Friday, November 22, 2019

जिल्हा प्रशासनाकडून सैन्य भरतीचे आयोजन ; उमेदवारांनी सैन्य भरतीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी - कर्नल तरुण जमवाल

जिल्हा प्रशासनाकडून सैन्य भरतीचे आयोजन ; उमेदवारांनी सैन्य भरतीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी - कर्नल तरुण जमवाल  
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  औरंगाबाद येथील सैन्य भरती कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातीलउमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर गुरुवार दि. 19 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करावी. असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्यानिमित्त आयोजित पुर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विद्यापीठ, आरोग्य, महापालिका, पोलिस, सैनिक कल्याण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
            पुढे बोलतांना कर्नल श्री.जमवाल म्हणाले की, या वर्षी भारतीय सैन्य दलाकडून परभणी जिल्ह्यात दि.4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे. आवेदनपत्र भरण्यास दि.21 नोव्हेंबर 2019 रोजी संकेतस्थळावर  चालु झाले असून त्याचा अंतिम दि.19 डिसेंबर 2019 असा आहे. ऑनलाईन नोंदणी करुन प्राप्त केलेल्या प्रवेशपत्राशिवाय या सैन्य भरतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी ऑनलाईन संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक असून याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सैन्य भरतीच्या काळात शहरात व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परिसरात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेवून सैन्य भरती काळात विविध ठिकाणाहुन येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या   विविध विभाग प्रमुखांना सुचना दिल्या तसेच सैन्य भरतीच्या काळात जिल्‍हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी सैन्य भरती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले.                                                          -*-*-*-*-

No comments:

Post a Comment