभीर आजाराविषयी आणि परिस्थितीची जाणीव मला करून दिली. त्यांनी सांगितले की तुमच्या आई या किती  दिवस जगतील हे काही सांगता येणार नाही..... त्यानंतर आईला दवाखान्यात ठेवून मी घरी आलो. सायंकाळी त्याच मॅडमचा मला फोन आला....मी सुजाता पटवर्धन बोलतेय... (त्यावेळी माझ्या छातीत धस्स झालं) अहो तुम्ही चेतन दळवी ना....! मी म्हटलं हो.... आम्ही तुमचं नाटक बघितलंय आणि मला ते आवडलही आहे. म्हणजे रुग्णांवर विलाज करताना त्यात डॉक्टरांची किती मग्नता असते हेच मला दिसून आले, असेही दळवी यांनी सांगितले.वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांच्या तपासण्या, निदान आणि शस्त्रक्रिया करताना डॉक्टर आपल्या ज्ञानकौशल्याने सेवा देतात. त्यामुळे त्यांचा आदर करणे हे आपणा सार्वंचे कर्तव्य ठरते.नाट्यप्रयोग-चित्रपटातून मी माझ्या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांना हसवून त्यांचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतो. (प्रचंड टाळ्या).यावेळी डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. किशनराव गारोळे, डॉ. संजय कदम, डॉ. सूर्यकांत देशमुख, डॉ. राजगोपाल तोतला, बाबासाहेब जामगे आदींनी मनोगत व्यक्त केले.प्रस्ताविक ‘प्रेस असोसिएशन’चे संस्थापक अध्यक्ष शंकर इंगळे, मनोगत उपाध्यक्ष डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांनी केले.बहारदार सूत्रसंचालन पत्रकार प्रशांत जोशी यांनी तर उपस्थितांचे आभार किरण स्वामी यांनी मानले.याप्रसंगी डॉ. सौ. शोभा प्रशांत काबरा, संतोष चव्हाण, बंडू खांडेकर, अ‍ॅड. रमेश देवळे, अ‍ॅड. नंदकुमार काकाणी, डॉ. मनिष बियाणी, डॉ. बिराजदार, डॉ. ज्ञानोबा धुमाळ, डॉ. रामेश्वर गुडे, उप प्राचार्य प्रा. मधुकर घुगे, नंदकुमार सुपेकर, प्रा. डॉ. राजेश आहेरकर, दासराव गडम, श्री. धोका, सुभाषराव महाजन, मकरंद चिनके, ज्ञानेश्वर कापसे, मोसीनखान तडवी, अनिल चौरे, विनायक पवार सर, नंदकुमार भरड, रवींद्र कोकडवार, किरण जोशी, बालासाहेब टोले, सौ. राजश्रीताई बाबासाहेब जामगे, सौ. किरणताई गारोळे, शैला इंगळे, सूर्यमाला मोतीपवळे, सौ. विद्या ठाकूर, सौ. रोशन नागरगोजे, सौ. अंजना बिडगर, सौ.कमल कदम, सौ. सुनिता घाडगे, सौ. यशोदा भुमरे, सौ. आशा रेघाटे, कु. नीता इंगळे, कु. वैष्णवी टोले, कु. वैष्णवी काळे, पत्रकार उद्धव चाटे, गुणवंत कांबळे, उत्तम आवंके, विलास लांडगे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर सोमाणी, किरण स्वामी, उत्तम काळे, शिवानंद लांडगे, हनुमान चोरघडे, ज्ञानोबा खटिंग, व्यंकट कागणे, रमेश शिंदे, सुनील टोले, पवन नेजे, धीरज राऊत आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment