पोलिसांनी मारहाण करून पैशांची मागणी केल्याची गुटखा विक्रेत्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मीरारोड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
आपण बंदी असूनही गुटखा विकत असल्याचे कबूल करतानाच पोलिसांनी १० हजारांचा मासिक हप्ता घेऊन देखील दुकानातून २ गोणी गुटखा सापडला म्हणून मारहाण केली व गुन्हा दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली अशी तक्रार भाईंदर मधील गुटखा विक्रेत्याने पोलीस आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शहरात पान टपऱ्यांपासून सर्वत्र बेधडक गुटखा विकला जात असल्याचे आरोप नवीन नाहीत आणि तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असता गुटखा सापडलेल्याच्या घटना देखील आहेत. त्यातच भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांवर मुनीब गुप्ता याने लेखी तक्रारी द्वारे केलेल्या गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे .
भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड येथे मुनिब गुप्ता ह्याचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. त्याने २५ डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, तो राज्यात बंदी असूनही दुकानात गुटखा विकतो. गुटखा विक्री आपण करत असल्याची माहिती नवघर पोलिसांना असून दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता त्यासाठी दिला जातो. गुरुवार २४ डिसेम्बर रोजी नवघर पोलिस ठाण्यातील कर्मचारी वाघ, गिरगावकर यांनी आपल्या दुकानात येऊन झडती घेतली असता त्यांना दुकानात २ गोणी भरून गुटखा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपासा करीत आपल्याला घरी नेले. तेथे पत्नी व मुलांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ३२८ कलमानुसार गुन्हा दाखल केल्यास तुरुंगात राहावे लागेल आणि सुटण्यास खूप खर्च करावा लागेल. अडीज ते तीन लाख रुपये दे मग गुन्हा दाखल करणार नाही असे धमकावत पैशांची मागणी केली.सदर रक्कम शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दे असे सांगून दे असे पोलिसांनी बजावले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी गुप्ता ह्याने मीरा-भाईंदर व वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी तक्रार करून मारहाण व लाच मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. समाज माध्यमावर देखील त्याने स्वतःचा व्हिडीओ टाकून कारवाई करा असे म्हटले आहे . कारवाई न केल्यास आत्महत्येचा इशारा त्याने दिला आहे.सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांना चौकशी करून ५ - ६ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर २ गोणी गुटखा सापडल्या नंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

No comments:
Post a Comment